साहित्य : अर्धा किलो रातांबे, साधारण १ वाटी बारीक चिरलेला पिवळा गूळ, जिरे पावडर, मीठ, थोडी साखर, लाल तिखट
कृती : रातांब्याच्या फळांतील बिया काढून घ्या. बियांना गर चिकटलेला असतो. थोडा चिकटही असतो. त्यावर थोडं मीठ घालून हाताने बिया चांगल्या कुस्करून त्यातील गर काढून घ्या. नंतर त्यात पाणी घालून, बिया गाळण्यातून गाळून घ्या. गाळण्यावर परत बिया राहतील. त्यात पाणी घालून परत कुस्करा. असं एक ते दोन वेळा करा. याचं साधारण ६ ग्लास पन्ह तयार होईल. आता त्यात १ चमचा जिरे पावडर, चवीपुरते मीठ तिखट घाला. बारीक चिरलेला गूळ घालून तो विरघळेपर्यंत ढवळा. त्यात साधारण १ टेबल स्पून साखर घाला. आता रातांब्याच्या सालांचे तुकडे करून बरणीत साखर घालून झाकण लावून ठेवा.
उकडआंबे
साहित्य : ६ साधारण लहान अर्धवट पिकलेले आंबे, १ वाटी लालमोहरीची पावडर, २ चमचे मेथी पावडर, २ चमचे हिंग, हळद, अर्धी वाटी मीठ, तेल १ वाटी
कृती : चाळणीवर पाणी न घालता आंबे वाफवून घ्या व ते गार करा. नंतर मोहरी, २ वाटी पाणी व एक लहानसा तुकडा गूळ घालून ते मिक्सरमधून वाटून घ्या. वाटताना मोहोरी छान फेसली पाहिजे. ते मिश्रण साधारण पांढरं दिसेल आणि अगदी नाकात जाण्यासारखा त्याचा वास असतो. आता त्यात पाववाटी तिखट घाला.
१ वाटी तेल गरम करा. ते छान तापल्यावर गॅस बंद करा. चिमूटभर हळद घालून बघा. ती पिवळी राहिली पाहिजे. आता त्यात हिंग, मेथी पावडर, हळद घाला व फोडणी गार करा. गार झाल्यावर फोडणी फेसलेल्या मोहरीवर घाला. मोहरीचं मिश्रण थोडं पातळसर असावं. आता त्यात थोडं तिखट घाला. एक आंबा घ्या. फोडणी घातलेल्या मिश्रणात बुडवा. स्वच्छ काचेच्या बरणीत ठेवा. असे सर्व आंबे मिश्रणात बुडवून ठेवा. उरलेलं मिश्रण आंब्यांवर ओता. बरणीला झाकण लावून वर कपडा बांधा. बरणी कपाटात ठेवून द्या. साधारण श्रावणात हे उकडआंबे तयार होतात. खूप चविष्ट लागतात. एक आंबा बाहेर काढला की ५ ते ६ जणांना पुरतो.
फणसाचे उकड गरे
साहित्य : गऱ्याचा फणस, तूप, जिरे, खोबर, दाण्याचे कूट, लालसुकी मिरची, तिखट, मीठ, साखर
कृती : गऱ्यांमधून आठळी काढून गऱ्याचे हाताने उभे-उभे तुकडे करावे. आठळी ठेचून त्याचं साल काढून टाकावे. आठीळा व गरे उकडून घ्या. नंतर दोन्ही एकत्र करून त्यात साधारण अर्धी वाटी पाणी घाला. नंतर चवीनुसार मीठ, साखर, खोवलेलं खोबर चवीपुरती साखर घालावी. १ चमचा लाल तिखट घालून चांगली वाफ आणावी. सर्व एकजीव झाल्यावर गॅस बंद करावा.
फोडणीसाठी २ टेबल स्पून तूप गरम करून घ्या. त्यात ७ ते ८ लाल मिरच्या तळून बाहेर काढा. नंतर त्यात जिरं घालून ते गुलाबी झाल्यावर गॅस बंद करा. तूप जिऱ्याची फोडणी गऱ्यांच्या भाजीवर घाला. तळलेल्या मिरच्या हाताने चुरून जेवढं तिखट हवं असेल तेवढ्या मिरच्या भाजीवर घाला. वर अर्धी वाटी दाण्याचं कूट घालून थोडी कोथिंबीर व नारळ घालून सर्व्ह करा. ही उपासाची भाजी नुसती खायलाही खूप छान लागते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट