जिभेवर हमखास चव रेंगाळेल, असा रानमेवा बाजारात दाखल होऊ लागला आहे. आंबट, गोड, तुरट अशा चवीच्या या रानमेव्यानं जणू अवघं रानच पक्व झालं आहे.
'डोंगरची काळी मैना.. आली हो'...अशी आरोळी घुमली, की घराघरांतून करवंद घेण्यासाठी लगबग उडायची. काळ्या मैनेचं हे कौतुक सध्या फक्त वाट्यावाट्यांनी मंडईत विकायला बसलेलं दिसतं. करवंदांसह बोरं, चन्यामन्या, रानजांभळं, आळू, आंबोळ्या, तोरणं, आमगुळे, रायआवळा अशा अस्सल मेव्यानं रान घमघमतं आहे. उपनगरीय भागातून थोडं बाहेर पडलात, की या रानमेव्याची मजा मनसोक्त लुटता येईल.
आंबा, फणस आणि करवंद या पलीकडचा रानमेवा हल्ली फारसा माहिती नसतो आणि खाल्लाही जात नाही. रानमेव्यातल्या प्रत्येक फळाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. हा रानमेवा गुणकारी तर आहेच; पण त्याची चव रसना तृप्त करणारीही आहे. आंबे, करवंद, फणस हे शहरात मिळतातच; पण आळू, रानजांभळं, आंबोळ्या, तोरणं यांचा आस्वाद घेण्यासाठी थोडंसं बाहेरही पडायला हवं. साधारण अक्षय तृतीयेनंतर ही फळं पक्व होऊन खाण्यासाठी उपलब्ध होतात. लाँग ड्राइव्हचा बेत आखला, तर पुण्याजवळच्या सगळ्या घाटमार्गांवर सध्या रानमेव्याचा तुम्हाला मनसोक्त आस्वाद घेता येईल.
काळी मैनाः डोंगरची काळी मैना हे करवंदाचं समर्पक नामकरण. कच्ची आणि पक्व करवंदं सध्या बाजारात दाखल झाली आहेत. लोहयुक्त करवंदं खाणं आणि त्याच्या चिकानं हात-तोंड माखून घेणं हा सगळ्यांच्याच आवडीचा उद्योग. कच्च्या करवंदाचं लोणचं भन्नाट होतं. पिकलेली करवंदं ही करवंदाच्या जाळीत जाऊन खाण्यातली मजा काही औरच.
तोरणं: सह्याद्रीत भटकणाऱ्यांना हे फळ अपरिचित नाही. सध्याच्या दिवसांत लालचुटूक रंगांचं हे फळ हमखास डोंगरदऱ्यात दिसतं. दिसायला चन्या-मन्यासारखं असणारं हे नाजूक फळ थोडसं पिठूळ असतं. याची भन्नाट चव चाखण्यासाठी रानवारी व्हायलाच हवी. अवचित जुन्या मंडईत एखादी आजी त्याचे वाटे विकताना दिसली तर तुम्ही नशीबवान.
आळूः आळूच्या झाडाची पानं ही पेरूच्या झाडासारखी असतात. त्यावर आळूची गोल-गोल फळं लागतात. पानशेत, वेल्हा, मुळशी, ताम्हिणी, भोर, वरंध या भागात रस्त्यावर ही फळं मुलं विकत असतात. ती दिसायला चिक्कूसारखी असतात. त्याची भन्नाट आंबट-गोड चव चाखायला हवीच. पौड, पिरंगुट, मुळशी किंवा भोर-वेल्हा, पानशेत या भागात आळू खायला मिळेल.
आंबा-फणसः आंबा आणि फणसाशिवाय रानमेव्याची यादी अपूर्णच. पक्व रायवळ आंबा बाजारात दाखल व्हायला काहीसा वेळ असला तरी घाडगा, खोबऱ्या, भोपळ्या या आंब्याचे पाड सध्या मंडईत दाखल झाले आहेत. कापा आणि बरका हे दोन्ही प्रकार मंडई आणि मार्केट यार्डमध्ये तुमची वाट पाहात आहेत.
आंबोळ्याः आंबोळ्या दिसताक्षणी तोंडला पाणी सुटतं, लांबट आकाराचं एखाद्या बीसारखं हे फळ या दिवसांत मिळतं. मावळात अजूनही विपुल प्रमाणात आंबोळ्यांची झाडं आहेत.
रानजांभूळः गावरान जांभूळ... चवीला हटकून गोड असणारी ही रानजांभळं आकारानं छोटी असतात. या जांभळात फारसा गर नसतो; पण ती औषधी असल्यानं खाल्ली जातात. त्यासह तुतीचे ढीगही गाड्यांवर सध्या विकायला आहेत. रसदार असं हे फळं खाताक्षणी जिभेवर जणू विरघळून जातं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट