आपण बहुतेकदा ढोकळ्यासाठी बेसन किंवा रवा यांचा जास्त वापर करतो. एक ग्रामीण भाग सोडला तर ज्वारीचा वापर आपल्याकडे तसा कमीच होतो. तेव्हा ज्वारीच्या पिठापासून बनवलेला ढोकळा जरुर करुन पाहावा. त्यासाठी पाककृती पुढीलप्रमाणे...
साहित्य- एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धा वाटी दही, आलं-मिरचीची पेस्ट, मीठ, हवी असल्यास चिमूटभर साखर, मोहोरी, तीळ, कोथिंबीर, एक चमचा फ्रूट सॉल्ट.
कृती- प्रथम एका पसरट भांड्यात ज्वारीचं पीठ, दही, आलं- मिरची पेस्ट आणि मीठ आवश्यकतेनुसार पाणी घालून एकत्र कालवा. पीठ खूप घट्ट वा खूप पातळ कालवू नये. साधारण दहा-पंधरा मिनिटं ते भिजू द्या. एका बाजूला स्टिमर वा कुकरमध्ये तळाला पाणी घालून गॅसवर ठेवा. आता या भिजलेल्या पिठात फ्रूट सॉल्ट घालून ते हलकंच हलवून ढोकळ्याच्या ताटलीला तेल लावून त्यावर ओता. यानंतर स्टिमरमध्ये साधारण बारा ते पंधरा मिनिटं वाफवा. हा ढोकळा जरा थंड झाल्यावर त्यावर मोहोरी आणि तीळाची फोडणी घाला, नंतर त्यावर कोथिंबीर भुरभुरा आणि सर्व्ह करा. आवडत असल्यास ओलं खोबरं घालायला हरकत नाही.
टीप
- याप्रमाणे नाचणीच्या पिठाचाही ढोकळा करता येतो.
- ढोकळा किंचित रवाळ हवा असल्यास या पिठात एक ते दोन चमचे रवा घाला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट