श्रावणात पाचूच्या हिरवळीने जसा नेत्रसुखाचा आनंद मिळतो, तसा श्रावण वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या संगतीत जिव्हासौख्याचाही अनुभव देतो. पण वर्षागणिक श्रावण साजरा होण्याच्या पद्धतीत बरेच बदल झाले आहेत. हे बदल व्रतवैकल्यांपासून बदलेल्या खाद्यसंस्कृतीपर्यंत घडले आहेत. एकत्र कुटुंब विभक्त झाली. त्यामुळे नव्या पिढीला जुन्या पदार्थांची ओळख करून देणारा काळाचा दुवा नाहीसा झाला आणि त्यात बरेचसे पदार्थही नामशेष झाले.
श्रावणी सोमवारची सुरुवात उपवासापासून होते. साजूक तुपातील साबुदाण्याची गरमागरम खिचडी, ताजे सायीचे घट्ट दही, उपवासाचे खमंग थालीपीठ व लोण्याचा पांढराशुभ्र गोळा. नुसत्या आठवणीने जीव सुखावतो. पण श्रावणातील खाण्यातील गंमत इथेच संपत नाही.
श्रावणी सोमवारच्या अशा अनेक आठवणी तुम्हा प्रत्येकाच्या मनात ताज्या होत असतील. श्रावणात उपवासाच्या दिवशी उपवास सोडताना जेवण केळीच्या पानावर होत असे. आजही श्रावणातील सोमवारी काही घरात केळ्याच्या पानावर जेवण होतं. हिरव्यागार केळीच्या पानावर गरम पिवळ्याधम्मक वरण-भाताची मूद, कैरीच्या लोणच्याचा लाल तवंग, कुरडयांची पांढरी नक्षी, बटाट्याची सुकी भाजी किंवा काचऱ्या, ताक, घडीच्या पोळ्या अशा पदार्थांनी श्रावणातलं ताट बाहेरील हिरवळीप्रमाणेच पोटाला आणि जिभेला देखील तृप्त करत असे. याच्या जोडीला कधी निनावं, पाच खिरी, खापरोळ्या, भोपळ्याची खीर, असे एक ना अनेक पारंपरिक पदार्थ जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी तयार असत, परंतु आजच्या व्यग्र जीवनशैलीत ते शक्य नाही. मुळात हे पदार्थ बनवण्यासाठी आवड आणि कौशल्य लागते. त्यामुळे हल्ली, कुठे एवढा घाट घालायचा? म्हणत या पदार्थांकडे काहीसं दुर्लक्ष होतं.
पूर्वी श्रावणात वेगवेगळे गोड पदार्थ केले जायचे. त्यामुळे दर सोमवारी आणि शनिवारी वेगळा पदार्थ ताटात दिसायचा. नुसते गोडाचे पदार्थ नाही, तर भजी, वडे यांसारखा एखादा पदार्थही पानात हक्काने मिरवायचा. भाताच्या प्रकारातही वैविध्य असे. मसाले भात, काजू घालून केलेला तोंडली भात, नारळी पौर्णिमेला आवर्जून केलेला नारळी भात, साखर भात हे सर्व श्रावणातील पंगतीचे मानकरी होते. एखाद्या सोमवारी पुलाव किंवा पंचभेळी आमटी, दाट पिवळ्या रंगाची आंबटगोड कढी आणि मुगाची खिचडी किंवा भात, पापड, असं सुग्रास जेवण केल्यावर वामकुक्षी अपरिहार्य असे.
मुळातच श्रावण महिना संपूर्णपणे सण-उत्सावांचाच असल्यामुळे श्रावणात अशा उपवासाच्या आणि बिन उपवासाच्या पदार्थांची अगदी रेलचेल असे. ज्येष्ठातील अमावस्या म्हणजेच दिव्याची अमावस्या झाली की, श्रावण सुरू होतो आणि पहिला मोठा सण येतो, तो अर्थातच नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी सर्वसाधारणपणे उकडलेले पदार्थच करण्याची प्रथा आहे. त्यामुळे नागपंचमीला काही ठिकाणी 'दिंडं', 'पात्या', 'धोंडस' केले जातात. हे तीनही पदार्थ एकच. त्यातील मूळ पदार्थही एक, परंतु प्रांत बदलले की, पदार्थांची नावं बदलतात. काही ठिकाणी 'शेंगा' म्हणजेच उकडीच्या करंज्या केल्या जातात. दिंडं करताना पुरण न वाटता पळीने घोटून बारीक करतात आणि मोहन घालून घट्ट भिजवलेल्या कणकेच्या पुर्या लाटून त्यात पुरण भरून सगळ्या बाजूंनी दुमडून चौकोनी आकार देतात आणि उकडतात. त्याच कणकेच्या नुसत्या उकडलेल्या पुर्यांना 'पात्या' म्हणतात, नागपंचमीच्या नैवेद्यात दिंडं, पात्या आणि फरसबीची भाजी हे मुख्य पदार्थ असतात. नैवेद्याला शेंगा असतील तर त्या सोबत बिरडं घातलेली अळूची भाजीही आवर्जून केली जाते. नागपंचमीनंतर येणार्या श्रावण षष्ठीला कोकणात पातोळे किंवा पानगी करण्याची पद्धत आहे. तांदळापासून केली जाणारी ही पानगी हळदीच्या पानात उकडली जात असल्यामुळे त्यांना वेगळाच स्वाद येतो. त्यानंतर येते ती शिळा सप्तमी. या दिवशी 'सांदणी' हा विशेष पदार्थ केला जातो. तांदळाचा रवा भाजून त्यात नारळाचं दूध, गूळ, जायफळ, वेलची वगैरे घालून, वाफवून सांदणी तयार करतात. त्यासोबत नैवेद्यासाठी अळूवडी आणि वालाचं बिरडंही असतं. सीकेपी समाजात शिळासप्तमीला वडाच्या फांदीची पूजा करतात आणि नैवेद्याचे थोडे थोडे पदार्थ पाण्यात सोडतात.
श्रावणात वेगवेगळ्या प्रकारची व्रतं केली जात असल्यामुळे उपवासही पुष्कळ असतात. श्रावणी सोमवार आणि शनिवारचा उपवास तर हमखास केला जातो. उपवासाचे पदार्थ आपल्याला माहीत असतात किंवा आजकाल त्यात नवनवे प्रयोगही होत असतात, पण श्रावणातील उपवास सोडण्यासाठी देखील वेगवेगळे पदार्थ केले जातात. कधी नेहमीची मुगाची खिचडी, कधी बिरडं घातलेली खिचडी तर कधी ओला वाटाणा घातलेली खिचडी रात्रीच्या जेवणात केली जाते. त्यानंतर गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी हा श्रावणातला महत्त्वाचा दिवस येतो. या दिवशी अर्थातच दही, पोहे, लाह्या इ. एकत्र करून केलेला काला नैवेद्याला असतो. त्याशिवाय 'भरली केळी' हा पदार्थही असतो. अत्यंत चवदार असा पदार्थ करण्यासाठी पिकलेल्या राजेळ्या केळ्यांना मागून छेद देतात. मोदकासाठी करतो तसं सारण करून ते केळ्यात भरतात आणि पातेल्यात तुपावर ठेऊन वरून दूध शिंपडतात. याला वाफ दिली की भरली केळी तयार! भरल्या केळ्याबरोबरच कांदा भजी आणि ओल्या वाटाण्याची खिचडी हा खास नैवेद्य असतो. श्रावण पौर्णिमा आणि श्रावण अमावस्या यांनाही विशेष महत्त्व आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा, त्यामुळे या दिवशी सर्रास नारळीभात किंवा ओल्या नारळाच्या करंज्यांचा मेन्यू असतो. तर श्रावण अमावस्या म्हणजेच मातृदिनाला मात्र वेगवेगळे पदार्थ केले जातात. 'निनावं' हा पदार्थदेखील या दिवशी करण्याची पद्धत आहे. अशाच काही पारंपरिक पदार्थांसह यंदाच्या श्रावणात विस्मरणात गेलेल्या पदार्थांना पुन्हा उजळा देऊन श्रावणाचा खऱ्या अर्थाने आनंद लुटायला हवा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट