...
नवीन वर्षाची पार्टी असो किंवा सहज मित्रांसोबत ठरलेला नाइट आऊटचा प्लॅन. सर्वच भेटींमधला प्रमुख पाहुणा म्हणजे थेट इटलीतून आलेला पिझ्झा! दोन वेगळ्या देशांतील चवींचा मेळ साधणारा हा फ्युजन पिझ्झा बनवणारी मुंबईतील ही अस्सल पाच ठिकाणं...
...
पावभाजी पिझ्झा
लोअर परळ भागातील कॉर्पोरेट ऑफिसच्या गर्दीत 'रोलिंग पिन' कॅफेमध्ये मिळणारा 'बॉम्बे स्पाइस पिझ्झा' हा पिझ्झा प्रेमींची पहिली पसंती म्हणता येईल. कॅफेमध्येच तयार केला जाणारा पिझ्झा बेस व त्यावर बॉम्बे स्टाईलची भाजी व वरुन चीजने सजलेला हा पिझ्झा खाताना खरोखरच चौपाटीवर बसून पावभाजी खाल्ल्याचा आनंद घेता येतो.
...
डोसा पिझ्झा
घाटकोपरच्या खाऊ गल्लीची ओळख मानला जाणारा 'डोसा पिझ्झा' हा कमी दरात जिभेचे चोचले पुरवण्याचा लोकप्रिय मार्ग आहे. दक्षिण भारताची खासियत असणाऱ्या या डोशाच्या बेसवर विदेशी भाज्या तसेच चीज, चिली फ्लेस, घालून बनवला जाणारा हा 'पिझ्झा डोसा' पारंपरिक नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह केला जातो.
...
चाट पिझ्झा
चाट की पिझ्झा? असा प्रश्न पडणाऱ्यांसाठी अंधेरीच्या लोखंडवाला परिसरातील 'ग्लोकल' मधला 'चाट पिझ्झा' हे योग्य उत्तर आहे. चाट पापडीच्या बेसवर चीज, पास्ता, ऑलिव्ह, हॅलपीनो टाकून त्यावर बारीक शेव व चाट मसाला घालून हा पिझ्झा बनवला जातो. मुंबईच्या गल्लोगल्ली मिळणाऱ्या चाटचं हे इटालियन रूप खवय्यांच्या भलतंच पसंतीस उतरलं आहे.
...
मॅग्गीझा
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची 'मेरी मॅगी' पवईतील 'द हंग्री हेड कॅफे'त मिळणाऱ्या प्रत्येक पदार्थाचा मुख्य भाग आहे. मॅगी व पिझ्झा या दोन्हींच्या चाहत्यांसाठी बनवलेलं कॉम्बिनेशन म्हणजेच 'मॅग्गीझा' हा वेगवेगळ्या पदार्थांना एकत्र करून बनवला जातो. त्यातही ओये पंजाबी मॅग्गीझा हे ऍरबीटा सॉस, पनीर टिक्का, चीज आणि मॅग्गी यांचं अनोखं समीकरण तरुणाईमध्ये हिट आहे.
...
शॉरमा पिझ्झा
फास्ट फूडच्या यादीत अलीकडे प्रवेश घेतलेल्या शॉरमाचं शाकाहारी व इटालियन व्हर्जन नवी मुंबईतील वाशीच्या 'फलाफल' या कॅफेमध्ये सर्व्ह केलं जातं. लेबनिज पिटा ब्रेड, त्यावर पनीर टिक्का, फ्रेंच फ्राइज, व खूप चीज टाकून बेक केलेला 'पनीर शॉरमा पिझ्झा' हा सर्वाधिक मागणीचा पदार्थ आहे. या कॅफे मध्ये बनणारे लेबनिज सॉस या शॉरमा पिझ्झाला खऱ्या अर्थाने चवदार बनवतात.
संकलन : सिद्धी शिंदे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट