Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 1266 articles
Browse latest View live

व्हाइट सॉस पास्त्याची क्रिमी रेसिपी

$
0
0

पास्ता ही एक प्रसिद्ध इटालियन रेसिपी आहे. विविध प्रकारच्या सॉसेसमध्ये पास्ता बनविता येतो. घरीच बनविता येण्याजोगा व्हाइट सॉसमधील पास्त्याची क्रिमी रेसिपी केवळ लहान मुलांच्याच नव्हे तर मोठ्यांच्याही खास आवडीची आहे. ! पाहा तर मग, घरच्या घरी व्हाइट सॉसमध्ये पास्ता बनविण्याची रेसिपी...

साहित्य:
१ कप पास्ता, अर्धा चमचा तेल, १ कप बेबी कॉर्न, १ चमचा ओरिगॅनो, १ मध्यम चिरलेली शिमला मिरची, पावणे तीन कप दूध, अर्धा चमचा मिरपूड, पाव चमचा ताजी मलई, थोडे मशरूम, चिरलेला १ छोटा टोमॅटो, अडीच कप पाणी, चवीनुसार मीठ, २ चमचे लोणी, १ चिरलेला कांदा, २ चमचे मैदा, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, १०० ग्रॅम चीझ, चिरलेला १ गाजर, चिरलेली १ लहान कोबी

कृती:
१. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे तेल आणि मीठ घालून एक मिनिटे मोठ्या आचेवर ठेवा.
२. पाणी गरम झाले की त्यात पास्ता घाला आणि पुढील १० मिनिटांसाठी मध्यम आचेवर पास्ता शिजू द्या.
३. पास्ता चांगला शिजण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
४. पास्ता शिजल्यानंतर त्यातील पाणी गाळून घ्या.
५. सर्व भाज्या बारीक चिरून घ्या.
६. एका भांड्यात थोडे बटर घालून त्यात कांदा घालून २ मिनिटे परतून घ्या.
७. वरून मशरूम, बेबी कॉर्न, शिमला मिरची, ओरिगॅनो घालून ५ मिनिटे परता.
८. २ चमचे मैदा घालून पुन्हा थोडे परतून घ्या.
९. नंतर मीठ, मिरपूड, लाल मिरची पावडर, दूध घालून मिश्रण ६ मिनिटे शिजवा.
१०. आता त्यात क्रिम आणि शिजवलेला पास्ता घालून दोन मिनिटे चांगले शिजू द्या.
११. वरून चीझ घालून हे भांडे मंद आचेवर एका तव्यावर ५ मिनिटे ठेवून शिजवा. म्हणजे पास्ता खाली लागणार नाही.
१२. गरम व्हाइट सॉस पास्ता सर्व्ह करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्नो कुकीजची कमाल

$
0
0

साहित्य : १०० ग्रॅम मैदा, १०० ग्रॅम पीठी साखर, १०० ग्रॅम तूप किंवा बटर, स्टार आकारचे स्प्रिंकल्स (डेकोरेशनसाठी), २ ते ३ चमचे व्हॅनिला एक्सट्रॅक्ट

कृती : मैदा, पीठी साखर, तूप किंवा बटर, व्हॅनिला एक्सट्रॅक्ट हे सगळं साहित्य एकत्र करून घ्या. त्यानंतर या सगळ्याचा कूकीज डो बनवून घेतल्यावर ते योग्य प्रमाणात बेकिंग ट्रेला तूप किंवा बेकिंग पेपर लावून छोटे-छोटे कूकीजचे डो गोलाकार आकारामध्ये बेकिंग ट्रेमध्ये टाका. यावर डेकोरेशनसाठी स्टार आकारचे स्प्रिंकल्स या लावा. नंतर ओव्हन मध्ये ५ ते ७ मिनिटे १८० डिग्री सेल्सियसवर हे स्नो कूकीज डबल आकाराचे होईपर्यंत बेक करुन घ्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेजवानी पोपटीची!

$
0
0

> लहू सरफरे

रायगड जिल्ह्याच्या संस्कृतीचा भाग बनलेल्या पोपटीचा मोसम सुरू झालाय. आता थंडी संपेपर्यंत म्हणजे अगदी मार्चअखेरपर्यंत हा सिलसिला सुरू राहील. रायगडची ओळख व इतर ठिकाणच्या खवय्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलेल्या या चविष्ट पदार्थाची ‘मेजवानी’ खास तुमच्यासाठी...

काळोखी रात्र, अंगाला झोंबणारी थंडी आणि मोकळ्या मैदानात रंगलेली पोपटीची पार्टी हे दृश्य सध्या रायगडमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. देशावर जशी हुरडा पार्टी केली जाते, तशीच उत्तर कोकणातील ही पोपटी पार्टी. डहाणू परिसरासह काही ठिकाणी तिला ‘गड’ असंही संबोधलं जातं. गोड्या वालाच्या शेंगांचा मोसम आणि थंडीचा संयोग जुळून आला की, निमित्त काढून अशा पार्ट्या करण्याची इथली परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली. आता कालानुरूप त्यात थोडासा बदल झालाय एवढंच!

कुटुंब, पाहुणे, मित्र-मंडळी, कट्ट्यावरचे सोबती ते अगदी कार्यालयातील सहकारी अशा सर्वांना बोलावून पोपटी पार्ट्यांचं आयोजन होतं. कारण पोपटी लावल्यानंतर ती शिजेपर्यंत किमान अर्धा ते पाऊणतास वाट पाहावी लागते. मग त्यादरम्यान रंगतात धम्माल गप्पा, जुन्या आठवणी किंवा छोटेखानी, घरगुती गाण्यांच्या मैफली.

पोपटीत वापरले जाणारे गोडे वाल प्रामुख्यानं अलिबाग ते रेवदंडादरम्यानच पिकत असल्यानं या भौगोलिक वैशिष्ट्यामुळं ही पोपटी रायगडची सीमा ओलांडून गेली नसावी. किंवा गेली असेलच तर तिला इथल्यासारखी लज्जत येऊ शकणार नाही.

साहित्य : वालाच्या ताज्या शेंगा दोन किलो, एक किलो चिकन (मोठे तुकडे), एक डझन अंडी, बटाटे अर्धा किलो, अर्धा किलो कांदे-वांगी (आवडीनुसार), सारणासाठी मसाला (कांदे-बटाट्यांमध्ये घालण्यासाठी खवलेलं खोबरं, तिखट, मीठ व गोडा मसाला), जाडे मीठ, चवीपुरता ओवा आणि मध्यम आकाराचं मातीचं मडकं, भांबुर्डीचा पाला व लाकडं किंवा गोवऱ्या.

कृती : सर्वप्रथम मडकं, शेंगा आणि भांबुर्डीचा पाला स्वच्छ धुवून पूर्णपणे निथळून घ्यावा. मडक्याच्या तळाशी भांबुर्डीच्या पाल्याचा थर व्यवस्थित पसरावा. त्यावर अर्ध्या शेंगा, थोडं चिकन, अर्धा डझन अंडी, अर्धे कांदे-बटाटे आणि वांगी ठेवावीत. नंतर थोडासा ओवा व मीठाची पखरण करावी. पुन्हा भांबुर्डीचा पाला व उरलेल्या जिन्नसाचा असाच एक थर लावावा. त्यानंतर मडक्याचं तोंड पाल्यानं अगदी काळजीपूर्वक बंद करावं. अधिक दक्षता म्हणून दोन काठ्या उभ्या-अडव्या खोवव्यात.

पोपटी लावण्याची पद्धत :

मोकळी जागा बघून मडक्याच्या तोंडाहून थोडा मोठा वितभर खोल खड्डा खणावा. त्यात थोडा सुकलेला पाला किंवा पेंडा टाकून त्यावर मडकं उलटं ठेवावं. (काहीजण तीन विटांवरही मडकं उलटं ठेवतात.) मडक्याभोवती सुकी लाकडे, सुकलेला पाला किंवा सुकलेल्या शेणाच्या गोवऱ्या व्यवस्थित लावून पेटवून द्याव्यात. जाळ जास्त असल्यास अर्धा तास, अन्यथा पाऊणतास हे मिश्रण शिजवावं. या वेळेत जमलेल्या मंडळींची धमाल-मस्ती सुरू असते. चोहीबाजूनं लागणाऱ्या जाळामुळं भांबुर्डीसह इतर जिन्नसांचा स्वाद परस्परांत एकरूप होऊन एका भन्नाट चवीची निर्मिती यादरम्यान होत असते. अर्धा-पाऊणतासाने मडक्यावर पाणी मारून पाहावं. ‘चर्र’ असा आवाज झाल्यास पोपटी शिजली असं समजावं.

त्यानंतर मडक्याशेजारील लाकडं, गोवऱ्या बाजूला कराव्यात. त्यावर पाणी मारावं व जाड फडक्यानं मडकं अलगद बाहेर काढावं. लगेचंच आतील पोपटी एका पेपरवर काढून घ्यावी. त्यातला भांबुर्डीचा पाला बाजूला काढून पाणी आणि तेलाशिवाय शिजलेल्या या अनोख्या पदार्थाचा मनमुराद आनंद घ्यावा. सध्या जोडीला चिल्ड कोल्ड्रिंग पिण्याची पद्धत रूढ होत आहे. अंधारात निसर्गाच्या सानिध्यात अप्रतिम चवीच्या या गरमागरम पदार्थाचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच असते. सर्वांना आवडणारी आणि प्रामुख्यानं रायगडमध्येच बनणारी ही पोपटी उत्पन्नाचं उत्तम साधन होऊ शकते. पंरतु अद्याप तिला व्यावसायिक स्वरूप येऊ शकलेलं नाही, ही आश्चर्याची बाब आहे.


काही महत्त्वाचं...

> शाकाहारी व्यक्ती चिकन व अंड्याशिवाय पोपटीची मजा घेऊ शकतात.

> पोपटीपूर्वी किमान तासभर चिकनला हळद-मीठ, आले-लसूण पेस्ट, चिकन मसाला, तिखट, थोडसं दही आणि साजूक तूप लावून ठेवावं.

> चिकन केळीच्या पानात गुंडाळून व बारीक सुतानं बांधून पोपटीत टाकण्याची मूळ पद्धत आहे. हल्ली फॉइल पेपरही वापरला जातो. परंतु ते अवरणाशिवाय टाकल्यास अधिक स्वाद येतो.

> कांदे-बटाट्यांना भेगा करून त्यात सारणाचा मसाला भरून बारीक सुताने बांधून टाकावेत.

> मडक्यातून वाफ बाहेर जाऊ नये यासाठी त्याचं तोंड व्यवस्थित बंद करणं आवश्यक आहे. अन्यथा, भाज्या कच्चा राहून संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरतं. कारण पुन्हा गरम मडकं बंद करून त्याला जाळ देणं अवघड असतं.

> मडकं आगीतून काढल्यानंतर शक्य तितक्या लवकर पोपटी बाहेर काढावी. अन्यथा, आतील प्रचंड वाफेमुळं ती करपण्याची दाट शक्यता असते.

> काहीजण वालासह मेदळ, तूर किंवा शेवग्याच्या शेंगाही वापरतात.

> काही ठिकाणी भाज्यांना मिरची, कोथिंबीर, खोबरे, आले-लसून यांचे वाटण लावण्याची पद्धत आहे.

> शेंगासोबत ओल्या खोबऱ्याचे तुकडे पोपटीचा स्वाद द्विगुणित करतात.

> वाल वातवर्धक असल्याने वाताचा त्रास असलेल्यांनी मोह टाळावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारळी दुधातील रूचकर पुलाव!

$
0
0

नारळी दुधातील पुलाव ही एक दक्षिण भारतीय डिश आहे. नारळाच्या दुधामुळे पुलावला एक मधुर चव येते आणि तो जास्त रुचकर लागतो... पाहा नारळाच्या दुधातल्या पुलावची ही खास रेसिपी...

साहित्य:
१ कप बासमती तांदूळ, १ कप नारळाचे दूध, २ चमचे तूप, २ लवंगा, २ वेलची, तमालपत्र, मध्यम आकारात चिरलेला १ कांदा, २ हिरव्या मिरच्या

कृती:
१. नारळ किसून त्याचे घट्टसर दूध प्रथम काढून घ्या.
२. त्या नारळाच्या दुधात बासमती तांदूळ किमान २० मिनिटे भिजवून ठेवा.
३. पॅनमध्ये तूप घालून त्यात लवंग, वेलची आणि तमालपत्र घाला
४. वरून चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालून सुवास सुटेपर्यंत परता.
५. दुधात भिजलेला तांदूळ त्यात घाला आणि वरून तांदूळ शिजण्याइतके दूध पुन्हा घालून झाकणबंद ठेवा.
६. तांदूळ नीट शिजला की, तयार झालेला पुलाव रायता आणि एखाद्या मसालेदार भाजीसोबत सर्व्ह करा.

टीप: ( तुम्हाला हवे असल्यास या पुलावात वेज पुलावाप्रमाणे आवडीच्या भाज्या उदा. शिमला मिरची, गाजर, मटार, फरसबीही घालता येऊ शकते.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॅगो पराठा

$
0
0

>> मानसी सावर्डेकर, नौपाडा

साहित्य

१ वाटी कणिक, १/२ वाटी साबुदाणा, ३ उकडलेले बटाटे, २ चमचे आले, मिरची, कोथिंबीर आणि लसूणाची पेस्ट, १ चमचा धने पूड, १ चमचा जिरे पूड, चवीपुरते मीठ, थोडी साखर, तूप.

कृती

साबुदाणा रात्री भिजत घाला. सकाळी कुकरमध्ये ५ मिनिटे वाफवून घ्या. एका भांड्यात उकडलेला बटाटा कुस्करून घ्या त्यात वाफवून घेतलेला साबुदाणा घाला आलं मिरची कोथिंबीर आणि लसूणाची पेस्ट घाला धने जिरे पूड घाला थोडी साखर घाला चवीपुरते मीठ घाला आणि मिश्रण एकत्र करा. कणकेचा फुलका करा. त्या फुलक्याच्या अर्ध्या भागावर तयार केलेले मिश्रण घाला. फुलक्याचा उरलेला अर्धा भाग करंजीसारखा आकार देऊन दुमडा आणि काताण्याने कापून घ्या. हा पराठा तुपावर खरपूस भाजून घ्या. दह्याबरोबर खायला द्या सॅगो पराठा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाजराचा स्वादिष्ट केक

$
0
0

गाजराच्या मोसमात आपण गाजराचा हलवा हमखास बनवून खातो. पण गाजराचा केक कधी ट्राय केला का? मुळात केक म्हटलं की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. केकसाठी आपल्याला फक्त पार्टीचं निमित्त हवं. सध्या गाजराचा मोसमही आहे आणि न्यू इअर पार्टीचं निमित्तही! मग खालील रेसिपीने करून पाहा, गाजराचा केक...

साहित्य:
अर्धा किलो साल काढलेले, स्वच्छ धुतलेले आणि कोरडे केलेले गाजर, अर्धा किलो मैदा, ५५० मिली कॉर्न तेल, ६५० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम बारीक केलेले अक्रोड, २ चमचे बेकिंग पावडर, ८ ग्रॅम अंडी, ३ चमचे वेलची पावडर, २०० ग्रॅम बटर, २०० ग्रॅम क्रिम चीझ, ४ कप पीठीसाखर, २ चमचे वॅनिला इसेंन्स

कृतीः
१. एका बाजूला १८० डिग्री सेल्सिअसला ओवन गरम करायला ठेवा.
२. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला गाजराची चांगली प्युरी करून घ्या.
३. एका भांड्यात अंडी फोडून घ्या, त्यात साखर घालून चांगले फेटून घ्या.
४. दुसऱ्या भांड्यात मैदा घेऊन त्यात कॉर्न तेल, गाजर प्युरी आणि अंडी-साखरेचे फेटलेले मिश्रण, वेलची पावडर घालून एकजीव करा.
५. हे मिश्रण बटर पेपर लावलेल्या केक पॅनमध्ये ओता आणि प्रीहिटेड ओवनमध्ये २०-२५ मिनिटांसाठी ठेवून द्या.
६. २५ मिनिटांनंतर केक चांगला बेक झाला आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी एखादा पातळ चमचा केकच्या घात हलकेच घुसवून पाहा, चमच्याला काहीही न चिकटता तो तसाच्या तसा स्वच्छ बाहेर आला तर केक बेक झाला आहे समजा.
७. केक सजविण्यासाठी क्रिम बनविताना प्रथम, एका भांड्यात बटर आणि क्रिम चीझ चांगले फेटून घ्या. त्यात साखर पीठीसाखर आणि वॅनिला इसेंन्स घाला.
८. क्रिमी मिश्रण तयार होईपर्यंत फेटत राहा.
९. तयार केकवर एकसमान पद्धतीने क्रिम पसरवून घ्या.
१०. वरून बारीक केलेले अक्रोडचे तुकडे घालून गाजराचा स्वादिष्ट केक सर्व्ह करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिवाळ्यात खा दही-तीळाचे स्निग्ध सँडविच

$
0
0

हिवाळा म्हणजे थंडीचाच नाही तर चटपटीत खाण्याचाही मोसम! या दिवसांत स्निग्ध पदार्थ खाणे चांगले आणि तीळ स्निग्धतेचा उत्तम स्त्रोत आहे. तीळ आणि दही यांपासून बनविलेले सँडविच थंडीत पौष्टिकही आहे आणि स्वादिष्टही. पाहा मग कसे बनवायचे दही-तिळाचे सँडविच...

साहित्य:
ब्राऊन ब्रेड, २०० ग्रॅम दही, २० ग्रॅम सफेद तीळ, ८ लसूण पाकळ्या, चिमूटभर मीठ, मिरपूड, लवंग, साखर, २ हिरवी मिरच्या, १ शिमला मिरची, १ कप किसलेला गाजर, १ कच्चे सफरचंद किसलेले, १ कप चिरलेली कोथिंबीर, १ टोमॅटो, ३ चमचे ऑलिव्ह तेल

कृती:
१. सर्वात आधी एका सुती कापडात दही बांधून रात्रभर ते टाकून ठेवा. त्यामुळे दह्यातील सर्व पाणी रात्रभरात गाळून निघेल.
२. एका वाटीत पाणी घेऊन त्यात तीळ भिजत घाला.
३. ब्रेडच्या कडा कापून घ्या.
४. पाणी निथळलेल्या दह्यात चवीनुसार मीठ घालून पेस्ट करून घ्या.
५.भिजलेल्या तीळात लसूण, लवंगा, हिरवी मिरची आणि थोडे मीठ घालून त्याचीही पेस्ट करून घ्या.
६. या तयार पेस्टमध्ये ३ चमचे ऑलिव्ह तेल घाला.
४. नंतर चिरलेली शिमला मिरची, किसलेले गाजर आणि सफरचंद दह्याच्या पेस्टमध्ये मिसळा.
५. त्यात आता मिरपूड, साखर आणि तीळाची पेस्ट घालून मिसळा.
६. कडा कापलेल्या ब्रेडमध्ये आवश्यकतेनुसार तयार स्टफिंग भरून त्रिकोणी आकारात कापून सँडविच सर्व्ह करा.
७. ग्रील सँडविच हवे असल्यास ते ग्रील पॅनमध्ये मंद आचेवर शेकून घ्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साऊथ इंडियन इडलीला चायनीज तडका!

$
0
0

सांबार सोबत इडलीचा स्वाद अनेकदा आपण घेतोच. पण या साऊथ इंडियन डिशला थोडा चायनीज तडका दिला तर?! इडली मंच्युरियन ही चटपटीत रेसिपी बनवता येऊ शकते. चायनीज फूड आवडणाऱ्यांसाठी पाहा एकदा बनवून टेस्टी इडली मंच्युरियन!

साहित्य:
१० इडल्या, अर्धा कप कॉर्नफ्लॉवर, अर्धा कप मैदा, १ चमचा सोया सॉस, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट, तेल

ग्रेव्ही बनविण्यासाठी साहित्य:
कांदा, हिरवी मिरची, आल्याचा छोटा तुकडा, शिमला मिरची, सोया सॉस, तेल, कॉर्नफ्लॉवर, १ कप चिरलेली कांद्याची पात

कृती:
१. सर्वात प्रथम इडलीचे छोटे काप करून घ्या.
२. मैदा, कॉनफ्लॉवर, आले-लसूण पेस्ट, मीठ एकत्र करून त्यात थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घ्या.
३. तयार पेस्टमध्ये इडलीचे काप बुडवून ते तळून घ्या.
४. नंतर कांदा, हिरवी मिरची आले, शिमला मिरची बारीक चिरून घ्या.
५. एका कढईत थोडे तेल टाकून त्यात वरील साहित्य परतून घ्या.
६. मग त्यात सोया सॉस आणि तळलेल्या इडलीचे काप घाला.
७. २ कप पाण्यात कॉर्नफ्लॉवर मिसळून ते वरील मिश्रणात घालून उकळी येऊ द्या.
८. चांगली उकळी फुटली की, गॅस बंद करून वरून चिरलेला पातीचा कांदा घालून गरमगरम इडली मंच्युरियन सर्व्ह करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खास पार्टीसाठीचे पनीर स्नॅक्स!

$
0
0

एव्हाना थर्टी फर्स्टचा मूड बनायला सुरुवात झाली असेल. पार्टीसाठी बाहेर जाणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी घरच्या घरी थर्टी फर्स्ट पार्टीचा आनंद घेणारेही काही कमी नाहीत. अनेकजण सोसायटीच्या प्रांगणात किंवा मग गच्चीवर थर्टी फर्स्ट पार्टीचं आयोजन करतात. पार्टीत नाच-गाण्याबरोबर खाण्याचीही चंगळ असते. फुल-फ्लेज जेवणापेक्षा इथे स्नॅक्स किंवा स्टार्ट्सला जास्त पसंती असते. पार्टी गोअर्ससाठी पनीरच्या या काही खास रेसिपी...1

१. क्रिस्पी शेजवान पनीर फिंगर्स

साहित्य:

२०० ग्रॅम बारीक केलेले पनीर, १०० ग्रॅम कॉर्न फ्लॉवर, १०० ग्रॅम मैदा, प्रत्येकी दिड चमचा लसूण पेस्ट आणि आले पेस्ट, ८-९ कडीपत्त्याची पाने, मीठ, ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २ बारीक चिरलेले कांदे, प्रत्येकी दिड चमचा सोया सॉस आणि व्हिनेगर, अर्धा कप तेल, १ चिमूट मिरपूड, १ धुऊन कोरडी केलेली बारीक चिरलेली लाल मिरची.



कृती:
१. एका भांड्यात मैदा आणि कॉर्न फ्लॉवर एकत्र करा.
२. त्यात आवश्यकतेनुसार मीठ घालून एकत्र मिसळा.
३. वरून व्हिनेगर आणि सोया सॉस घाला.
४. दुसऱ्या एका भांड्यात मंद आचेवर तेल गरम करून घ्या.
५. तेल चांगले गरम झाले की, त्यात आले-लसूण पेस्ट, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि लाल मिरची, मिरपूड, कांदा, कडीपत्ता घालून चांगले परतून घ्या.
६. मिनिटाभरात गॅस बंद करून परतलेली सामग्री मैदा-कॉर्न फ्लॉवरच्या बॅटरमध्ये घालून एकजीव करून घ्या.
७. कढईत तेल गरम करायला ठेवा.
८. आणि दुसऱ्या बाजूला पनीरचे काठीसारखे उभट रोल करून घ्या.
९. बॅटरमध्ये हे रोल घोळवून गरम तेलात सोडा.
१०. रोल गोल्डन ब्राऊन रंगात तळून घ्या.
११. टिश्शू पेपर ठेवलेल्या ताटात हे रोल काढून घ्या म्हणजे अतिरिक्त तेल शोषले जाईल.
१२. गरमगरम शेजवान पनीर फिंगर्स पुदिना चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.

२. पनीर कबाब

साहित्य:
१२५ ग्रॅम पनीर क्युब्स, अर्धा कप योगर्ट (दही), प्रत्येकी अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट, अर्धा चमचा चाट मसाला पावडर, पाऊण चमचा गरम मसाला पावडर, दिड चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा हिरवी मिरची सॉस, प्रत्येकी पाव चमचा जिरेपूड आणि धनेपूड, मीठ




कृती:
१. योगर्ट, आले-लसूण पेस्ट, चाट मसाला, लाल तिखट, गरम मसाला, हिरवी मिरची सॉस, जिरेपूड, धनेपूड आणि मीठ इत्यादी एका भांड्यात एकत्र करा.
२. पनीर क्युब्स या मिश्रणात चांगले घोळवून घ्या.
३. हे भांडे झाकणबंद करून साधारण २-४ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा.
४. मॅरिनेट झालेले पनीर क्युब्स फ्रिजमधून काढून त्यातील पाणी गाळून घ्या.
५. मध्यम आचेवर ग्रील पॅन गरम करायला ठेवा.
६. पॅन चांगले गरम झाले की पनीर क्युब्स ३-४ मिनिटांसाठी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शेकून घ्या.
७. गरमगरम पनीर कबाब पुदिन्याच्या चटणीसोबत लगेच सर्व्ह करा.

३. आचारी पनीर कॅनपे

साहित्य:
५०० ग्रॅम पनीर क्युब्स, ६ बन्स( छोटे पाव), १०० ग्रॅम घट्ट दही, २० ग्रॅम मोड आलेले धान्य, लेट्युसचे १ पान बारीक चिरलेले (कोशिंबिरीसाठी वापरतात), २ चमचे मोहरीचे तेल (नसल्यास स्वयंपाकातले कोणतेही तेल चालेल), ३० ग्रॅम सोललेले लसूण, अडीच चमचे आचारी मसाला(बाजारात आयता मिळतो)



कृती:
१. तेल चांगले गरम करून घ्या. मोहरीचे तेल वापरत असाल तर त्याचा विशिष्ट वास जाईपर्यंत ते गरम करा.
२. गरम तेलात आचारी मसाला घालून चांगले एकत्र करा. मसाला करपणार नाही याची काळजी घ्या.
३. गॅस बंद करून हे मिश्रण १० मिनिटे थंड होण्यासाठी ठेवून द्या.
४. थंड झालेल्या आचारी मसाल्यात दही घालून चांगले एकत्र करा.
५. त्यात बारीक तुकडे केलेले पनीर क्युब्स घालून ५ मिनिटे मॅरिनेट होऊ द्या.
६. चिरलेली लेट्युसची पाने थंडगार पाण्यात घालून ठेवा.
७. दुसऱ्या बाजूला एका पॅनमध्ये मॅरिनेट झालेले पनीर ५ मिनिटे एकसारखे परतून बाजूला काढून घ्या.
८. एका भांड्यात बटर आणि चिरलेला लसूण एकत्र करून ते बन्सच्या एका बाजूला लावून घ्या.
९. नॉनस्टिक पॅनवर हे बन्स शेकून चांगले क्रिस्पी करून घ्या.
१०. क्रिस्पी बन्सवर लेट्युसची पाने आणि आचारी मसाल्यात परतलेले पनीर घाला.
११. वरून मोड आलेली कडधान्ये घालून आचारी पनीर कॅनपे सर्व्ह करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आलू बोंडा

$
0
0

>> मंजुषा सातव

आलू बोंडा हा दक्षिण भारतातील अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे.

तयारीस लागणारा वेळ : १० मिनिटे

साहित्य : उकडलेले बटाटे- ३, चिरलेला कांदा- १, चिरलेल्या हिरव्या मिरच्या- २, उडदाची डाळ १/२ टी स्पून, मोहरी १/४ टी स्पून, हळद पावडर १/४ टी स्पून, लिंबाचा रस १/२ टी स्पून, कडीपत्ता

बोंडा बनवण्यासाठी साहित्य : ३/४ कप बेसन, १/५ टेबलस्पून तांदळाचे पीठ, १ टेबलस्पून लाल मिरची, १/२ टेबलस्पून हिंग, १ टेबलस्पून गरम तेल, १/२ टेबलस्पून खाण्याचा सोडा, मीठ, तळण्यासाठी तेल

कृती : कढईत तेल गरम करून घ्या. त्यात मोहरी टाकून तडतडू द्या. उडीद डाळ टाकून ती लालसर होऊ घ्या. त्यात चिरलेले कांदे, कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाका. नंतर हळद टाकून ते परतवा. त्यात बटाटे स्मॅश करून टाका. नंतर गॅस बंद करून ते मिश्रण थंड होऊ द्या आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस टाका. हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या आण‌ि त्याचे गोल एकसमान गोळे बनवा.

बोंडे बनवण्यासाठी : बेसन, मैदा, लाल मिरची पावडर, हिंग, गरम तेल, खाण्याचा सोडा आणि मीठ एकत्र करून घ्या. त्यात १/२ ते ३/४ कप पाणी टाकून मळून घ्या. हे मिश्रण मळताना ते थोडे पातळ बनवा. एका पसरट भांड्यात तेल गरम झाल्यावर आच मंद करा. बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे पातळ पिठात बुडवून तळून घ्या, लाल होईपर्यंत ते तळा आण‌ि एक-दोन मिनिटानंतर बाहेर काढा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चीज ओनियन रिंग

$
0
0

>> पूजा कुलकर्णी

झटपट होणारा, वेळेची बचत करणारा तसेच पार्टीच्या मूडप्रमाणे सर्वांना मनसोक्त चाखता येणारा पदार्थ शोधणाऱ्या महिलांना ओनियन रिंग हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

साहित्य : गोलाकार चिरलेला कांदा, चीज स्लाइस, मैदा, कॉर्नफिल्क्स, बेडक्रम्स, कॉर्नफ्लॉवर, हर्ब्स, कोथिंबिर, तेल

कृती : कांदा गोलाकार चिरून घ्यावा. कांद्याच्या सर्व चकत्या स्वतंत्र कराव्यात. चीजचे पातळ उभे काप करावेत. कांद्याच्या गोलाकार जागेत चीजस्लाइस भराव्यात. चीजच्या बाहेरील बाजूस पुन्हा कांद्याची चकती रचून ठेवावी. एका बाऊलमध्ये दोन चमचे मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यावा, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, तिखट आणि हर्ब्स घालावे. त्यामध्ये गरजेप्रमाणे थोडेथोडे थंड पाणी घालून मिश्रण तयार करावे. मिश्रणात कोंथिबीर घालावी. दुसऱ्या ताटात बेडक्रम्स, कॉर्नफ्लेक्सचा चुरा, हर्ब्स, मीठ आणि कोशिंबीर घालावी. एक रिंग घेऊन मैद्याच्या मिश्रणात घोळवावी. नंतर तिच रिंग ब्रेडक्रम्समध्ये घोळवावी. पुन्हा मैद्याचे मिश्रण आणि ब्रेडक्रम्समध्ये घोळवून सर्व रिंग्स तयार करून घ्याव्यात. रिंग्स तयार झाल्यानंतर फ्रिजमध्ये सुमारे अर्धातास ठेवावी. त्यानंतर त्या रिंग्स तेलात तळाव्यात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्दी बेक्ड पोटली समोसा आणि डोनल्स

$
0
0

समोसे आवडणाऱ्यांसाठी पण तेलकट वर्ज्य असणाऱ्यांसाठी खास बेक्ड पोटली समोसे आणि चहासोबत एन्जॉय करता येतील अशा टेस्टी डोनल्सची रेसिपी...

बेक्ड पोटली समोसे

साहित्य:
२०० ग्रॅम मैदा, २ चमचे तूप, २ चमचे तेल, मीठ चवीनुसार
स्टफिंगसाठी: २ मध्यम आकाराचे बटाटे, २०० ग्रॅम पनीर, पाव कप मटार, मीठ, प्रत्येकी पाव चमचा लाल मिरची पावडर आणि गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१. मैद्यामध्ये मीठ आणि तूप मिसळून घ्या.
२. हळूहळू पाणी घालून पुरीच्या पीठाप्रमाणे कडक पीठ मळून घ्या.
३. हे पीठ २० मिनिटांसाठी तसेच ठेवून द्या.
४. आता समोस्याच्या आत भरण्यासाठी स्टफिंग तयार करून घ्या.
५. उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्या.
६. एका कढईत थोडे तेल घेऊन त्यात स्मॅश केलेले बटाटे, पनीर, मटार, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून ३-४ मिनिटे परतून घ्या.
७. मैद्याचा गोळा घेऊन त्यात तयार स्टफिंग भरून घ्या. आणि पोटलीच्या आकारात वळवून वरचे तोंड बंद करून घ्या.
८. बेकिंग ट्रे मध्ये पोटली समोसे ठेवून ओवनमध्ये १५ मिनिटांसाठी बेक करायला ठेवून द्या.
९. सॉस किंवा पुदिना चटणीसोबत गरमगरम पोटली समोसे सर्व्ह करा.


डोनल्स

साहित्य:

२५० ग्रॅम मैदा, एक चमचा बेकिंग पावडर, एक अंडे, साखर आवश्यकतेनुसार, मळण्यासाठी दूध आवश्यकतेनुसार, तळण्यासाठी तेल

कृती:
१. मैदा चाळून त्यात बेकिंग पावडर आणि साखर मिसळा.
२. मग अंड्याचा पांढरा बलक मिसळून चांगले एकजीव करा.
३. आवश्यकतेनुसार दूध घेऊन पीठ चांगले मळून घ्या.
४. मोठे गोळे करून मोठी पाती लाटून मठरीप्रमाणे गोल किंवा हव्या त्या आकारात कापून घ्या.
५. सगळे डॉनल्स कापून तयार झाल्यानंतर एका कढईत तेल गरम करून ते तळून घ्या.
६. पूर्णतः थंड झाल्यानंतर हवाबंद डब्ब्यात भरून ठेवा.
७. चहा सोबत खाण्यासाठी उत्तम स्नॅक्स आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तवा नान विथ पीज कोफ्ता

$
0
0

हिवाळ्यात गरमगरम खाण्याची मजा काही औरच! मग मेन्यू साधा असला तरी चवीने खाल्लं जातं. थंडीच्या दिवसात मटारही खूप येतात. मटार अर्थात पीज कोफ्त्याची ही साधी तरीही चटपटीत रेसिपी तवा नान सोबत नक्की ट्राय करा.

पीज कोफ्ता

साहित्य :

१ कप हिरवे मटार, २ मोठे बटाटा, १ चमचा बेसन, प्रत्येकी २ चमचे आले-लसूण पेस्ट, ३-४ हिरव्या मिरच्या, जिरे, हळद, धने पावडर, लाल तिखट, २०० ग्रॅम टोमॅटो, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ



कृती :
१. सर्व प्रथम बटाटे उकडून घ्या. थंड झाले की त्यांची साल काढून घ्या
२. हिरवे मटार चांगले धुऊन घ्या आणि बटाट्या सोबत थोडे जाडसर मिक्सरमधून काढून घ्या.
३. बटाटा-मटारचे हे जाडसर मिश्रण एका भांड्यात घेऊन त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट आणि बेसन घालून चांगले एकजीव करून घ्या.
४. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून तळून घ्या.
५. हलक्या सोनेरी रंगात हे कोफ्ते तळून घ्या.
६. ग्रेव्हीसाठी आता टोमॅटो, हिरवी मिरची मिक्सरमध्ये फिरवून प्युरी तयार करून घ्या.
७. नंतर एका पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात जिरे, हळद, धने पूड घालून मंद आचेवर परतून घ्या.
८. वरून टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
९. चवीनुसार त्यात मीठ, लाल तिखट आणि आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्या.
१०. मिश्रण उकळले की गॅस बंद करून वरून तळलेले कोफ्ते घालून थोडा वेळ झाकून ठेवा.
११. गरमगरम पीज कोफ्त्यावर कोथिंबीर पेरून तवा नान सोबत सर्व्ह करा.
१२. पाहा तवा नानची पुढील रेसिपी...


तवा नान

साहित्य :

३०० ग्रॅम मैदा, अर्धा चमचा बेकिंग सोडा, १ चमचा तेल, पाव कप दही, १ चमचा साखर, चवीनुसार मीठ



कृती :
१. एका भांड्यात मैदा, साखर आणि बेकिंग सोडा एकत्र करून घ्या .
२. आता त्यात दही टाकून चांगले एकजीव करून घ्या.
३. नंतर हळूहळू कोमट पाणी घालत चांगले मळून घ्या.
४. थोडे तेल घेऊन मैदा चांगला गुळगुळीत होईपर्यंत मळा
५. साधारण २ तासांसाठी हे पीठ झाकून ठेवा.
६. पीठ जितके चांगले मुरेल तितकेच चांगले नान तयार होतील.
७. एका बाजूला तवा गरम करायला ठेवा आणि दुसऱ्या बाजूला मळलेल्या गोळ्याची पोळी लाटून घ्या.
८. लाटलेल्या पोळीच्या वरच्या बाजूस पाण्याचा हात फिरवून घ्या.
९. आणि तीच बाजू तव्यावर जाईल अशा पद्धतीने तव्यावर टाका.
१०. तव्याकडची बाजू चांगली शेकली गेली की, तसाच तवा गॅसवर उलटा करून चारही बाजूंनी तवा हलवत तपकिरी रंगात दुसरी बाजूही चांगली शेकून घ्या.
११. नंतर तवा सरळ करून नानला वरून तूप किंवा बटर लावून पीज कोफ्त्यासोबत सर्व्ह करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोसमी फळांचा कोहिनूर मुरंबा

$
0
0

सीझननुसार आंबा, कैरी, आवळ्याचा मुरंबा बनवून वर्षभर साठवून चवीने खाल्ला जातो. लहान मुलांसाठी तर हे मुरंबे म्हणजे गुपचूप हातावर घेऊन खाण्यासारखं आवडतं चाटण. मुरंब्याचा आणखी एक पर्याय म्हणून छोट्यांना आवडेल असा फळांचा कोहिनूर मुरंबा... पाहा ही रेसिपी.


साहित्य
२० लिंबु, १ किलो साखर, अर्धा चमचा गुलाबपाणी, २०० ग्रॅम साखरेत शिजवलेला अर्धा अननस, १ चिकू, १ सफरचंद, २ पिकलेले नाशपाती, ५० ग्रॅम चेरी, एका डाळिंबाचे दाणे, ४ केळी, आंबा, १ आलुबुखार, २० बदाम, ५ अक्रोड, ५० ग्रॅम द्राक्षं, मगज

कृती
१. एका भांड्यात एक ग्लास पाणी उकळून घ्या
२. पाणी उकळायला लागले की त्यात साखर घालून ढवळा आणि १० मिनिटे मंद आचेवर साखर नीट वितळेपर्यंत ठेवा.
३. या साखर पाण्यात एका लिंबाचा रस घालून ढवळा.
४. वर आलेला फेस काढून मिश्रण गॅसवरून खाली उतरून घ्या.
५. मिश्रण थंड झाल्यावर त्यात गुलाबपाणी मिसळा.
६. वरून सर्व लिंबाचा रस, साखरेत शिजवलेले अननस, बारीक चिरलेली इतर सर्व फळे, डाळिंबाचे दाणे त्यात मिसळा.
७. सुका मेवा आणि गुलाब पाणी घालून बरणी बंद करून ठेवावी.
८. जास्त प्रमाणात बनवून वर्षभर साठवून ठेवायचे असल्यास त्यात पोटॅशियम मेटा बायसल्फाइट अर्धा चमचा मिसळावे.

(टीप: ज्या मोसमात हा मुरंबा कराल त्या मोसमातील ताजी फळेच घ्या.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चविष्ट चटण्यांचे चटपटीत प्रकार

$
0
0

पंचपक्वान्नांनी सजलेल्या ताटात तिचे स्थान अगदी कोपऱ्यात असले तरी संपूर्ण जेवणाचा स्वाद ती वाढवते, अशी ही चटणी! जेवताना तोंडी लावला जाणारा चटणी हा प्रकार जितका स्वादिष्ट तितकाच पौष्टिकही आहे. भाज्या आणि अगदी काही भाज्यांच्या सालीपासूनही चटपटीत चटणी बनवता येते. पाहा तर, चविष्ट चटण्यांच्या चटपटीत प्रकारांची रेसिपी...

गवारीची चटणी

साहित्य :
१ वाटी गवार, १ मोठा चमचा तीळ, १ चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, ४-५ हिरव्या मिरच्या, चिंचेचे तुकडे, चवीनुसार मीठ व साखर.
फोडणीसाठी- मोहरी, हिंग, हळद, तेल

कृती :
१. कोवळी, शक्यतो बीया तयार न झालेली गवार चटणीसाठी घ्या.
२. स्वच्छ धुवून गवार निवडून घ्या.
३. एका कढईत थोडे तेल गरम करून घ्या.
४. त्यात गवार आणि मिरची खरपूस परतून घ्या
५. त्यात थोडे पाणी घालून ५-७ मिनिटे शिजवा.
६. शिजलेली गवारीमध्ये तीळ, शेंगदाण्याचे कूट, चिंचेचे तुकडे (किंवा लिंबाचा रस), चवीनुसार मीठ आणि साखर घालून मिक्समधून ओबडधोबड फिरवून घ्या
७. आता एका कढईत तेल घालून वरून मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी तयार करून घ्या.
८. तयार फोडणी गवारीच्या चटणीत घाला.
९. चांगले एकत्र करून पराठे, थालीपीठ किंवा अगदी भाकरीसोबतही ही चटणी सर्व्ह करू शकता.

कारळ्याची चटणी

साहित्य :
१ वाटी कारळे, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी तीळ, पाव वाटी सुके खोबरे, १ वाटी कढीपत्ता, १०-१५ सुक्या लाल मिरच्या, जिरे, मीठ, साखर, हिंग, तेल

कृती :
१. बारीक चिरलेले कारळे, शेंगदाणे, तीळ हे सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्या.
२. कढईत थोडे तेल गरम करून त्यात कढीपत्ता, लाल मिरची आणि जिरे घालून वरून सुके खोबरे घालून खोबरे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
३. भाजलेले सर्व साहित्य एकत्र करून त्यात मीठ, साखर, हिंग घालून मिक्समधून काढून घ्या.
४. वाटलेले मिश्रण म्हणजेच कारळ्याची चटणी बरणीत भरून ठेवा.
५. जेवताना थोडी थोडी सर्व्ह करा.

दोडक्याच्या-दुधी भोपळ्याच्या सालांची चटणी

साहित्य:

१ वाटी दुधी भोपळ्याचे साल, १ वाटी दोडक्याचे साल, ७-८ हिरव्या मिरच्या, १ वाटी किसलेले सुके खोबरे, १ वाटी तीळ, १ वाटी शेंगदाण्याचे कूट, तेल, मीठ, साखर, मोहरी, हिंग, हळद

कृती :
१. प्रथम दोडक्याचे आणि दुधी भोपळ्याचे साल काढून बारीक चिरून घ्या.
२. तीळ, सुके खोबरे, दोडके-दुधी भोपळा सालं, मिरच्या थोडया तेलावर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
३. कढईत थोडेसे तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी तयार करा.
४. त्यात भाजलेले सर्व साहित्य घालून मीठ व साखर घालून चांगले परतून घ्या.
५. सर्व मिश्रण मिक्समधून ओबडधोबड वाटून घ्या.
६. ही चटणी झाकणबंद करून ठेवा आणि हवी तेव्हा सर्व्ह करा.

उडीद-हरभरा डाळीची चटणी

साहित्य :
अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी हरभरा डाळ, ७-८ लाल सुक्या मिरच्या, ४ वाटी किसलेले सुके खोबरे, थोडी चिंच, मीठ, साखर, तेल, मोहरी, मेथी, हिंग, हळद

कृती:
१. उडीद डाळ, हरभरा डाळ वेगवेगळे भाजून मिक्सरमध्ये रवाळ वाटून घ्या.
२. सुक्या खोबऱ्याचा किसही भाजून घ्या.
३. कढईत थोडे तेल गरम करून त्यात मोहरी, मेथी, हिंग आणि हळदीची फोडणी तयार करा.
४. सर्व जिन्नस एकत्र करून घ्या.
५. चिंचेचे तुकडे करून पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या.
६. ही चटणी दह्यात कालवून रुचकर लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लव्हली कालवं!

$
0
0

sharmila.kalgutkar@timesgroup.com
Tweet : @KsharmilaMT

खेकडे खाण्यासाठी आसुसलेल्या जीवांची जशी अमावस्या आली की भरगच्च खेकडा मिळेल अशी श्रद्धा असते, तशीच आस लावून कालवंप्रेमी पौर्णिमेची वाट पाहतात. समुद्राची भरती ओसरली की, मागे राहिलेल्या मऊ,लुसलुशीत वाळूमध्ये चालत जाताना अंगठ्यांने वाळू उकरत जायचं. पांढऱ्याशुभ्र फेसासोबत भरभर धावणाऱ्या छोट्या चिंबोऱ्या, वाळूत रुतून बसलेल्या शिंपल्याच्या जोडीला वेडेवाकडे काळेकुट्ट काटेरी दगडही असतात. या दगडांच्या अंगाखांद्याला कालवं घट्ट मुडपून बसलेली असतात. बेसावध राहून अनवाणी पायानं यावरून चालत गेलं, तर पाय कापलाच म्हणून समजा. चाकूच्या पात्याला जितकी धार असते, तितकीच या दगडांनाही. खरं तर ही तलम पात असते कालव्यांची.. शेतातलं तण कापायच्या विळ्यासारख्या अणकुचीदार विळ्यानं हे दगड ताडगोळ्यासारखे सोलून काढले की आतमध्ये निपचित पहुडलेली कालवं दिसतात. माणसांच्या डोळ्यांसारखीच जणू. आतमध्ये काळपट द्राव, बाहेरून पांढरं आवरण. मासे पाहताक्षणी त्यांच्या तळण्याचे, कालवणात रांधल्यानंतरचे जे भन्नाट गंध रंध्रांना जाणवतात, तसं काही कालवांच्या बाबतीत होत नाही. त्याचं कारणही तसंच आहे. कालवांना असतो एक वेगळा, हिमूस वास.. हे प्रकरण लजीज, मात्र तितक्याच प्रेमानं, समजुतीनं रांधायचं.. दगडाआडून एकेक कालवं सुट केलं की, त्याला पाण्याने भरलेल्या भांड्यात गोळा करायचं. तासदीड तास खपून मच्छिमार स्त्रिया अवघी वीस- तीस कालवं सोबत घेऊन येतात. मुंबईच्या बाजारात याला दणकून भाव मिळत असला, तरीही समुद्रकिनाऱ्यांवरच्या गावांमध्ये कालवांची किंमत मामुलीच...

असो, कालवं आणल्यानंतर कांदा, कोकम, भरपूर कोंथिबीर, आलं-लसूणाची पेस्ट करून त्यात हळद, लाल तिखट, पोटाला अपाय होऊ नये म्हणून कुटून टाकलेली मिरी घालून थोडंसं पाणी घालून कोळंबीच्या भाजीसारखी तिख्खट भाजी बनवता येते. पण ती निगुतीने करावी लागते. कालवं साफ करण्याचं झेंगट मोठं आहे. या कालवांना अनेकदा कच असते. कच म्हणजे मागे राहिलेली माती किंवा दगडांचे तुकडे. पाण्यात दहा-बारा वेळा खळखळून ती अल्लद हाताने काढावी लागते. हे करताना कालवं फुटून त्यातील द्रावण बाहेर येणार नाही, याची काळजी नाही घेतली, तर कुकरमध्ये डाळीसोबत लावलेल्या शेवग्याच्या शेंगाच्या लगद्यासारखीच गत...

कालवं पचायला थोडी जड असली, तरीही कालवं खाण्यासाठी थंडीसारखा दुसरा मोसम नाही. वास्को, फोंडा, कारवारकडे या इवलुश्या कालवांना नाना प्रकारे बनवलं जातं. तळलेली कालवं, कालवांची भजी तर फेणीसोबतचा चाखणा म्हणून प्रसिद्ध आहेच, पण बाळंतीणीसाठी, नुकत्याच आजारातून बाहेर आलेल्यांसाठी कालवांचं सुप आरोग्यदायी मानलं जातं. पावसात म्हावऱ्याचे वांधे झाले, तर शिंपल्याप्रमाणे कालवांच्या गरांना मीठ लावून तीही सुकवून ठेवली जातात. पावसाने माशाची कोंडी केली, तर उकड्या तांदळाच्या पेजेसोबत खोबरेल तेलावर लाल तिखट, कोंथिबीर घालून नुस्ती परतलेली कालवं मटणाच्याही तोंडात मारतात.

एरव्ही ताज्या कालवांच्या बाबतीत बुधवारची शुक्रवारी वगैरे ठेवण्याचे लाड कुणी करत नाही. कालवं म्हणजे झट आणून पट बनवून टाकण्याचा मामला. नाहीतर हिमुस वास वाढून कालवांची चव आंबटधोक झालीच समजायची. वांगी, शेवग्याच्या शेंगा, सोललेल्या वालांमध्ये सोड्यांप्रमाणे कालवं घालून भाज्या वाढवण्याची पद्धत काही ठिकाणी आहे. कांद्याची पात बारीक कापून त्यात सुक्या जवळ्यांच्या ऐवजी कालवं घालून तांदळ्याच्या भाकरीसोबत खाल्ली जातात. कष्टकरी माणसाचं बळकटी देणारं खाणं म्हणून या कालवांचं भाज्यांसोबत मानानं नाव घेतलं जातं..

पूर्वी पाच-दहा रुपयांना मिळणाऱ्या बोकडांच्या पायांचा, खेकड्यांचा त्यातल्या जीवनसत्त्वामुळे बाजारात जसा भाव वधारला, तसं कालवांच्या बाबतीत काही झालं नाही. एक तर कालवं हुडकून काढण्याची ठिकाण नेमकीच, त्यातही साफ करण्याचा खटाटोपही फार. म्हणूनच मासळी बाजारात बारा महिने कोळणींकडे पाटीवर लावलेल्या कालवांचं दर्शन होत नाही. जेव्हा एखादा वाटा दिसतो, तेव्हा कालवंप्रेमी तो घेतल्याशिवाय जात नाहीत. कालवांचा थोडासा उग्र गंध मारून टाकण्यासाठी त्यात सढळ हस्ताने ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो, पण त्यामुळे त्याची मूळची चव संपते. त्यामुळे भाजी कालवांची की खोबऱ्याची हा प्रश्न स्वतःसह इतरांना पडू नये, यासाठी भरपूर कांद्यावर, लसणीचा ठेचा, तिखट, कोकम घालून भाजीही बनवता येते. कोळंबीचं, शिंपल्याचं आंबाट जसं बनवतात, त्याच प्रकारामध्ये सुकं खोबरं, गरम मसाला, कांदा, कोंथिबीर भाजून वाटून घेऊन तो मसाला लावून त्यात शेवग्याच्या शेंगा, भाजीचा फणस, कालवं घालून आंबाट बनवता येतं. ऊनऊन तांदळाच्या भाकऱ्या, वाफाळता भात आणि हे कालवण खाल्लं की, दुपारी तीन तास मस्त ताणून देण्याची पक्की हमी! कालवांना आलं लसूण पेस्ट, शेजवान चटणी, मैदा, आरारुट पावडर लावून हटके भजीही बनवता येतात. कालवण, भजी, भाजी, सुक्या कालवांची चटणीसारखे कालवांचे असंख्य प्रकार रांधता येत असले, तरीही जुनीजाणती माणसं कालवं रात्री खाऊ नये असा सल्ला देतात. कालवं पचायला जड असल्याने तो गुमान पाळावा, नाहीतर पोटात कालवाकालव होण्याची शक्यता अधिक!


कालवांची चटणी

साहित्य ः ८ ते १० सुक्या लाल मिरच्या, थोडे धणे, ३-४ मिरे, १-२ आमसूल, पाव वाटी ओलं खोबरं, २-३ पाकळ्या लसूण, चिमूटभर हळद, वाटीभर शिजवलेली कालवं, मीठ चवीनुसार

कृती ः शिजवलेली कालवं वगळता इतर सर्व साहित्य मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे, त्या मिश्रणात शिजवलेली कालवं पाणी वगळून बारीक चिरून घालायची. मसाला वाटताना त्यात कालवांचे शिजवलेले पाणी वापरून मसाला वाटून घ्यावा. यातील तिखटाचा ठसका जोरदार असला, तर या चटणीची चव भन्नाट लागते. यात सुका बांगडाही साफ करून त्याचे बारीक तुकडे करून वापरता येतो. भाकरी व भात या दोहोंसोबत ही चटणी बेश्ट लागते.


कालवांच्या वड्या

साहित्यः वाटीभर कालवं, भरपूर कोथिंबीर, बेसन व त्यात चमचाभर तांदळाची पिठी, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, आलंलसूण पेस्ट, तळायला तेल

कृती ः कालवं साफ केल्यानंतर ती मोठी असतील, तर त्याचे दोन तुकडे करून घ्या.

वाफेवर ठेवून ती शिजवून घ्या. गार झाल्यानंतर या कालवांना सुटलेल्या पाण्यात बेसन, तांदळाची पिठी, आलंलसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोंथिबीर, लाल तिखट घालून चांगलं मळून घ्या. थालीपीठाप्रमाणे घट्ट पीठ मळा. चांगलं पीठ मळून झाल्यावर भजी तळतो, तसे तळून घ्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरण-भाताचे स्वादिष्ट पराठे

$
0
0

तुमच्या फ्रीजमध्ये जर वरण-भात शिल्लक राहिला असेल तर तुम्ही त्याचे पराठे बनवू शकता. वरण-भाताचे पराठे अतिशय स्वादिष्ट बनतात. पराठे बनविण्यासाठी मूग, तूर किंवा चने असे कोणत्याही डाळीचे वरण बनविलेले असले तरी चालेल. चला तर पाहूया, वरण-भाताच्या पराठ्यांची स्वादिष्ट रेसिपी...

साहित्य:
१ वाटी वरण, १ वाटी भात, दोन वाटी गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ, अर्धा चमचे जिरे, तेल किंवा तूप

कृती:
१. एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात मीठ, जिरे आणि एक छोटा चमचा तेल घाला.
२. नंतर त्यात राहिलेला वरण-भात घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
३. आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या.
४. मळलेले पीठ २० मिनिटे झाकून ठेवा म्हणजे ते चांगले मुरेल.
५. पीठाचे एक समान गोळे करून एकेका गोळ्याची पोळी लाटून घ्या.
६. दुसऱ्या बाजूला तवा गरम करून त्यावर थोडे तेल किंवा तूप घालून एकेक पराठा चांगला शेकून घ्या.
७. पराठे शेकताना प्रथम मध्यम आचेवर हलक्या सोनेरी रंगात शेकून घ्या
८. मग गॅस मंद करून दोन्ही बाजूंनी नीट शेकून घ्या.
९. दही, लोणचे किंवा कोणत्याही चटणीसोबत गरम गरम वरण-भाताचे पराठे सर्व्ह करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमके खाओ! पुरणपोळी

$
0
0

होळीच्या उत्साहात रंगायला सर्वजण सज्ज झालेत. तसंच या रंगतदार सणात गोडाच्या पदार्थांचीही मेजवानी असतेच. होळीच्या निमित्ताने काही गोड रेसिपीज सुप्रसिद्ध शेफ उमा अमृते यांनी मुंटाच्या वाचकांसोबत शेअर केल्या आहेत.
थंडाई
साहित्य- १० ते १२ बदाम, ८ ते १० पिस्ते, ३ टी स्पून खसखस, पाव टी स्पून बडीशेप, २ ते ३ सफेद मिरी, २ टी स्पून गुलकंद किंवा गुलाब पाकळ्या (दोन गुलाबाच्या), १ लीटर दूध, पाव कप साखर (हवी असल्यास जास्त), २ ते २ थेंब खस इसेन्स किंवा केशर व वेलची पूड
कृती- बदाम पिस्ता गरम पाण्यात भिजत घालून त्याची सालं काढून घ्या. खसखस भिजत घालून उकळून घ्या (साधारण ७ ते ८ मिनिटे). बडिशेप भिजत घालून बडीशेप, बदाम, पिस्ता, मिरी, गुलकंद एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. उकळलेली खसखस पण बारीक वाटून घ्या. दोन्ही तयार झालेल्या मिश्रणात गाळून टाका. तयार झालेल्या पेस्ट गाळून घ्या. दूध गरम करुन थंड करुन घ्या. ते दूध गाळलेल्या मिश्रणात इसेन्स, साखर, वेलची पूड घालून मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये घुसळून घ्या. हे मिश्रण फ्रिजमध्ये थंड करत ठेवा, देताना हवा असल्यास बर्फ टाका.
लाल भोपळ्याची पुरणपोळी
साहित्य- २ वाट्या किसलेला लाल भोपळा, अर्धी वाटी ओटीची जाडसर पूड, पाऊण वाटी साखर, १ चमचा साखर, पाव वाटी मावा, २ वाट्या मैदा किंवा कणिक, २ चमचे तेल, १ चमचा तूप, चवीप्रमाणे मीठ, मावा नसल्यास ४ चमचे मिल्क पावडर.
कृती- गव्हाचं पीठ, तेल, मीठ एकत्र करून पाण्याने भिजवून घ्या. (फार सैल नको) २ ते ३ तास ठेवा. एका पॅनमध्ये तूप टाकून त्यावर भोपळ्याचा किस घऊन तो परतून घट्ट करा. नंतर त्यात मावा आणि जायफळ घालून परतून घ्या. त्यात साखर घालून पुन्हा परतवा आणि सुकं करा. नंतर त्यात भाजलेल्या ओटची पूड घाला. घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. हे मिश्रण हलवूनहलवून थंड करा. अशाप्रकारे पुरणपोळीसाठी पूर्ण तयार आहे. भिजवलेल्या पिठातील थोडं पाणी घेऊन त्याची एक वाटी करून त्यात वरील पुरण भरून वाटी बंद करून गोळा तयार आणि ही पोळी लाटा. तव्यावर थोडं तूप सोडून खरपूस भाजून घ्या. हो पोळी फार मोठी करू नका. लहानच छान दिसते.
टीप : या लाल भोपळ्याच्या पुरणपोळ्या४ ते ५ दिवस टिकतात. दुधी, कोहळा, मटार घेणंही वरील प्रमाणे पुरणपोळ्या रता येतात.
चॉकलेट मूस
साहित्य- १ कप दूध, अर्धा कप क्रीम, १ टीस्पून जिलेटीन, पाव कप दळलेली साखर(हवी असल्यास थोडी जास्त टाका), अर्धा कप मेल्ट चॉकलेट, सजावटीला थोडी क्रीम व चेरी, चॉकलेट चिप्स
कृती- एका कढईत पाणी गरम करायला ठेवा. त्या पाण्यात एक बाऊलमध्ये चॉकलेट टाकून तो बाऊल ठेवा. गॅस लहान ठेवा. हळूहळू चॉकलेट वितळेल. एका बाजूला साखर आणि दूध एकत्र करून गरम करा. साखर विरघळल्यानंतर ते दूध चॉकलेटच्या बाऊलमध्ये टाका. जिलेटीन ३ ते ४ टी स्पून पाण्यात टाकून ते भांडे गरम पाण्यात ठेवा. जिलेटीन पातळ झाल्यार ते जिलेटीन चॉकलेट व दुधाच्या मिश्रणात टाकून फेसून घ्या. नंतर थंड पाण्यात ठेऊन फेसून थंड करा. थंड झालेल्या मिश्रणात थोडे थोडे क्रीम टाकून चमच्याने हलके हलवून एकत्र करा. ते तयार मूस ग्लासमध्ये ओतून सेट करण्याकरता फ्रिजमध्ये ठेवा. चांगले सेट झाल्यावर सफेद क्रीम नॉझलमध्ये टाकून त्या मूसवर थोडे पसरवा. वरून चॉकलेट चिप्स व चेरी लावा.
(अर्धा कप क्रीम एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन, इलेक्ट्रिक रवीनं फेसून क्रीम तयार करा. ते चांगले फुलून तयार झाल्यावर १/३ कप दळलेली साखर घालून फेसा व फ्रिजर मध्ये थंड करून नंतर टाका)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोया चंक्सचे खुसखुशीत वडे

$
0
0

सोया चंक हे शरीरासाठी पोषक आहेत. मात्र अनेकांना सोयाची भाजी आवडत नाही. अशावेळी सोया चंक्सना ट्वीस्ट देत बनवा सोया चंक्स वडे... पाहा ही रेसिपी

साहित्य :
गरम पाण्यात भिजवून घेतलेले सोया चंक्स-२ वाट्या, १ वाटी उकडून स्मॅश केलेला बटाटा, १ चमचा आलं-लसूण- मिरची पेस्ट, १ बारीक चिरलेला कांदा, दीड वाटी बेसन, हळद, लाल तिखट, जिरे, कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल

कृती :
१. प्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊन त्यात कढीपत्ता, चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
२. वरून मीठ घालून मग भिजवलेले सोयाचंक्स त्यात घाला.
३. सोयाचंक्स चांगले परतून घ्या व त्यामध्ये आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट घाला
४. हळद, आवश्यकतेनुसार लाल तिखट घाला.
५. हे सर्व मिश्रण तयार झाल्यानंतर त्यात उकडलेल्या बटाटा घालून एकत्रित करुन घ्या
६. तयार सोया मिश्रणाचा छोटे छोटे गोळे करून घ्या.
७. एकीकडे गॅसवर एका कढईमध्ये वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा.
८. दुसरीकडे एका बोलमध्ये बेसन, मीठ, बेकिंग पावडर, पाणी, लाल तिखट, आलं-लसणाची पेस्ट एकत्र करून त्यात योग्य प्रमाणात पाणी घाला.
९. बटाटे वड्यासाठी जसे पीठ तयार करतो तसे हे पीठ असायला हवे.
१०.आता सोया मसाल्याचे तयार गोळे बोलमधल्या मिश्रणामध्ये घोळवून गरम तेलामध्ये सोनेरी रंगात तळून घ्या.
११. गरमागरम सोया वडे पुदीना चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हावरचा उतारा

$
0
0

अपर्णा पाटील

उन्हाळ्याची लाही कमी करण्यासाठी अनेक पेयं प्यायली जातात. पण पदार्थ तसे कमीच. त्यापैकी दहीवडा प्रकार अत्यंत आवडीचा असला तरी घरी बनवल्यास नक्की फसणारा. त्यामुळेच अलीकडे दहीवडा वेगवेगळ्या प्रकारात बनवून पाहिला जातो. उन्हाळ्यावरचा हा उतारा नक्कीच स्वादिष्ट असा असतो, तो कसा हे चाखूनच पाहायला हवं.

दहीवडा देशभरात वेगवेगळ्या नावाने खाल्ला जातो. उत्तरेत दहीभल्ला नावाने हा प्रकार केला जातो. पण दहीवडे आणि दहीभल्ला यात मुख्य फरक म्हणजे भल्ले हे फक्त उडदाच्या डाळीचे असतात. तर दहीवडा प्रामुख्याने उडीद किंवा मूगाच्या डाळीपासून बनवला जातो. उत्तरेत बहुतांश सणाला दहीभल्ले केले जातात. त्याला दहीगुजीया असं म्हटलं जातं. उत्तरेकडच्या दहीभल्ल्यामध्ये स्टफिंग असतं. त्यात काजू, बेदाणे, नारळ असं भरलं जातं. ते बनवणं मोठं कौशल्याचं काम आहे. आपल्याकडे नुसतेच वडे असतात. त्यामुळे बाहेरच्या वड्याची चव घरी जमवणं शक्यच होत नाही. विशेष म्हणजे दहीवडा जेवणाच्यावेळी, सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही खाता येतो.

गेल्या काही वर्षांत या दहीवड्याने आधुनिक रूप धारण केलं आहे. खूप वेगवेगळ्या पदार्थांपासून दहीवडा बनवला जातो. साबुदाणे, बटाटे, पोहे, रवा, ब्रेड असे आधुनिक दहीवड्यांचे अवतार मूळ दहीवड्याइतकेच चविष्ट असतात. उपवासासाठी बनवला जाणारा दहीवडा हा आणखी एक लोकप्रिय प्रकार आहे. शिवाय दही हे नुसतं त्या वड्यावर घालण्यासाठी असलं तरी त्याच्या स्वादात बदल करता येतो. त्यामुळे अशरक्ष: शेकडो प्रकाराने दहीवडा बनवला जातो.

दहीवड्यातला वडा बनवण्याची अट इतकीच असते, की तो जाळीदार आणि त्यावर टाकलेलं दही शोषून घेणारा असावा. तेवढं करण्यासाठी मग वडा हा अगदी रव्यापासून ते थेट ब्रेडपर्यंत कशाचाही बनवता येतो. तो नुसत्या उडदाच्या डाळीपासूनही बनवला जातो किंवा उडीद आणि मुगाच्या डाळी एकत्र करूनही. उडदाची किंवा मुगाची डाळ किमान पाच तास भिजवली की चांगला दहीवडा बनलाच पाहिजे. ही डाळ भिजवून मग वाटायची. जमलं तर थोडी फेसावी, म्हणजे मऊशार वडे बनलेच पाहिजेत. तयार पिठात थोडं मीठ घालून किंवा न घालताही वडे बनवून, तळून घ्यायचे. मग पातळ ताकात किंवा नुसत्या पाण्यात बुडवून ठेवायचे. बुडवलेले वडे पाण्याने फुगून वर आल्यानंतर पिळून काढले की दह्यात बुडायला तयार. आता दही नुसतं साखर घालून घेतलं आणि वडा बुडवला आणि वरून थोडं तिखट-मीठ भुरभुरलं की झाला दहीवडा. मात्र दह्याचा स्वाद बदलण्यासाठी आणखी थोडी मेहनत करायची तयारी लागते. पण त्यानंतर तयार झालेला दहीवडा म्हणजे आहाहा...

या दह्यात वाटलेलं आलं, वाटलेली मिरची, मीठ आणि साखर घालायची. आवडत असल्यास फोडणी, नसल्यास हिरवी चटणी किंवा गोड चटणी, नाही तर दोन्ही चटण्या वरून घालायच्या. जिरेपूड आणि चाटमसाला, चिमूटभर तिखट असं नुसतं भुरभुरायचं. हेही कमी वाटत असेल तर कोथंबीर आणि पुदिनाही घाला. थंड केलेल्या दह्यात हे सगळं घातलं की, आइसक्रीमही नको म्हणाल. दहीवडा तयार झाल्यावर शेव आणि डाळिंबाचे दाणे घातले की हाच पदार्थ दिवसातल्या कोणत्याही प्रहरात खाता येतो.

उपवासासाठी दहीवडा करताना, बटाटा आणि वरी, आरारूट आदी वापरून बनललेल्या वड्यात दही घालताना उपवासाला चालणारे पदार्थ घातले की झालं. अगदी घरी उपमा बनवला जातो, त्याचेच वडे तयार करून तळून त्याचेही दहीवडे बनवले जातात. रवा भाजून कांदा-मिरचीच्या फोडणीचा उपमा बनवून त्याचे वडे बनवायचे. दही जसं आपल्याला हवं तसं घेतलं की वडा नेमका कसला बनवलाय, हे सांगायचीही गरज नाही. ब्रेडचे दहीवडे हा अलीकडचा लोकप्रिय पदार्थ. ब्रेडच्या स्लाइस थोड्या भिजवून त्यात खोवलेला नारळ किंवा बटाट्याचं मिश्रण घालायचं. अशाचप्रकारचे नवे नवे प्रयोग आपण आपल्या घरात नक्कीच करून पाहू शकतो.

हटके दहीवडा शॉट्स

अगदी अलीकडे एका ठिकाणी चक्क दहीवडा शॉट अशी आधुनिक रेसिपी चाखण्याचा प्रसंग आला. तर हा दहीवडा शॉट ग्लासमध्ये सर्व्ह करण्यात आला होता. तो कसा? तर... दहीवड्याची कृती सारखीच... फक्त वड्यांचा आकार अगदी छोट्या लिंबापेक्षाही लहान असावा. हे वडे नेहमीप्रमाणे पाण्यात बुडवून पिळून किमान तीन ते चार वडे त्या शॉट ग्लासमध्ये घ्यायचे. त्यात दही (आपल्या आवडीप्रमाणे त्यात आलं, तिखट किंवा नुसतीच साखर घातलेली) घ्यावं. वर चमच्याने तिखट आणि जिरा पावडर घातलं की झाला दहीवडा शॉट्स तयार. उन्हाळ्यात इतका चविष्ट आणि डोळ्यांना सुखावणारा पदार्थ डोळ्यासमोर येणं म्हणजे उन्हाळ्यावरचा उताराच म्हणायला हवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 1266 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>