पुणेकर १९८३ पासून या व्यवसायात आहेत. आधी हॉटेल उत्सव, मग ससूनमधील डॉक्टरांसाठी मेसचे डबे आणि नंतर २००४ पासून अय्यप्पा मंदिरासमोरील भवानी या साउथ इंडियन मेसची मॅनेजमेंट. पुढे एप्रिल २०११ पासून रास्ता पेठेत त्यांनी स्वतःची साउथ इंडियन मेस आणि स्नॅक्स सेंटर सुरू केलं नि दाक्षिणात्य मंडळींची मन जिंकण्यात ते यशस्वी झालेत.
सकाळी आठ-साडेआठ वाजल्यापासून नाश्त्याची लगबग सुरू होते. इडली, मेदूवडा, केशरी (म्हणजे गोडाचा शिरा), व्हेजिटेबल उपमा आणि व्हेन तसंच शर्करा पोंगल. व्हेन म्हणजे मीठ घालून केलेला आणि शर्करा म्हणजे स्वीट पोंगल. तांदूळ, मूगडाळ, काजू, जिरे, मिरे आणि तूप घालून बनलेला पोंगल चवीला एकदम टेस्टी.
साधारण बारापासून मिल्स मिळू लागतं. रात्री साडेनऊच्या सुमारास सगळा कारभार आटोपतो. जागा अगदी छोटी. दहा माणसं कशीबशी एकावेळी जेवायला बसतील इतकीच. त्यामुळे पार्सलवर विशेष जोर; पण तिथं बसून जेवण्यात असलेली मजा पार्सलमध्ये नाही, हे ताटं वाढायला लागल्यानंतर जाणवतं. रविवारी किंवा स्पेशल दिवशीच मिल्सला केळीची पान असतात.
सांबार, रस्सम, चटणी, दोन प्रकारच्या भाज्या, भरपूर अनलिमिटेड भात, ताक, दही, पापड आणि तळलेली मिरची. सांबर रोज वेगवेगळ्या प्रकारचं. कधी मुळा (बुळुंगी), टोमॅटो (तकाली), शेवगा (मुरुंगा), वंगायन (कांदा), कतरिका (वांगं), पुस्सनिका (भोपळा), परंगिका (तांबडा भोपळा) आणि मिक्स व्हेज सांबार... रस्सममध्येही व्हरायटी. टोमॅटो रस्सम, जिरा, कांदा-लसूण आणि किसलेल्या नारळाचं म्हैसूर रस्सम. भाज्यांमध्ये बीटरूट, गाजर, तांबडा भोपळा, बटाटा, पडवळ आणि सात प्रकारच्या भाज्या वापरून केलेली मिक्स भाजी (अवियल). कोशिंबीर, नारळ चटणी आणि स्पेशल टोमॅटो चटणी.
रविवारी विशेष जेवण असतं तेव्हा डाळवडा (परिप्पू वडा), मसाला वडा किंवा छोटा उडीद वडा यापैकी एकाची उपस्थिती असते. अवियलसह तीन भाज्या. साध्या भाताच्या संगतीला लेमन, कोकोनट, टोमॅटो किंवा पुलिओग्रे यापैकी एकासाठी राखीव जागा असते. शिवाय शेवई, सादम (भात) किंवा पाल पायसम (नारळाचे दूध) यापैकी एक गोड खीर आपल्या दिमतीला हजर असते. दक्षिणेत मिळतं तसंच अगदी घट्ट आणि दाट सांबार. परवा होतं टोमॅटो आणि कांद्याचं सांबार आणि म्हैसूर रस्सम. जिरे, मिरी, किसलेलं खोबरं आणि डाळीचं पाणी. यामुळे नेहमीच्या रस्समपेक्षा थोडं दाट.
पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असलेली तळलेली मिरची आणि टोमॅटो चटणीही समाधान देऊन जाते. मसाला भरून, दह्यात बुडवून नंतर वाळवून तळलेली ही मिरची हवीहवीशी वाटते. तशीच टोमॅटोची चटणी. टोमॅटो, कांदा आणि कोबी... सोबतीला तिखट-मीठ. ही चटणी पुन्हा पुन्हा मागवून खाल्ली नाही तरच नवल.
दोन-तीन वेळा दोन-दोन उलथने भात घेतल्यानंतर खरा दाक्षिणात्य जेवणाचा चाहता पूर्णविरामाकडे वळतो. (वाढताना एकदाच भात वाढू नये. दोनदा वाढावा, असे तमिळ खाद्यशास्त्र सांगते, हा सुखदेव पुणेकर यांचा दावा.) तुम्ही कॉफीचे निस्सिम भक्त असाल, तर मग स्ट्राँग कॉफी घेतल्याशिवाय तिथनं तुमचा पाय निघणं कठीण आहे. जेवणानंतर कॉफी उत्तम की नाही, वगैरे विचार करण्याच्या फंदात पडू नका. गर्रमागर्रम कॉफीचे घोट रिचवूनच सुखदेव पुणेकरांना 'नन्ड्री' म्हणून धन्यवाद द्या...
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट