अपर्णा पाटील
भारतात ज्याची मागणी सातत्याने वाढतेय, अशी पहिली गोष्ट आहे कार, तर दुसरा क्रमांक लागतो चीझचा. कधी काळी महागड्या रेस्तराँमधल्या निवडक पर्दाथांमध्ये चीझचा वापर व्हायचा. आता हेच चीझ घराघरात दिसू लागलंय. त्यामुळे त्याचे असंख्य पदार्थ बनवणं आणि असंख्य पदार्थांवर पेरण्यासाठी चीझ हवंच असतं. चीझ सॅलडपासून ते सूपपर्यंत किंवा पिझ्जापासून ते चीझकेकपर्यंत सगळ्य ात आवडीने खाल्लं जातं. ग्रील्ड सँडविचवर किसलेलं चीझ टाकल्यानंतरचा चेहरा पाहिला की 'से चीझ' असं वेगळं म्हणण्याची गरजच उरत नाही.
कधी तरी सँडविचमध्ये चीझ खाल्याची आठवण आपल्या घरातले वडीलधारे सांगतात. पण आताची मुलं फॅरेक्स खाऊन झालं की थेट चीझ पिझ्जा खायला लागली आहेत. त्यामुळे चीझ घरोघरी दिसू लागलं आहे. स्लाइस आणि क्यूबमध्ये मिळणाऱ्या चीझपासून ते चीझ स्प्रेडच्या असंख्य चवीच्या डब्यांनी फ्रिज भरले जाताहेत. व्हेज सँडविचमध्ये किसलेलं चीझ किंवा चीझ स्लाइस म्हणजे वजनवाढीला आमंत्रण, असं म्हटलं जायचं. पण आता लो फॅट चीझमुळे तीही चिंता राहिलेली नाही. इतकंच नाही तर सँडविचपासून पावभाजीपर्यंत सगळ्यात चीझ किसून घालून खाण्याची सवय आपल्याला लागली आहे. तरीही म्हणे भारतात चीझ खाण्याचं प्रमाण सगळ्यात कमी आहे. जगात चीझ खाण्याचं प्रमाण प्रत्येक व्यक्तीमागे वर्षाला सात किलो आहे, तर भारतात फक्त सातशे ग्रॅम इतकंच. त्यातही फक्त सहा प्रमुख शहरांमध्ये चीझ मोठ्या प्रमाणावर खाल्लं जातं. जगात तीन हजार प्रकारचे चीझ विकले जातात. भारतात आता कुठे चाळीस-पंचेचाळीस प्रकार आलेत. त्यामुळे आणखी चीझ खाण्याचे दिवस येणार आहेत.
ब्रेड आणि क्रॅकरवर चीझ लावून खाण्यासाठी काही भूकच लागली पाहिजे असं काही नाहीये. सॅलडसमध्ये मिक्स करून खाल्लं की भाजीचं तर काही कामंच नाही. चीझ आता भारतीय चटण्या, सॉसेस, केचप आणि डिप्सची जागा घेणार आहेत. अत्यंत चवदार चीझ स्प्रेड्स मार्केटमध्ये आलेत. त्यात काँटिनेंटल चवी आहेत. शिवाय भारतीयांच्या चवीनुसार चीझ स्प्रेड्स आहेत. याचा फायदा म्हणजे, त्यात फक्त वीस टक्के फॅट्स आहेत. म्हणजे चीझमुळे वजन वाढतं अशी जी काही भीती वाटते, त्यांना त्याची चिंता नको. शिवाय कॅल्शियम आणि मिल्क प्रोटीनही असतंच. म्हणजे चीझ खाण्याचे दुष्परिणाम नाहीत. भारतात साधं, क्रीम अशी चीझ आहेत. शिवाय स्प्रेड, चीझ श्रेडेड त्याचप्रमाणे चेडर, मॉज्झरेला, पार्मेझान यासारख्या अनेक प्रकारांमध्ये मिळणारे चीझ विशिष्ट पदार्थांसाठीच वापरलं जातं. म्हणजे अनेकांना पिझ्जासाठी मॉज्झरेला चीज वापरतात हे माहिती नसतं. किंवा चीजकेकसारख्या डेझर्टमध्ये सॉफ्ट चीझ वापरावं लागतं. कोणत्या पदार्थांत कोणतं चीज वापरायचं हे एकदा समजलं की झालं.
चीझपासून असंख्य पदार्थ बनवता येतात. आता तर आपल्याकडे वेगवेगळ्या चवींचे चीझ स्प्रेड्स आल्यामुळे सगळंच सोप्पं झालं आहे. चेज स्प्रेडमध्ये स्पायसी गार्लिक, पंची पेपर (काळ्या मिरीच्या स्वादाचे), जिरे अशा भारतीय स्वादांची, मेक्सिकन मिर्ची, टोमॅटो साल्सा यासारख्या आपल्याकडच्या वाढत्या मेक्सिकन खवय्यांसाठीचे चीज स्प्रेड सहज मिळतात. इतकंच नाही तर ट्रॉपिकल फ्रूट्स आणि चॉकलेट अशा स्वादांमधील चीझस्प्रेड मुलांना खूपच आवडतात. आता तर इटालियन आणि फ्रेंच हर्बच्या स्वादांचे स्प्रेड्स भारतात मिळू लागली आहेत. चीझ फ्रँकी, चीझ रोल, चीझबॉल्स, चीझ पराठा, यासारख्या शेकडो भारतीय पदार्थांमध्ये आता पनीरची जागा चीझने घेतली आहे. पिझ्जा, पॅनकेक्स इतकंच नाही तर चीझपाय, चीझचे गुलाबजामूनही रेस्तराँमध्ये मिळू लागले आहेत.
चीझ चिली टोस्ट.
ब्रेड स्लाइसेस, १ छोटा कांदा बारीक चिरलेला, २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या,१ लाल सिमला मिरची बारीक चिरलेली, बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेले चीझ आवडीप्रमाणे (मॉझ्झरेला जास्त चविष्ट लागतं.), अर्धा चमचा काळीमिरी पूड.
किसलेलं चीझ, कांदा, भोपळी मिरची, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर सगळे एकत्र करून घेणे. स्लाइसवर हे मिश्रण नीट लावून घ्या. त्यावर थोडी काळी मिरीपूड व आवडत असेल तर हर्ब पेरावे. २०० डीग्री सें वर प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये तयार ब्रेड स्लाइस ठेवून ८-१० मिनिटे भाजावे. ओव्हन नसल्यास तव्यावर भाजले की झाले टोस्ट तयार झाले.
चीझ प्रॉन्स
चीझ हे फक्त शाकाहारींसाठीच असतं असं म्हणणाऱ्यांनी काही नॉन-व्हेज पदार्थ बनवताना चीझ वापरायला हरकत नाही. त्यांच्यासाठी बेक्ड चीझ प्रॉन्स ही रेसिपी नक्कीच पिझ्जा इतकी टेस्टी ठरेल.
अर्धा किलो उकडलेले कोळंबी, दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून कुस्करलेले, पन्नास ग्रॅम्स चीज किसलेले (साधं), काळीमिरी पावडर, पाव चमचा हळद, एक चमचा घरगुती लोणी, एक चमचा चिली सॉस, एक चमचा सोया सॉस, एक कप चीज सॉस, अर्धा चमचा मीठ
कोळंबी चीज सॉसमध्ये घोळवा, त्यात काळी मिरी पावडर, हळद, मीठ आणि चिली सॉस त्यात मिक्स करा. त्यात कुस्करलेले बटाटे एकत्र करून घ्या. बेकिंग डिशला लोणी लावून त्यात मिश्रण केकसारखं लावून घ्या. दोनशे डीग्री प्री-हिट ओव्हनमध्ये पाच ते सात मिनिटे बेक करा. कोथंबिर, टोमॅटो, कांद्याच्या स्लाइसने सजवा.
चीझ-क्रॅकर्स :
१०-१२ क्रॅकर्स बिस्किटे, (खारी बिस्कीटे वापरली तरी चालतील), तयार हिरवी चटणी (ओला नारळ, थोडा जास्त पुदिना, कोथिंबीर, हि.मिरच्या, मीठ, लिंबाचा रस, चवीपुरती साखर एकत्र करून चटणी तयार करावी), चेरी टोमॅटो मधून कापून दोन भाग करणे, चेडर चीझचे तुकडे १/२ टीस्पून.
क्रॅकर्स बिस्किटांवर थोडी हिरवी चटणी लावावी. त्यावर चीझचे तुकडे लावावे व अर्धा चेरी टोमॅटो लावावा. चवीसाठी काही हर्ब वापरले तरी हरकत नाही.
↧
से चीझ...
↧