अमित पाटील
मॅरिनेट केलेले मटन, चिकनचे तुकडे सळईवर खमंग भाजून भुजिंग केले जाते. डहाणू-पालघर परिसरातल्या या अस्सल मराठमोळ्या पदार्थाचे योग्य मार्केटिंग झाले, तर फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये हा पदार्थ भाव खाईल, हे नक्की!
निखाऱ्यावर खरपूस भाजलेले सीग कबाब किंवा बार्बेक्यू हा बड्या हॉटेलांमधला लज्जतदार स्टार्टर प्रकार. मात्र चवीच्या बाबतीत या कबाब किंवा बार्बेक्यूलाही मागे टाकेल, अशी अस्सल मराठमोळी पारंपरिक डिश मुंबईला खेटून असलेल्या पालघर-डहाणू भागात घरोघरी केली जाते, ती म्हणजे भुजिंग.
विटांची चूल मांडून मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे सळईवर खमंग भाजून भुजिंग केले जाते. अर्थात हे भुजिंग करण्यासाठी बराच सरंजाम लागतो. पण हा खटाटोप सार्थकी लागेल, अशी चव या मराठमोळ्या स्टार्टरची आहे एवढे नक्की.
मूळची डहाणू-पालघर भागातल्या गावांमधली ही खासियत. एकीकडे चिकन स्वच्छ करून, लहान तुकडे करून मीठ, तिखट मसाला, हळद, लसूण, तेल चांगले लावून अर्धा तास मॅरिनेट करायचे. दुसरीकडे विटांची चूल कोळसा, लाकूड घालून निखारे चांगले फुलेपर्यंत पेटवायची. एका बाजूला टोक आणि दुसऱ्या बाजूला हातात पकडण्यासाठी मूठ असलेल्या पेन्सिलपेक्षा किंचित अधिक जाडीच्या लांब सळ्या घेऊन त्याला तेल लावून हे तुकडे अडकवायचे आणि निखाऱ्यावर भाजायला ठेवायचे. या भागातल्या घरोघरी लोहाराकडून मुद्दाम तयार करून घेतलेल्या भुजिंगच्या सळ्यांचा सेट प्रत्येक घरात असतोच. भुजिंगसाठी सळ्या हव्यात, असे सांगितले की या गावांमधले लोहार करून देतात. भुजिंगचे मॅरिनेशन अतिशय महत्त्वाचे आहे. पुरेसे मुरल्यानंतरच ते सळीला लावायचे. दोन तुकड्यांमध्ये थोडं अंतर ठेवायचं. विस्तवावर सळ्या ठेवल्यानंतर निखारे फुलत राहावेत, यासाठी त्याला सुपाने किंवा पेपरने हवा घालत राहावी लागते. सळ्या दर पाच-पाच मिनिटांनी हलवत राहायच्या. नाही तर चिकन करपण्याची भीती असते. साधारण २५ ते ३० मिनिटांत त्यांना लालसर रंग येतो. हा रंग आणि सुटलेला वास यावरून अस्सल खवय्याला भुजिंग तयार झाल्याचे कळते. तापल्या सळीला स्पर्श होऊ नये म्हणून पळसाच्या पानानेच ते सळीतून बाहेर काढायचे आणि केळीच्या पानात काढून शेकोटीच्या शेजारीच त्याचा आस्वाद घ्यायचा. शेकोटीवर भाजल्याचा खरपूस वास, प्रचंड थंडी आणि शेकोटीची साथ यांच्यामुळे येणारी भुजिंगची चव ही अक्षरशः स्वर्गीय अशीच असते.
भुजिंग प्रामुख्याने चिकनचे केले जात असले, तरी कलेजी आणि मटनचाही वापर केला जाते. चिकन कलेजी मात्र थेट सळीला न अडकवता पळसाच्या किंवा केळीच्या पानात गुंडाळून सळीला अडकवायची. अन्यथा ती मऊ असल्याने चटकन करपते. शिवाय पानाचा वासही तुकड्यांमध्ये मुरल्याने ती अधिक रुचकर लागते. तर दुसरीकडे मटण अधिक घट्ट असल्याने आणि शिजण्यास वेळ लागत असल्याने त्याचा खिमा करून त्याचे गोळे करून ते भाजले जातात. त्याला या भागात मुठिया म्हणतात.
चिकन भुजिंग हे गावात घराघरांमध्ये, खरे तर घरांच्या अंगणांमध्ये केले जाते. या गावांमधील अनेक जण कामानिमित्त वसई- विरार पट्ट्यात स्थायिक झाले असल्याने या भागात तसेच बोळिंज, आगाशी या पर्यटन स्थळी भुजिंगचे काही स्टॉल्सही आहेत.
भुजिंगची चव चाखण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणजे डहाणूतील महालक्ष्मी मंदिराची जत्रा. हनुमान जयंतीला सुरू होणाऱ्या आणि साधारण १५ दिवस चालणाऱ्या या यात्रेत या भुजिंगचे ६०-७० स्टॉल्स लागलेले असतात. खास भुजिंग आणि मुठिया खाण्यासाठी लोक या जत्रेला हजेरी लावतात. देवीचा प्रसाद समजून हे भुजंग खाल्ले जाते. हेवी ट्रॅफिक असलेल्या मुंबई- अहमदाबाद हायवेवरील अनेक जण गाड्या थांबवून जत्रा काळात भुजिंग चाखूनच पुढे सरकतात.
डहाणू-पालघर परिसरातील मांसाहार करणाऱ्या समाजांमध्ये भुजिंग हा पारंपारिक मेजवानीचा प्रकार आहे. आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार भुजिंगशिवाय पूर्ण होत नाही, असा इथे समज. विशेष म्हणजे, हे भुजिंग करण्याच्या कामात घरातील पुरुषांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे महिलावर्गाला कामाच्या रगाड्यातून किंचित आराम मिळतो, असे इथला पुरुषवर्ग अभिमानाने सांगतो.
थंडीच्या दिवसातील पिकनिकचाही भुजिंग हा अविभाज्य भाग. ग्रुपमधल्या एखाद्या उत्साही आचाऱ्याने सगळी जमवाजमव करून आणि इतरांची मदत घेऊन घातलेला भुजिंगचा घाट हा इथल्या पिकनिकच्या आयटनरीमधला महत्त्वाचा भाग असतो. अर्थात, भुजिंग बनवणं हा कौशल्याचा भाग आहे. त्यामुळे सध्याच्या वेगवान लाइफस्टाइलमध्ये बाहेरून तयार भुजिंग आणण्याकडे कल वाढू लागला आहे. या भागात तयार भुजिंग करून देणारी दुकानेही येऊ लागली आहेत. त्यांची संख्या अजून तरी कमी आहे. शहरी भागात विरारजवळ बोळींज, आगाशी या भागामध्ये भुजिंगची दुकाने आहेत. पिकनिकर्सचा त्याला लोकाश्रय असतो. डहाणू-पालघर परिसरातल्या या अस्सल मराठमोळ्या पदार्थाचे योग्य मार्केटिंग झाले, तर फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये हा पदार्थ भाव खाईल, असे मत वाढवण, डहाणू येथे गेली १२ वर्षे भुजिंग सेंटर चालवणारे मनपसंत भुजिंग सेंटरचे रामचंद्र पाटील सांगतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट