मला वाटतं भजी, आणि ती सुद्धा गरमागरम, न आवडणारा माणूस शोधूनही सापडणार नाही. माझा सुद्धा भजी हा वीक पॉइंट आहे. मी भजी नुसती खातच नाही तर करतो सुद्धा. पारंपरिक पद्धतीने केलेल्या कांदाभज्यांबरोबर वेगवेगळ्या प्रकारे केलेली तूरडाळीची, मूगडाळीची किंवा मिक्स्ड डाळीची भजी बऱ्याच जणांना आवडतातच, पण त्यातल्या त्यात तूरडाळीची भजी तर जास्तच आवडतात. म्हणूनच मी मध्यंतरी पाककलेविषयीच्या आवडीवर लिहिलेल्या लेखात मी ह्या भज्यांचा उल्लेख केला होता. त्यावेळी अनेकांनी मला ह्या भज्यांची रेसिपी विचारली होती. ही पद्धत अतिशय साधी आणि सोपी आहे. ती भजी सगळ्यांनाच कराय यायला हवीत, असं मला मनापासून वाटतं. म्हणूनच इथे त्याची रेसिपी देत आहे.
साहित्य : तूरडाळ २ वाट्या, कांदे - २ ते ३ (बारीक चिरून), आले - दीड इंच, ओल्या मिरच्या - २ ते ३, उकडलेला मध्यम आकाराचा १ बटाटा, लसूण - ७ ते ८ पाकळ्या, बारीक चिरलेली कोथींबीर, मीठ - चवीनुसार, तळण्यासाठी तेल
कृती : तूरडाळ ४ ते ५ तास भिजत ठेवून नंतर ती मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावी. त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आले, लसूण, मिरची यांची पेस्ट तसेच उकडलेला बटाटा कुस्करून घालावा. चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. तेल गरम झाल्यावर मिश्रणाचे छोटे छोटे गोळे त्यात सोडून मध्यम आचेवर खरपूस तळून घ्यावेत, म्हणजे झाली आपली भजी तयार.
ही गरमागरम भजी नुसती सुद्धा खायला चांगली लागतात. पण कोणाला हवे असेल तर सोबत चटणी द्यायलाही हरकत नाही!
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट