अभिनेत्री
‘अगं, गायत्री शिकून घे स्वयंपाक, पुढं कसं होईल गं तुझं,’ असा घोशा आईनं कधीच लावला नाही. स्वयंपाकघरात मला फारसं रमायला आवडत नसलं, तरी वेळप्रसंगी मी स्वयंपाक उत्तम बनवू शकते. शूटिंगच्या निमित्तानं पुण्याहून मुंबईला आल्यावर त्याचा मला पुष्कळ फायदा झाला आणि होतोय. एक मात्र आहे, दिवसभर दगदग, धावपळ करून रात्री थकून-भागून आल्यावर स्वयंपाकघरात रांधायला मला फारसा रस नसतो. चहा मी फर्मास बनवते.
माझी आई उत्तम स्वयंपाक करते. गोड वरण-भात, वेगवेगळ्या आमट्या, उसळी, गरमागरम घडीच्या पोळ्या खाव्यात, तर आईच्या हातच्याच. मुंबईत असल्यामुळे आईचा स्वयंपाक आणि पुण्यातले फूड जॉइंट्स मी खूप मिस करते. ‘वैशाली’मधली एसपीडीपी, म्हैसूर चीज साधा खाता-खाता रंगलेल्या मित्रमंडळींसोबतच्या मैफली सतत आठवत राहतात. इटालियन खायचा मूड झाला, तर ‘लिटिल इटली’ला आम्ही जातो. कोथरूडच्या ‘बॅरोमीटर’मध्ये वेगवेगळ्या फूड डिशचा आस्वाद घ्यायला मला खूप आवडतं. खूप छान-छान आणि स्वादिष्ट प्रयोग करतात तिथं डिशचे. कबाब खायचा मूड झाला, तर कुलाब्याच्या ‘बडेमियां’ला आवर्जून भेट देते. चविष्ट आणि दर्जेदार मासे खायचे असतील, तर पार्ल्याचं ‘गजाली’ आणि जुहूच्या ‘महेश लंच होम’ला पर्याय नाही. तिथले लॉबस्टर आणि क्रॅब निव्वळ लाजवाब. गोरेगावच्या दिंडोशीमधलं ‘पॉट दे फ्युजन’ हेसुद्धा हटके फूड जॉइंट आहे. मी ‘प्रोफेशनल ट्रेकर’ असल्यानं अनेकदा ट्रेकिंगला जाताना ‘मनाली’मधील मयूर या हॉटेलमध्ये मिळणारा ‘ट्रोउट’ नावाचा तंदूर केलेला मासा ‘सिंपली क्लास’ लागतो. जगाच्या पाठीवर फिरूनही ती डिश नाही मिळायची.
शब्दांकन : निनाद पाटील
दही बटाटा
साहित्य : उकडलेले छोटे बटाटे साधारण पावशेर, तमालपत्र ३, मिरी दहा ते बारा, लवंगा पाच ते सहा, दालचिनी एक इंच लांबीचे दोन तुकडे, बेडगी मिरची दोन, दही -पावशेर, नारळाचा चव तीन चमचे, दाण्याचा कूट एक टेबल स्पून, बारीक चिरलेली कोथिंबीर, आवडीनुसार, साखर आणि मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल.
कृती : प्रथम कढईत तेल गरम करा. उकडलेले बटाटे तांबूस रंगावर तळून बाजूला ठेवा. निम्मं दही आणि दाण्याचा कूट मिक्सरमध्ये एकजीव करून घ्या. दुसऱ्या कढईत दोन टेबल स्पून तेल गरम करा. त्यात मिरी, लवंगा, दालचिनी, तमालपत्र आणि मिरचीचे तुकडे घालून फोडणी करा. त्यावर दही आणि कुटाचं मिश्रण घाला. मग उरलेलं दही, नारळाचा चव, साखर आणि मीठ घालून मंद आचेवर ढवळा. नंतर त्यात तळलेले बटाटे आणि कोथिंबीर घालून ढवळा. झाकण ठेवून पाच मिनिटांनी गॅस बंद करा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट