साहित्य : १ वाटी बाजरी, १/२ वाटी तुरडाळ, १ वाटी तांदूळ, १ चमचा हळद, चवीपुरतं मीठ
फोडणीकरिता : २ चमचे मेाहरी, १ चमचा जिरं, २ चमचे बारीक कापलेला लसूण, २ सुक्या लाल मिरच्या
कृती : बाजरी ६-७ तास भिजत ठेवणे. नंतर थोडी कापडावर पसरवणे. थोडी वाळल्यावर मिक्सरमध्ये फिरवणे. तूरडाळ आणि तांदूळ १/२ तास भिजवणे. कुकरमध्ये बाजरी, डाळ आणि तांदूळ एकत्र करावे. दुप्पट पाणी घालावे. त्यात १ चमचा हळद आणि चवीपुरता मीठ घालून ३-४ शिट्या काढाव्यात. कुकर थंड झाल्यावर पळीने चांगलं घोटावं. आवश्यक वाटल्यास वरुन थोडं गरम पाणी घालून पातळ करावी. मधल्या वेळात एका छोट्या कढईत तेल घेऊन मेाहरी, जिरं, लसूण आणि लाल मिरचीचे तुकडे घालून फोडणी तयार ठेवावी. सर्व्ह करताना वरुन फोडणी किंवा तूप घालून सर्व्ह करावी.
या बाजरीच्या खिचडीबरोबर गरमा-गरम ताकाची कढी किंवा बेसनाची गोड आंबट कढी छान लागते.
टीप : बाजरी भिजण्यास वेळ लागतो, तेव्हा मिक्सरमध्ये बारीक केलेली बाजरी वाळवून डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवल्यास, हवी तेव्हा १-२ तास पाण्यात भिजवून करता येते.
-राजश्री नवलाखे, शिवडी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट