उपवासाला ठरावीक पदार्थ नेहमीच केले जातात. पण अनेकदा त्यांचाही कंटाळा येतो. मग उपवासाचं नवीन काय करता येईल, त्याचे पर्याय शोधायला सुरुवात होते. परंतु उपवासाचे पर्याय तसे कमीच आहेत, तरीही मी ही उपवासाची रेसिपी तुम्हाला मुद्दाम सांगत आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पाहा. चवीला अतिशय सुंदर लागणारे भाजणीचे हे वडे पोट भरीचंही काम करतात.
साहित्य : २ वाटी भाजणीचे पीठ, १ वाटी शिंगाडा पीठ, १ वाटी राजगिरा पीठ, १ वाटी वरीचा मऊ भात, २ टी स्पून मिरचीचा ठेचा, १/२ टी स्पून जिरे, १ टी स्पून लाल तिखट, २ टी स्पून दही, चवीपुरते मीठ, तळणासाठी तेल.
भाजणीचे साहित्य व कृती : साबुदाणा, वरीचे तांदूळ आणि जिरे चांगले भाजून घ्यावे व घरघंटीवर दळून आणावे. किंवा हल्ली मार्केटमध्येही उपवासाची भाजणी तयार मिळते ती वापरली तरीही चालेल.
कृती : प्रथम एका परातीत वरील सर्व पीठे घेऊन त्यात वरीचा मऊ भात, मिरचीचा ठेचा, जिरे, लाल तिखट, दही आणि मीठ सर्व मिक्स करून चांगले मळून घ्यावे व त्याचा गोळा तयार करावा. तयार गोळा १०-१५ मिनिटे बाजूला ठेऊन द्यावा. नंतर त्याचे लिंबा एवढे गोळे करून, पोळपाटावर स्वच्छ रुमाल ठेऊन त्यावर हलक्या हाताने वडे थापून घ्यावे व डीप फ्राय करून सोनेरी रंगावर तळावे. हे गरमागरम वडे खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर मस्त लागतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट