साहित्य : रवा - दीड वाटी (बारीक किंवा जाड कोणताही चालेल), दही किंवा ताक - पाऊण वाटी, साखर- अर्धा टीस्पून, तेल - दीड टेबलस्पून, प्लेन ईनो सोडा - एक सॅशे, किसलेले गाजर - अर्धी वाटी, कोथिंबीर बारीक चिरून - एक टेबलस्पून, मटार-मक्याचे दाणे प्रत्येकी एक टेबलस्पून, आलं-लसूण पेस्ट - अर्धा टीस्पून, हिरवी मिरची वाटून किंवा बारीक चिरून - एक टेबलस्पून, मीठ - चवीनुसार
फोडणीचे साहित्य : तेल एक टेबलस्पून, उडीद डाळ दीड टीस्पून, मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता बारीक चिरुन एक टेबलस्पून
कृती : प्रथम एका बाऊलमधे रवा घेऊन त्यात दही किंवा ताक घालून अर्धी वाटी पाणी घालून कालवून पाच मिनिटे ठेवावे. तोपर्यंत फोडणी करावी. मग सोडा सोडून बाकी सगळे साहित्य घालून कालवावे. मग कोमट झालेली फोडणी घालून कालवावे. पाणी घालून इडलीच्या पिठाप्रमाणे करावे. स्टीमरमधे पाणी घालून गरम करावे व इडली स्टँड तेलाचा हात लावून तयार ठेवा. मग मिश्रणात सोडा घालून ढवळावे. मिश्रण लगेच फुगेल. ते इडली पात्रात घालून वाफेला ठेवावे. १० मिनिटांनी गॅस बंद करावा आणि गरमागरम इडली, चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करावी. नुसते तूप घालूनही ही इडली छान लागते.
टीप - ताक किंवा दही थोडेसे आंबट असावे.
- भाग्यश्री कुलकर्णी, पनवेल
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट