कृती: तांदूळ धुवून २० मिनिटं निथळत ठेवावे. तूप गरम करून त्यात लवंगा परताव्यात. नंतर तांदूळ घालून मध्यम आचेवर चांगले कोरडे होईस्तोवर परतावे. तांदूळ चांगले परतले की, त्यात पाणी घालावं. किंचित पिवळा रंग घालू शकतो. भात मोकळा शिजवून घ्यावा. भात शिजला की त्यात बेदाणे आणि काजू घालून हलकेच मिक्स करून घ्यावे. झाकून वाफ मुरू द्यावी. भात व्यवस्थित शिजला पाहिजे. जर थोडा जरी कच्चा राहिला तर साखर घातल्यावर आटतो आणि कडकडीत लागतो. शिजलेला भात परातीत मोकळा करावा. जरा निवू द्यावा. साखर एका जाड बुडाच्या पातेल्यात घेउन ती बुडेल इतपत पाणी घालावे. केशर घालावे. गोळीबंद पाक करावा. पाक गरम असताना त्यात भात आणि लिंबाचा रस घालून कालथ्याच्या मागच्या टोकाने ढवळून मिक्स करावे. मंद आचेवर शिजू द्यावे. पाक मुरला (साधारण १२-१५ मिनिटे) की आच बंद करावी. भात थोडा निवाला की पाकाचा ओलेपणा कमी होतो.
टीप: तांदूळ नवीन असेल तर तांदुळाच्या दीडपट पाणी पुरते. पण तांदूळ जुना असेल तर दुप्पट किंवा अडीचपट पाणी घ्यावे. कोणताही सुवासिक तांदूळ घ्यावा जसे सुरती कोलम, आंबेमोहोर इत्यादी. बासमतीसुद्धा वापरू शकतो पण या भातासाठी दिसायला लहान दाण्याचा तांदूळ छान वाटतो. २ वाट्या तांदुळाला २ वाट्या साखर पुरेशी होते. पण त्यामुळे भात बेताचा गोड होतो. पक्का गोड भात हवा असेल तर अडीच वाट्या साखर घ्यावी.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट