-अरविंद चिटणीस
ओनियन रवा डोसा हा पदार्थ सहसा दाक्षिणात्य घरं सोडून इतरत्र बनवला जात नाही, कारण तो नीट बनेल, असा आत्मविश्वास अनेकांना नसतो. प्रत्यक्षात रवा डोसा बनवण्यास अतिशय सोपा आणि झटपट बनणारा चविष्ट खाद्यपदार्थ आहे. तो बनवण्यासाठी फारतर १५ मिनिटं लागतात.
साहित्य : बारीक रवा १ वाटी, तांदळाचं पीठ १ वाटी, मैदा १/२ वाटी, ३ मोठे चमचे दही, बारीक चिरलेली कोथिंबीर ३/४ वाटी, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/४ चमचा जिरा पावडर, २ मोठे कांदे बारीक चिरलेले, थोडे बेदाणे व काजूचे तुकडे, चवीपुरते मीठ.
कृती : बेदाणे, काजू आणि कांदा सोडून बाकी सर्व पदार्थ एकत्र करा. ताकासारखं पातळ मिश्रण करा. नॉनस्टिक तवा चांगला गरम करा. तवा गरम झाल्यावर गॅस कमी करा. तव्यावर कांदा, थोडे बेदाणे आणि काजूचे तुकडे नीट पसरा. त्यावर डोशाचं मिश्रण मोठ्या पळीनं पातळ एकसारखं पसरा. तव्यावर टाकलेलं मिश्रण पुन्हा पळीनं एकसारखे करण्याचा प्रयत्न मुळीच करू नका. अशानं डोसा फाटेल. डोशामधील पाणी सुकल्यावर त्यावर ब्रशनं तेल लावा. डोसा सोनेरी झाल्यावर अलगद काढून घ्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट