श्रीखंड डोनट
एरव्ही गरमागरम वाफाळत्या डोनटवर वितळलेलं चॉकलेट घालून अनेक कॅफेमध्ये सर्व्ह केलं जातं. पण जुहूच्या ‘इंग्लिश व्हिंग्लिश’ या कॅफेमध्ये चक्क देशी स्टाइलचा डोनट सर्व्ह केला जातो. तो म्हणजे श्रीखंड फ्लेव्हरचा. डोनटच्या आत श्रीखंडाचं स्टफिंग आणि त्यावरही श्रीखंड घालून हा डोनटचा प्रकार सर्व्ह केला जातो.
पान कपकेक विथ गुलकंद
ग्रँट रोडचं ‘द नेक्स्ट डोअर बेकर’ हे स्टार्ट अप सध्या चांगलंच गाजतंय. इथं मिळणाऱ्या सगळ्या बेकरी पदार्थांमधील खासियत म्हणजे ‘पान कपकेक विथ गुलकंद’. शरीराला थंडावा मिळवून देण्यास मदत करणाऱ्या गुलकंदाचं स्टफिंग असलेल्या या पान कपकेकची तरुणाईमध्ये जबरदस्त क्रेझ आहे.
मोतीचूर रबडी पारफेट
मोतीचूर किंवा रबडी हे दोन पदार्थ आवडणारे अनेक आहेत. अशांसाठी ‘मोतीचूर रबडी पारफेट’ हा पर्याय उत्तम आहे. ग्लासामध्ये एकावर एक थर रचत मोतीचूर आणि रबडी टाकली जाते. त्यावर ड्रायफ्रूट्सचे बारीक तुकडे टाकून ते सर्व्ह केलं जातं. असा हा अप्रतिम पदार्थ दादर पश्चिम येथील ‘अंग्रेजी धाबा’ येथे मिळतो.
रोझ गुलकंद स्टीक्स
लहानपणी शाळेतून घरी येताना ५० पैशाला मिळणाऱ्या कोलाच्या कांड्यांचा अस्वाद घेणं, हा अनेकांचा शिरस्ता असायचा. याच कोला कांडीमध्ये रोझ गुलकंद स्टीक्सची भर पडली आहे. शरीराला थंडावा देणारा गुलकंद हा रोझ सिरपमधून घालून त्यापासून या स्टीक्स बनवल्या जातात. माटुंगा येथील ‘कोल्डप्ले’ या कॅफेमध्ये या अनोख्या स्टीक्स मिळतात.
पनीर जिलेबी
ठाण्यातील सुप्रसिद्ध ‘प्रशांत कॉर्नर’ येथील सर्वच पदार्थ चवीनं लाजवाब असतात. याच ठिकाणी मिळणारी ‘पनीर जिलेबी’ हा फ्युजन मिठाईचा एक प्रकार आहे. मऊसर जिलेबीवर केशर घालून ती सर्व्ह केली जाते. हा अनोखा जिलेबीचा प्रकार विकत घेण्यासाठी खवय्यांची नेहमीच गर्दी असते.
संकलन- शब्दुली कुलकर्णी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट