माझ्या आजोळच्या महिला थोडीशी कणकण वाटली, किंवा थकवा आला वा तोंडाला चव नसेल, अगदी महिलांची जेवणाची घरगुती पार्टी असेल तरी कलना म्हणजे हरभऱ्याची हाटलेली भाजी आवर्जून करतात. माझी आई प्रतिभा दणाणे, हिच्या हातच्या या भाजीची तर चवच न्यारी.
साहित्य - एक वाटी सालीसह भरडलेले हरबरे (थोडक्यात हरबऱ्याची ओबड-धोबड कणी) एक मोठा कांदा, लसूण पाकळ्या ७-८, हिरव्या मिरच्या ७-८, जिरं, मोहरी, मीठ, हळद, कोथिंबीर, तेल, कढीपत्ता.
कृती - कढईत वा पातेल्यात फोडणीसाठी अर्धा पळी तेल गरम करणे. नंतर जिरं-मोहरी-कढीपत्ता टाकून मस्त फोडणी करा. नंतर त्यात चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या कापून वा ठेचून, चिरलेली थोडी कोथिंबीर आणि हळद-मीठ टाका. मागाहून ग्लासभर पाण्यात मिसळून एकजीव केलेला कलना फोडणीत टाकून ५-७ मिनिटं त्यास अधून-मधून हलवीत व्यवस्थित शिजू द्या.
थोडक्यात हे आहे, सालीसह भरडलेल्या हरभऱ्याचं पिठलं.
टीप - हा कलना, सोबत बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी, मिरचीचा ठेचा, सोबतीला ताक आणि निखाऱ्यावर भाजलेला पापड... असा बेत आखून एकदा कलनाची चव घेऊन बघाच.
- स्वाती दणाणे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट