...
उमेश टेकाडे
नागपूर ही खवय्यांचीही नगरी आहे. येथे प्रत्येक प्रांताच्या पदार्थांपासून देशी-विदेशी पदार्थ उपलब्ध आहेत. तेजतर्रार सावजी ही नागपूरची विशेष ओळख. प्रत्येक चौकाचौकात खाद्यपदार्थांच्या गाड्या खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी भल्या सकाळी तयार असतात. छोट्या टपऱ्यांपासून ते थेट तारांकित हॉटेलांनी नागपूरची ही खाद्यसंस्कृती जपली आहे. तिखटजाळ तर्री ही नागपूरची ओळख आहे आणि आजकाल ही तर्री पोह्यांसोबतही सर्रास मिळते. याहीउपर आणखी काही पदार्थ आहेत, नागपुरी म्हणून ओळख निर्माण केलेले. यात इतवारीचा कांजीवडा. सव्वालच नाही!
कांजीवडा हा मूळ राजस्थानी आहे. मात्र नागपूरच्या खाद्यसंस्कृतीत एकरूप झाला आहे. इतवारीतील वैशाली साडी सेंटर समोर शुक्ला रेस्टॉरंन्ट आहे. तेथे या अस्सल पारंपरिक कांजीवड्याची चव आपण चाखू शकतो. रेस्टॉरंन्ट असले तरीही येथे चार ते पाच जणांची बसण्याची सोय आहे. मात्र कांजीड्यासाठी वाट बघणाऱ्यांची संख्या कमी नसते. शुक्ला यांची तिसरी पिढी आता या व्यवसायात आहे. गजेंद्र शुक्ला सध्या व्यवसाय सांभाळत आहेत. साधारण पन्नास वर्षांपूर्वी त्यांचे वडील उत्तर प्रदेशातून नागपुरात आले. ठेल्यावर खाद्यपदार्थांची विक्री करता करता येथील खवय्यांना त्यांच्या पदार्थांची चटक लागली. चारचाकी ठेला घेऊन फिरणाऱ्या शुक्लांना शोधताना खवय्यांची अडचण व्हायची. त्यामुळे परिसरातील व्यापारी व अन्य ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांनी इतवारीत जागा घेतली व व्यवसाय सुरू केला.
आमच्याकडे मिळणारा कांजीवडा नागपुरात कुठेही मिळत नाही, असा शुक्लांचा दावा आहे. राजस्थानात कांजीवडा हा सकाळच्या न्याहारीचा मुख्य पदार्थ असतो. राजस्थानी पदार्थ असला तरीही आता देशभरात हा पदार्थ उपलब्ध आहे. मुगाच्या डाळीचे वडे व कांजी (मोहरीची डाळ, मिठ व पाणी) ही दोन जिन्नस योग्य मापात एकत्र आले की झाला कांजीवडा तयार. तेलकट नाही तिखट नाही. असा हा कांजीवडा मसालेदार खाणाऱ्यांना मिळमिळीत वाटेल, मात्र त्याची चव एकदा चाखायला हरकत नाही. मुगाच्या डाळीचे वडे तयार करण्याची पद्धतही अत्यंत वेगळी आहे. कांजीचे पाणी दोन ते तीन दिवस आधी करावे लागते. ते जेवढे मुरेल तेवढी त्याची चव व लज्जत वाढते. उन्हाळ्यात अत्यंत फायदेशीर असला तरीही कांजीवडा आता वर्षभर खाल्ला जातो. होळीच्या दिवशी याची विशेष मागणी असते, असे गजेंद्र शुक्ला सांगतात. रविवार सुटीचा दिवस सोडला तर रोज सकाळी साडेअकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत तुम्हाला येथे कांजीवडा मिळेल. कांजीवड्यासोबतच मावा गुलाबजाम ही शुक्ला यांची खासियत आहे. कांजीवडा खाल्यानंतर गोड खाण्याची इच्छा झाल्यास खोवा व ड्रायफ्रूटपासून तयार करण्यात आलेल्या मावा गुलाबजामची चवही येथे तुम्ही चाखू शकता. कांजीवड्यासोबच येथे बटाटा भजी, मुग पकोडे यांची चवही घ्यायला हरकत नाही. इतवारीत जाणे झाले तर एकदा या कांजीवड्याची चव नक्की चाखा.
umesh.tekade@timesgroup.com
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट