प्रिया मराठे, अभिनेत्री
खाणं हा प्रत्येकाचा आवडीचा विषय. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, जिभेचा जसा हट्ट पुरवतात तसाच मनाचाही. खाण्याची मीही भरपूर शौकिन असल्यानं नवनवीन पदार्थ शोधत असते; पण काँटिनेंटल फूड माझ्या जास्त आवडीचं आहे. स्पायसी आणि तेलकट पदार्थ जास्त आवडत नसल्यानं काँटिनेंटल मला जास्त प्रिय आहे.
कामानिमित्त विविध ठिकाणी प्रवास होत असतो; पण तेव्हाही मी काँटिनेंटलच्या शोधात असते. अशावेळी मनासारखं जेवण आणि त्यात नवीन पदार्थ सापडला, तर दुग्धशर्करा योग असतो. त्यामुळे काँटिनेंटलमध्ये आतापर्यंत अशा बऱ्याच पदार्थांची मी चव घेतली आहे. हे फूड माझ्या इतकं आवडीचं आहे, की त्यावर मी कधीही ताव मारायला तयार असते.
लहान असताना आईच्या हातचे पदार्थ म्हणजे पर्वणीच असायची. घरी आल्यावर किंवा घरातल्या घरात भूक लागली, की झटपट होणारे पदार्थ ती लगेच समोर आणायची. तिच्या हातच्या या पदार्थांची चव आजही जिभेवर रेंगाळते. त्यामुळे आजही आईकडे जाणं झालं, की हे झटपट होणारे पदार्थ आवर्जून होतातच.
सणाच्या दिवशी घरात होणारे साग्रसंगीत पदार्थ अजूनही आवडतात. सणाच्या दिवशी दिवसभर आईनं किचनमध्ये या पदार्थांचा घाट घातलेला असे. हे सगळे पदार्थ खूप जवळचे असले, तरीही आईनं बनवलेली उकड मला जाम आवडते. मनात आलं, की उकड शिरा हे पदार्थ तिच्यामुळे मिळतात. कुकिंगची मला खूप आवड; पण सध्या त्यासाठी वेळ काढणं जमत नाही. क्वचितच कधी वेळ मिळाला, की आवडीचा पदार्थ मन लावून करते. अंडी मला खूप आवडतात. त्यामुळे स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला, की ऑमलेटचा पर्याय असतोच.
रुममेट सोबत राहताना आम्ही नवीन प्रयोग करायचो. कधी-कधी तर गॅस संपलेला असायचा आणि मग जेवणासाठी काय बनवावं हा आमच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहायचा. अशावेळी गॅस लागणार नाही असे पदार्थ आम्ही बनवायचो. प्रत्येकीनं वेगवेगळे शोध लावले होते. त्यातलाच आवडलेला आणि जमलेला पदार्थ म्हणजे ओस्लो सँडविच.
ओस्लो सँडविच
साहित्यः कोबी, मेओनीज, मध, दही, कांदा, गाजर आणि ब्रेड.
कृतीः सर्वप्रथम ब्रेड त्रिकोणी आकारात कापून घ्या. त्यानंतर कोबी, मेओनीज बारीक चिरून घ्या. त्यात मध आणि दही घालून हे सर्व एकत्र करायचे. हे सर्व मिश्रण फेटून घ्या. स्लाइसमध्ये मिश्रण भरल्यानंतर त्यावरून चिरलेला कांदा आणि गाजर ठेवून स्लाइस ठेवा. मस्त सँडविच तयार.
शब्दांकनः अश्विनी पाटील
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट