नाशिक टाइम्स टीम
हॉटेल संस्कृतीच्या दीर्घ वाटचालीनंतर आता नाशिकमध्ये रुजू लागली आहे ती पार्सल संस्कृती. जागा आणि मनुष्यबळाच्या वाढत्या किमतींमुळे शहरात आज पार्सल पॉईंट्स मोठ्या प्रमाणाववर सुरू होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे नाशिककरांमार्फत त्याला पसंतीही मिळत आहे.
वेटर्स, मॅनेजर्स, कॅश काऊंटर, कूक असा लवाजमा सांभाळत नाशिकमध्ये आज अनेक लहान मोठी हॉटेल्स कार्यरत आहेत. याचबरोबर मेस आणि खानावळींचीही काही कमी नाही. त्यांचा व्यवसायही चांगल्या पध्दतीने सुरू आहे. पण गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर रुजली आहे ती पार्सल संस्कृती. हॉटेल आणि मेस यांचा व्याप मोठा असल्यामुळे तो प्रत्येकाला सांभाळता येतोच असे नाही. त्यामुळे अनेकांनी पार्सल पाईंट्स सुरू करण्यावर भर दिलेला दिसून येतो. मोजके कर्मचारी, कमी जागा आणि मोजके पदार्थ इतक्याच भांडवलावर उभे राहणारे हे पार्सल पॉईंट्स ग्राहकांच्याही आवडीचे ठरत आहेत.
शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थांमधील ठराविक पदार्थ निवडून तेवढेच या पार्सल पॉईंट्सवर उपलब्ध करुन दिले जातात. दोन किंवा तीनच पदार्थ बनवायचे असल्यामुळे त्या पदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करता येते. खान्देशी भरीत, पातोड्याची आमटी, पोळी-भाजी, हैदराबादी बिर्याणी, चिकन लॉलीपॉप, मटन-भाकरी, अंड्याचे विविध पदार्थ, माशांचे पदार्थ, कढी-खिचडी अशा विविध पदार्थांचे पार्सल पॉईंट्स सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळत आहेत. गंगापूररोड, कॉलेजरोड या भागात पार्सल पॉईंट्सची संख्या अधिक आहे. कॉलेजचे विद्यार्थी, हॉस्टेलवर तसेच पेईंग गेस्ट म्हणून राहणारे विद्यार्थी या भागात जास्त असल्यामुळे या पार्सल पाईंट्सचा जमही चांगला बसला आहे. हॉटेलच्या तुलनेत थोडी कमी किंमत मोजावी लागत असल्यामुळे पार्सल पॉईंट्सना प्राधान्य मिळत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट