उन्हाळ्यासाठी इतर थंडपेयांची कितीही नवी उत्पादनं बाजारात आली तरी थंडगार बर्फगोळा आणि सोड्याला पर्याय नाही. दर उन्हाळ्यात नवनव्या फ्लेवर्समध्ये येणारी गोळा आणि सोड्याची ही जोडगोळी कायमच हिट ठरली आहे.
मला एक जांभूळ द्या... काका त्या पेरूचे किती झाले?... ए पटकन ते अननस पास कर तिकडे....
हे संवाद काही फळबाजारातले नाहीत. तर सोड्याच्या दुकानातले आहेत. बाटलीतून फसफसून बाहेर येणारा सोडा जिभेवर फक्त झिणझिण्या आणायचा. पण आता मात्र हा सोडा विविध चवीढवींचा स्वाद घेऊन येताना दिसतो. आबा, लिंबू, जिरे, संत्र यासारख्या फळांसोबतच कच्ची कैरी, करवंद, जांभूळ, डाळिंब, अननस, लीची, स्ट्रॉबेरी, खस, ब्लू लगून, चिक्कू, आवळा, कोकम, पेरु अशा इतर फळांच्या स्वादाच्या सोड्याची मागणीही यंदा वाढली आहे. गंमत म्हणजे काकडी आणि गाजराच्या स्वादाचा सोडाही लोक आवडीने पीत असल्याचं दुकान मालक सांगतात.
तरुणाईला यंदा नैसर्गिक चवीने भुरळ घातली आहे. त्यामुळे फ्लेवर्ड सोडा पिण्याऐवजी फळांपासून बनवलेला सोडा पिणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत असल्याचं 'गारवा'चे मंदार पाध्ये सांगतात. इतकंच नव्हे तर घरी आलेल्या पाहुण्यांना साध्या सरबताऐवजी, सोड्यातून सरबत देण्याची नवीन कल्पनाही सध्या तेजीत आहे.
गोळा है सदा के लिए...
चम्मच गोळा, काडी गोळा, प्लेट गोळा अशा निरनिराळ्या प्रकारात मिळणारा बर्फाचा गोळा थेट बालपणात घेऊन जातो. आता बरेच प्रकार या बर्फाच्या गाडीवर आलेले दिसतात. मलई, मावा, बादशाही गोळा असे शाही स्वाद आता बर्फाच्या गोळ्यामध्ये मिळू लागले आहेत. अगदी ३० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत हा बर्फगोळा मिळतो. आईस्क्रीम फ्लेवर गोळा म्हणजे तर टू इन वन चवीची पर्वणीच. त्यात बटरस्कॉच, चॉकलेट, गुलाब असे भन्नाट स्वाद आहेत. तेही आपल्या बजेटमध्ये. यासोबतच पेप्सी, कोला, लेमन अशा चवीच्या गोळ्यांनाही चांगली पसंती मिळतेय.
संकलन - सुस्मिता दळवी, दीपश्री आपटे, स्वप्निल घंगाळे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट