पुणे टाइम्स टीम
किचनची मक्तेदारी आता केवळ महिलांचीच राहिलेली नाही, तर तिथं पुरुषही लीलया वावरत आहे. रोजचा स्वयंपाक भले ते करत नसतील; पण पदार्थांबाबत विविध प्रयोग करायला त्यांना हमखास आवडतं. हीच गोष्ट एका सर्व्हेमधून पुन्हा अधोरेखित झाली आहे. हौस म्हणून ४० टक्के भारतीय पुरुषांना आठवड्याला बेकिंग करायला आवडत असून, त्यामध्ये केक, पिझ्झा आणि ब्रेड बनवणं ते जास्त पसंत करतात.
टीएलसी लाइफस्टाइल ट्रेंडनं भारतीय पुरुष आणि बेकिंग याबाबत नुकताच एक सर्व्हे केला असून, त्यातून पुरुषांच्या कुकिंग हौसेच्या काही रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. यासाठी ५०० पुरुषांना प्रश्न विचारण्यात आले होते. वाचायला आश्चर्य वाटेल; पण ४६ टक्के भारतीय पुरुषांना स्वतःच केक बनवून तो खाणं पसंत आहे. आता हे बेकिंग ते शिकतात कुठून या प्रश्नाला कुटुंब, बेकिंग क्लास, इंटरनेट, रेसिपी बुक आणि टीव्ही असे पर्याय दिले असता, त्यामधून टीव्ही बेकिंग शोला ५३ टक्के पुरुषांनी कौल दिलाय.
कुटुंबात राहताना एकमेकांच्या हृदयात जागा मिळवयाची असेल, तर त्याचा रस्ता पोटातून जातो असं म्हणतात. म्हणजे, मनं जिंकण्यासाठी खावो-खिलाओसारखा दुसरा चांगला पर्याय नाही. ४६ टक्के पुरुष हेच जाणतात आणि ते कुटुंबासोबत बेकिंगचा आनंद घेतात, असं सर्व्हे सांगतो. म्हणजे एकट्यानं किचनमध्ये बेकिंग करण्यापेक्षा कुटुंबातील इतर सदस्यासोबत गप्पा मारत बेक करणं त्यांना आवडतं.
बेकिंगच का?
मायक्रोव्हेव आणि इतर अद्ययावत साधनांच्या साहाय्यानं बेकिंगची क्रिया इतर स्वयंपाकाच्या पद्धतीपेक्षा सोपी आहे. तसंच, त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी मोठी नसते आणि त्यानुसार सामान जमा करणं किचकटही वाटत नाही. मोजके चार ते पाच जिन्नस व्यवस्थित एकत्र केले, तर झटपट आणि स्वादिष्ट असा पदार्थ तयार होतो. म्हणून पुरुषमंडळी बेकिंगचा सगळ्यांत जास्त आनंद घेतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट