महेश विचारे
उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या की, बैठ्या घरांच्या कौलांवर, इमारतींच्या गच्चीवर, पाण्याच्या टाकीवर स्टीलच्या ताटांमध्ये सुकत ठेवलेल्या पोळ्या आपलं लक्ष वेधून घेतात. त्यासोबत असे अनेक पदार्थही कधी पातळ अशा कपड्यांवर, चादरींवर ठेवलेले दिसतात. उन्हाळ्यात अशा पदार्थांची नेहमीच रेलचेल असते.
आता शहरात घरगुती तयार केलेले खाद्यपदार्थ फारसे पाहायला मिळत नाहीत तसंच त्याबद्दलचं तेवढं आकर्षणही राहिल्याचं दिसत नाही. कारण जमानाच बदलला आहे. आज आंबा पोळी, फणस पोळी, मुरंबे, लोणची असे पदार्थ तयार मिळत असल्यामुळे ते घरी करून पाहण्याची तसदीही कोणी घेत नाही, असे पदार्थ बनविण्याची परंपराही मागे पडत चाललेली दिसते. तरीही उन्हाळ्यात हे पदार्थ बनविण्याची परंपरा काही ठिकाणी विशेषतः गावात सुरूच असते. बाहेर उपलब्ध असले, तरी घरात बनविलेल्या या पदार्थांची चव काही औरच असते. त्यामुळे जिथे चाळी, बैठी घरं, छोट्या इमारती आहेत, अशा ठिकाणी हे पदार्थ अजूनही सुकत घातल्याचं दिसतं.
आंबापोळी
उन्हाळ्याचे दिवस म्हणजे आंबा- फणसाचा हंगाम. शाळांना सुट्ट्या लागल्या की, अनेकांचे पाय वळतात ते गावाकडे. विशेषतः कोकणात आंब्यांपासून बनणाऱ्या अनेक पदार्थांची चव चाखण्याची संधी यानिमित्ताने मिळते. घरात बनवलेले, रासायनिक प्रक्रिया किंवा पदार्थांची सरमिसळ न केलेले पदार्थ खाण्यात वेगळीच मजा असते. त्यातच घरच्याच कलमांचे किंवा रसाचे आंबे मिळाले तर पर्वणीच. घरात साठवून ठेवलेल्या या आंब्यांपासून मग साठं बनवायला सुरुवात होते. काही आंबे खाण्यालायक नसतात. मार लागलेले, थोडे खराब झालेले आंबेही अशी साठं घालायला उपयुक्त ठरतात. त्यांचा खाण्यालायक भाग वेगळा करून त्याच्या रसापासून ही साठं तयार करता येतात. दुकांनामध्ये मिळत असलेल्या आंबापोळ्यांमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. शिवाय, बराच काळ टिकविण्यासाठी त्यात रसायनंही घातलेली असतात. अर्थात, त्यांच्या चवीत तोचतोचपणा असतो. त्यामुळेच केवळ आंब्याच्या रसापासून घरातच बनवलेली साठं खाण्याची मजा वेगळीच असते.
कृती - हापूस अथवा रसाच्या आंब्यांपासून रस काढून घ्यावा. त्यात वेलची पूड, थोडं मीठ, साखर टाकून तो रस स्टीलच्या थाळीला तूप लावून कडक उन्हात सुकत ठेवावा. त्यावर एखादा पातळ कपडा टाकावा. वरचा भाग सुकल्यानंतर पोळी उलट करून पुन्हा उन्हात सुकण्यासाठी ठेवावी. चांगली सुकल्यानंतर त्याचे छोटे भाग करावेत आणि प्लॅस्टिक पिशवीत किंवा चपट्या स्टीलच्या डब्यात बंद करून ठेवावेत.
खास आमरस
आमरस आता १२ महिने उपलब्ध असतो. विशेषतः सणासुदीला, लग्नाच्या हंगामात याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. तरीही आंब्याच्या हंगामात घराघरात हा रस बनविण्याची परंपरा आहेच. रसाचे आंबे किंवा हापूस आंब्यांपासून हा रस बनवणं अगदी सोपं असतं. फ्रीजमध्ये थंड करून चपाती किंवा पुरीसोबत या रसाचा आस्वाद घेता येतो.
कृती - चार ते पाच हापूस आंबे किंवा ७-८ आंबे छोटे रसाचे आंबे घेऊन ते पिळून घ्यावेत. त्याआधी, त्यांचे देठ काढून त्यातला चीक स्वच्छ करणे आवश्यक. घशाला तो त्रासदायक ठरतो. आंब्याचा रस घेतला की, त्यात थोडी साखर, मीरपूड, केसर वगैरे टाकून तो फ्रीजमध्ये थंड करायला ठेवावा. हापूस आंबे असतील, तर त्यातील गर थोडा जाड असतो. तो व्यवस्थित पातळ करून घेता येईल. पण आमरसात थोडा घट्टपणा असला पाहिजे.
फणसपोळी
कोकणात आंब्याच्या सोबतीला सगळे जरूर आस्वाद घेतात तो फणसांचा. विशेषतः घराभोवती फणसाची अनेक झाडे असल्याने हमखास फणस खायला मिळतो. त्यातल्या बरक्या फणसापासून केलेल्या फणस पोळ्या उन्हाळ्याच्या दिवसात खायला मिळतात. दुकानात आंबापोळी हमखास मिळत असली, तरी फणसपोळीची तेवढी क्रेझ नसावी. पण आंबापोळीप्रमाणेच फणसपोळी खाण्यातही वेगळी मजा आहे.
कृती - फणसातले रसरशीत गरे काढून त्यातल्या बिया म्हणजे आठळ्या बाजूला काढाव्या आणि त्या गऱ्यांचा रस चांगला पिळून ताटात काढून घ्यावा. त्यात थोडी साखर घालून ताटात पसरावा आणि उन्हात ही पोळी सुकवावी.
या फणसातल्या आठळ्यांचाही उपयोग आहेच. सुकवलेल्या आठळ्या भाजून खाता येतात तसेच त्या उकडूनही त्यांची चव चाखता येते. आठळ्यांची भाजीही छान होते. फणसाच्या हंगामात ही मजा लहानमोठ्यांना नक्की घेता येईल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट