भरपूर प्रमाणात नसल्या, तरी बाजारात कैऱ्या यायला सुरुवात झाली आहे. या कैऱ्या बघून कुणाच्याही तोंडाला पाणी नाही सुटलं तरच नवल! मग या कैऱ्यांचा जेवणात मुबलक वापर केला जातो. कुणी त्यांचं लोणचं घालतं, कुणी त्या खारवून ठेवतं... कैरीचं पन्ह तर नित्याचंच; पण कैरीपासून केलेला मेथांबा हा थोडासा अलक्षितच राहतो. म्हणून पौष्टिक अशा मेथांब्याची रेसिपी.
साहित्य : तीन-चार मोठ्या आकाराच्या कैऱ्या, गूळ, लाल तिखट, मोहरी, धनेपूड, हिंग, हळद, जिरं, मेथ्या, तेल आणि चवीपुरतं मीठ.
कृती : प्रथम कैऱ्या सोलून घेऊन त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या. मग एका पातेल्यात तेल घेऊन ते गरम करून त्यात कैरीचे तुकडे चांगले परतून घ्या. त्यामुळे कैरीच्या लहान फोडी छान शिजतात. मऊसर होतात. दुसऱ्या पातेल्यात फोडणीला तेल टाकून त्यात फोडणीचं साहित्य (आपापल्या अंदाजाने) टाकून फोडणी तयार करा. त्यात कैरीच्या शिजवलेल्या फोडी टाकून ते चांगलं घोटा. चांगली पेस्ट तयार झाली, की त्यात वाटीभर पाणी टाकून चांगली वाफ काढा. नंतर त्यात जेवढ्यास तेव्हढा गूळ घालून परत चांगलं घोटा आणि त्यात तुम्हाला हवी तेवढी लाल तिखटाची पूड, मेथीची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करा. नंतर मिश्रण चांगलं खदखदलं, की गॅस बंद करा. नंतर थंड झाल्यावर तयार झालेला हा आंबट-गोड-तिखट चवीचा कैरीचा मेथांबा काचेच्या बरणीत भरून ठेवा. चटकदार तोंडी लावणं म्हणून तो सर्वांना नक्की आवडेल!
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट