शूटिंग असो वा नाटकाचे प्रयोग, कलाकारांची सतत बाहेरगावी भटकंती होत असते. बाहेरगावी असताना चाखलेला तिथला एखादा खास पदार्थ, त्याबद्दलची आठवण कलाकार तुमच्याशी शेअर करतात ‘खाता रहे’मधून. अभिनेता-लेखक-दिग्दर्शक संतोष पवारनं ‘चांगलाच’ अनुभवलेल्या ‘वऱ्हाडी ठसक्या’ची ही आठवण.
‘यदाकदाचित’ नाटकाचे दौरे सुरू होते तेव्हाची गोष्ट. तेव्हा मी व्यावसायिक नाटकात नवीन होतो. आम्ही प्रयोगाच्या निमित्तानं पहिल्यांदाच नागपूरला गेलो होतो. नागपूरच्या सावजी मटणाबद्दल खूप ऐकलं होतं. त्यामुळे ते खायची इच्छा होती. नाटकातल्या टीममधले आम्ही चार-पाच जण सावजी कुठे चांगलं मिळेल ते शोधत बाहेर पडलो. एका हॉटेलात गेलो. मटण सावजीची ऑर्डर दिली. त्यांनी आम्हाला विचारलं, ‘कसं देऊ? कमी तिखट, मीडियम की तिखट?’ आम्ही म्हटलं, ‘खायचंच आहे तर चांगलं झणझणीत तिखटच खाऊ. कमी तिखट वगैरे कशाला?’ त्याप्रमाणे ऑर्डर दिली. डिश समोर आली आणि आम्ही खायला सुरुवात केली. आधीच ते तिखट म्हणून प्रसिद्ध. त्यातून आम्ही कमी तिखट वगैरे न सांगता तिखटच सांगितलं होतं. जेवताना जो काही झणका लागला की विचारु नका. तिखटजाळ नुसता. अक्षरश: गोड काय मिळते का ते पाहण्यासाठी आम्ही पळत सुटलो. जेमतेम कुठेतरी आम्हाला डिंकाचे लाडू मिळाले. भराभरा ते तोंडात कोंबले. तेव्हापासून ठरवलं की इतक्या तिखटाच्या वाटेला जायचं नाही.
अशीच एक आठवण आहे, पण नंतरची. तेव्हा मी वऱ्हाडी जेवणाचा ठसका ‘चांगलाच’ अनुभवला होता. एकदा नागपूरहून येत असताना एका धाब्यावर ‘वऱ्हाडी जेवण मिळेल’ असा बोर्ड पाहिला. चला, आज वऱ्हाडी जेवणाचा आस्वाद घेऊ असं ठरलं आणि गाडी तिथे वळवली. मागच्या अनुभवावरुन शहाणा झालो होतो. त्यामुळे वऱ्हाडी जेवणाची ऑर्डर दिली आणि त्याबरोबर गोड पदार्थ म्हणून गूळपोळी सांगितली. जेवण आलं. त्या झणझणीत जेवणाचा आस्वाद घेताना दरदरुन घाम फुटला होता. जे काही खात होतो त्याची चव अप्रतिम होती. तिखट लागू नये म्हणून सोबत गूळपोळीही खात होतो. म्हटलं, तिखटाबरोबर गोडही खाल्लं आहे. त्यामुळे फारसा त्रास व्हायचा नाही. जेवण झालं आणि गाडीत जाऊन बसलो. थोड्या वेळानं पोटात अक्षरश: आग पडायला सुरुवात झाली. उष्णता जाणवू लागलं. शेवटी गाडीचा एसी फुल्ल केला आणि एसीचा झोत पोटावर येईल अशा प्रकारे ठेवला आणि बसलो. अक्षरश: बेचैन झालो मी. मुंबईपर्यंत पोहोचताना सात-आठ वेळा ‘पळापळ’ करावी लागली. त्या वऱ्हाडी ठसक्याची चव जीभेवर होती आणि जन्मभराची आठवणही राहिली.
शब्दांकन - हर्षल मळेकर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट