चीज कॉर्न कॅप्सिकम मोमोज
दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये नव्यानेच थाटण्यात आलेलं ‘मोमज फॅक्टरी’ मोमोज मधील वैविध्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र नेहमीच्या मोमज पेक्षा थोडा वेगळा त्रिकोणी आकार, त्याला करंजीसारखी घातलेली दुमड, किसलेलं चीज, कॉर्न आणि त्याला हलकासा स्वाद देणारी बारीक चिरून टाकलेली सिमला मिर्ची... यापासून बनलेले इथले चीज कॉर्न कॅप्सिकम मोमोज एकदम भन्नाट!
फ्राइड मोमज
गाजर, कोबी, फरसबी अशा भाज्यांचं सारण आणि वरून मैद्याची मोदकासारखी वळलेली पारी हा आहे पारंपरिक मोमोजचा थाट! नरिमन पॉइंट परिसरातील ‘वॉव मोमोज’मध्ये असे फ्राइड मोमज मिळतात. कुरकुरीत पारी आणि तेलाच्या वाफेवर अर्धवट वाफवलं गेलेलं सारण, यामुळे हे मोमोज खवय्यांच्या तोंडाला पाणी आणतात.
मिक्स व्हेज मोमोज
मोमोजसोबत दिल्या जाणाऱ्या विविध चटण्या, सॉससुद्धा खवय्यांसाठी महत्त्वाचे असतात. अंधेरी डी. एन. नगर परिसरात असलेलं ‘डिमसम मोमोज’ यासाठीच प्रसिद्ध आहे. इथे मिळणारे मिक्स व्हेज (स्टीम) मोमोज प्रसिद्ध आहेत. या पांढऱ्याशुभ्र रंगाच्या मोमज बरोबर मस्टर्ड सॉस आणि स्पेशल स्पायसी सॉस दिला जातो.
अचारी पनीर मोमोज
भांडुप परिसरात असणारं ‘अॅपेटाइट मोमोज’ कॉलेज विद्यार्थ्यांसाठी हक्काचं ठिकाण. मैद्याची पारी, किसलेलं पनीर आणि त्यासोबत देशी लोणच्याचा स्वाद म्हणजे एक अजब-गजब कॉम्बो आहे. मोमज सोबत पांढरा सॉस, लाल आणि हिरवी चटणी असा थाट खवय्यांना बघायला मिळतो.
पनीर मोमोज
लाल मिर्ची, कांदा, आलं, लसूण यांपासून बनवलेली लालेलाल चटणी आणि समोर वाफेवर शिजणारे पांढरे मोमोज वरळी मधील खवय्यांना ‘देव मोमोज’कडे खेचून आणतात. इथे मिळणारे पनीर मोमज प्रसिद्ध आहेत. ताजं, लुसलुशीत किसलेलं पनीर, वरील मैद्याच्या पारीसह शिजलं की अजूनच मऊसूत होतं. तोंडात ठेवल्यावर विरघळत जाणारा हे पनीर मोमोज खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहेत.
संकलन - मेघना अभ्यंकर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट