प्रणाली पडळकर
महाराष्ट्रासारख्या खाद्यसंस्कृतीने संपन्न असलेल्या भागात खाप्रोळी हा पारंपरिक पदार्थ जवळपास विस्मृतीत गेला आहे. कारण तो आता चाखायला तर सोडाच, पण बघायला मिळणंही दुरापास्त झालं आहे. खानदेश, विदर्भात हा पदार्थ लोकप्रिय होता. याची पाककृती खास 'मुंटा'च्या वाचकांसाठी...
साहित्य- दोन कप तांदूळ, एक कप चणा डाळ, एक कप उडीद डाळ, एक टेबलस्पून मेथी, एक नारळ किसलेला, गूळ (तुमच्या चवीनुसार), तीन वेलची, अर्धा चमचा हळद आणि मीठ स्वादानुसार.
कृती- तांदूळ, डाळी आणि मेथी ३-४ तास पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर या सर्वांची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या आणि हे सर्व मिश्रण एकत्र करा. त्यानंतर आदल्या रात्री हे मिश्रण आंबवण्यासाठी झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते चांगलं आंबलं असेल. आता एक नारळ किसून घ्या आणि त्याचा कीस मिक्सरमध्ये वेलची आणि थोडं पाणी टाकून बारीक करून घ्या. आता हा नारळाचा कीस गाळून त्याचं दूध काढून घ्या. नारळाचे दूध घट्ट राहील इतकंच पाणी घाला. या नारळाच्या दुधात स्वादानुसार मीठ घाला. खाप्रोळी जितकी गोड हवी आहे तेवढा गूळ आंबवलेल्या पिठात घालून त्याचे डोसे बनवा आणि गरमागरम नारळाच्या दुधासोबत सर्व्ह करा. पुरणपोळीशी मिळतीजुळती अशी ही खाप्रोळी पॅनवर भाजण्याऐवजी मातीच्या खापरीवर भाजली तर त्याची चव अप्रतिम लागते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट