‘उधळीत ये रे गुलाल...’ असं म्हणत येणाऱ्या होळी-रंगपंचमीचं स्वागत करण्यासाठी एव्हाना सगळ्यांनी जय्यत तयारी केली असेल. पण या सणाचं खास आकर्षण असलेल्या थंडाईबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते. म्हणूनच अस्सल थंडाई मिळणाऱ्या या खास जॉइण्ट्सविषयी...
फ्लोट इट
काठोकाठ भरलेल्या काचेच्या ग्लासमध्ये फ्लोट म्हणून मिळणाऱ्या पेयाचं आकर्षण सगळ्यांनाच असतं. मॉकटेल, मिल्क शेक किंवा सरबतचे फ्लोट मिळतात. यात एका फ्लॅलेवरची भर पडलीय ती म्हणजे थंडाई फ्लोटची. माटुंगा येथील ‘ग्रब शब कॅफे’मध्ये हा अनोखा फ्लोट मिळतो.
पारंपरिक स्टाइल
पारंपरिक मातीच्या भांड्यात मिळणाऱ्या थंडाईची चव न्यारीच! शहरी मंडळींसाठी अशा गोष्टी दुर्लभच. पण अशी पारंपरिक स्टाइलची गुरुजी की थंडाई फोर्ट परिसरातील ‘पराठा मंत्रा’ येथे मिळते. तिच्या चवीसाठीच तिथे झुंबड उडालेली असते.
थ्रिलिंग चव
उन्हानं तापलेल्या जिवाला विविध प्रकारच्या मिल्कशेक्समुळे थंडावा मिळतो. त्यामुळे नवनवीन चवीचे आणि फ्लेव्हरचे मिल्कशेक तयार केले जातात. अशाच स्वरूपाचा थ्रीलिंग थंडाई शेक सध्या लोकप्रिय आहे. दहिसर येथील ‘फ्लेवर स्टोन्स’ येथे हा अनोखा शेक मिळतो.
पानदार थंडाई
गुलकंद आणि इतर जिन्नसांचा समावेश असलेलं पान खाणं म्हणजे स्वर्गसुख! विविध फ्लेवरचे पान बाजारात मिळत असताना पान फ्लेवरची थंडाईही आता मिळू लागली आहे. बोरिवली येथील ‘डमरु’ येथे ही अनोखी पान थंडाई मिळते.
थंडाई आइस्क्रीम
आता थंडी सरुन मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. साहजिकच उन्हाळ्यात विविध फ्लेवर्सच्या आइस्क्रीमवर ताव मारला जातो. पण होळीच्या मुहुर्तावर त्यात होळी आणि थंडपणा असे दोन्ही हेतू साधणारं थंडाई आइस्क्रीम फोर्ट परिसरातील ‘बॅचलर्स’ येथे मिळतं.
संकलन- शब्दुली कुलकर्णी
Shabduli.Kulkarni@timesgroup.com
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट