चंपाकळ्या
आकर्षक दिसणाऱ्या आणि तेवढ्याच चविष्ट लागणाऱ्या चंपाकळ्या पाहिल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही.
साहित्य:
अर्धा वाटी मैदा, अर्धा वाटी कणीक, साखर, चिमूटभर मीठ, पिठीसाखर, तळणासाठी तेल, पाणी.
कृती:
प्रथम कणिक आणि मैदा एकत्र करून त्यात चिमूटभर मीठ आणि दोन चमचे गरम तेलाचं मोहन घालावं. हे पीठ मळून अर्धा तास तसंच झाकून ठेवावं. अर्ध्या तासानंतर पीठ परत मळावं आणि पुरी करण्यासाठी करतो त्या आकाराचे त्याचे गोळे करावेत. नंतर हे गोळे पुरीसारखे लाटून घ्यावेत. लाटलेल्या पुरीवर चाकूच्या सहाय्याने अर्धा सेंटीमीटरच्या अंतरानं सरळ काप द्यावेत. नंतर त्याची गुंडाळी करावी. कडा घट्ट दाबून घ्याव्यात. तयार झालेल्या चंपाकळ्या हलक्या हाताने तेलामध्ये सोडाव्यात आणि मध्यम आचेवर तळून घ्याव्यात. सर्व चंपाकळ्या तळून झाल्यावर त्याच्यावर गरम असतानाच पिठीसाखर भुरभुरावी.
मनगण
‘मनगण’ हा गोड पदार्थ प्रामुख्यानं गोव्यात केला जातो. चणाडाळ वापरून केलेली ही एक प्रकारची खीर आहे. चटकन होणारा आणि चवीला मस्त असा एक पारंपरिक पदार्थ आहे.
साहित्य -
एक वाटी चणा डाळ, पाव वाटी साबुदाणे, गूळ, वेलची पावडर, सुकामेवा, नारळाचे काप आणि नारळाचं दूध.
कृती
मनगण तयार करताना सर्वप्रथम चणाडाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी. त्यात साबुदाणे आणि थोडं पाणी घालून शिजवावं. शिजलेल्या मिश्रणात थोडं नारळाचं दूध घालावं (तुम्ही साधं दूधदेखील घालू शकता). त्यानंतर नारळाचे काप, सुकामेवा, चवीनुसार वेलची पावडर, गूळ या सर्व गोष्टी घालाव्यात आणि मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावं. हे सर्व मिश्रण मंद आचेवरच करावं. नाही तर दूध फाटण्याची तसंच साबुदाणा खाली लागण्याची शक्यता असते. मिश्रण शिजत आलं, की शेवटी नारळाचं दूध घालून एक उकळी काढावी आणि गॅस बंद करावा.
चुरमा लाडू
गणपतीच्या नैवेद्यासाठी गुजराती समाजामध्ये चुरमा लाडवांना महत्त्वाचं स्थान आहे. या लाडवांना मुठिया लाडू असंही म्हटलं जातं. चविष्ट, पटकन होणारे चुरम्याचे लाडू दिसायला आकर्षक आणि चवीलादेखील खूप छान लागतात.
साहित्य:
गव्हाचं पीठ, पाणी, तूप, गूळ (एक किलो गव्हाच्या पिठासाठी सातशे ते आठशे ग्रॅम या प्रमाणात गूळ घ्यावा.) आवडीप्रमाणे खसखस, वेलचीपूड आणि जायफळपूड.
कृती:
सर्वप्रथम गव्हाचं पीठ चार ते पाच चमचे तुपाचं मोहन आणि थोडं गरम पाणी घालून मळून घ्यावं (ही कणिक तयार करताना ती पोळीच्या कणकेपेक्षा घट्टसर आणि कडक राहील याची काळजी घ्यावी.) तयार कणकेचे हातानेच छोटे चपटे गोळे करून घ्यावेत. नंतर ते गोळे, (अर्थात मुठीया) तुपात मंद आचेवर तळावेत. सर्व गोळे तळून झाल्यावर ते थंड होऊ द्यावेत आणि त्यांची मिक्सरमध्ये जाडसर पावडर करावी. नंतर मुठीया तळल्यानंतर उरलेल्या तुपात गुळ घालावा. (गुळाचं प्रमाण तुम्ही तुम्हाला लाडू किती गोड हवे आहेत यानुसार कमी-जास्तदेखील करू शकता.) गूळ तुपामध्ये व्यवस्थित वितळला, की या मिश्रणात मिक्सरमधून केलेलं रवाळ मुठीयांचं पीठ मिसळून घ्यावं. तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पावडर तसंच जायफळ पावडर घालून या मिश्रणाचे लाडू वळून घ्यावेत. तयार लाडू खसखशीत घोळवावेत.
संकलन - केतकी मोडक (विद्यावर्धिनीज कॉलेज)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट