Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

मँगो स्मूदी...

$
0
0

>>अपर्णा पाटील

नुसता आंबा किंवा आमरस यापेक्षा आंब्याची काही वेगळी रेसिपी करून पाहायची असेल, तर झटपट बनणारी स्मूदी बनवून पाहायला हरकत नाही. थंडगार स्मूदी ही फ्रेश करणारी आहेच. पण, दिवसाच्या कोणत्याही प्रहरात वेगवेगळ्या चवीने आंबा खाण्याची लज्जत देणारीही आहे.

उन्हाच्या चढत्या पाऱ्यावर उतारा म्हणून लस्सी, ताक, लिंबाचा आणि उसाचा रस पिण्याचा मोह अनेकांना होतो. त्याहीपेक्षा मिल्कशेक, कोल्ड कॉफी ही ट्रेण्डी पेयं उन्हाच्या काहिलीनंतर जीव थंड करतात. पण, अशी थंडपेयं आरोग्याला फारशी फायद्याची नसतातच. अशावेळी स्मूदी हा पर्याय मस्तच असतो. फळांचा रस काढला की त्याचा ज्यूस होतो, त्यात दूध घातलं की मिल्कशेक, तर त्याच मिल्कशेकमध्ये आणखी एका फळाचा रस मिसळला की तयार होते स्मूदी.

स्मूदी हे दूध घातलेले मॉकटेल आहे, असं म्हणायला हरकत नाही. यात फायद्याची गोष्ट अशी की, यात ताजी फळं आणि दूध असल्याने स्मूदी आरोग्यालाही चांगली. साखरेऐवजी मध घातलं की, आणखीच फायद्याचं ठरतं. काही स्मूदीजमध्ये दुधाऐवजी योगर्ट वापरलं जातं. फळाच्या स्वादाचे योगर्ट त्यात घातले जातात. सोया मिल्कमध्ये स्मूदी बनवता येतात. त्यामुळं आपल्या आरोग्याविषयी अधिक जागरूक असलेल्यांसाठी स्मूदी चांगली. खरं तर जगात जेवढी फळं तेवढ्या स्वादांच्या स्मूदी बनवनं शक्य आहे. शिवाय दोन फळ एकत्र करून तयार केलेल्या स्मूदींचा स्वाद आणखी वेगळा. त्यात चॉकलेट, कॉफी अशा स्वादाच्या स्मूदी बनवता येतात. त्यामुळे जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे जितकी फळं तितक्या स्मूदी, असं म्हणता येईल. ​सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आंबे खाण्यासाठी बहाणा हवा असेल, तर मँगो स्मूदीसारखी नवीन रेसिपी नाही. दिवसभरात वेगवेगळ्या चवीनं आंबा खायला मिळाला, तर कोणाला आवडणार नाही.

नुसत्या आंब्याची स्मूदी बनवता येतेच शिवाय स्ट्रॉबेरी, पीच, संत्र, केळी, पॅशनफ्रूट यासारखी विविध फळं एकत्र करून स्मूदी तयार करता येतात. अशा असंख्य स्मूदी घरच्या घरी करायच्या असतील, तर फक्त दोन गोष्टी लागतात, फळं आणि दूध किंवा आइस्क्रीम. अगदी साधी सोपी मँगो स्मूदी बनवण्यासाठी आंब्याचा रस काढून घ्या. त्यात एक केळं, चवीनुसार साखर आणि दूध घालून मिक्सरमधून काढा किंवा ब्लेडरमधून फिरवा की दोन मिनिटांत फ्रेश अँड ज्युसी मँगो स्मूदी तयार होते. सर्व्ह करताना शक्यतो उंच ग्लासमध्ये करा. शिवाय आइस्क्रीम किंवा व्हीप्ड क्रीम घालून सर्व्ह करा. नाही घातलं तरी काही फारसं बिघडणार नाही.

काही स्मूदीमध्ये योगर्ट वापरलं जातं. आपल्याकडे वेगवेगळ्या फ्लेवरचे योगर्ट मिळतात किंवा अगदी फळांच्या स्वादाचे चीज स्प्रेड वापरून स्मूदी बनवता येतात. आंब्याबरोबर आणखी फळ घालण्याबरोबरच मँगो बॅसिल, पिना कोलाडा अगदी पालकासारख्या भाजीचा वापर करून स्मूदी तयार करता येतात. त्यामुळे दिवसभरात कितीही वेळा आंबा खाण्याचा आनंद लुटता येतो. फक्त पाच मिनिटांत बनवता येणारी ही झटपट रेसिपी आहे. शिवाय मुलांपासून ते आजीआजोबांपर्यंत सगळ्यांना त्याचा स्वाद आवडतो. त्यात वेग‍वेगळे प्रयोग करून पाहता येतात.

अगदी सोप्या मँगो स्मूदीसाठी दूध, योगर्ट, मध आणि आंब्याचा गर बर्फासह मिक्सरमधून फिरवा. ही स्मूदी वेगवेगळ्या फळांच्या कॉम्बोने तयार करता येते. आंब्याबरोबर काजू किंवा बदामाचा वापर करून त्या स्वादाची स्मूदी तयार करते. अगदी आलं, दालचिनीच्या स्वादाचा वापर करूनही आंब्याची स्मूदी बनवणं शक्य आहे.

परदेशात सकाळी नाश्त्याला स्मूदी बनवल्या जातात. तर आपल्याकडे रेस्तराँमध्ये जाऊन स्मूदी चाखण्याचा ट्रेण्ड वाढला आहे. पण, घरच्या घरी स्मूदी बनवणं सोप्पंही आहे. अशाच काही सोप्या रेसिपीज...

आंबा-पपई स्मूदी - एका आंब्याचा पल्प, पपई दोन कप (दोन्ही फ्रीजमध्ये ठेऊन थंडगार करून घ्या), त्यात अर्धा कप पाणी घालून मिक्सरमधून फिरवलं की झाली आंबा-पपई स्मूदी तयार. पाण्याऐवजी दूधही चालू शकेल. साखर किंवा मध गरज असल्यास मिक्स करा.

आंबा स्ट्रॉबेरी स्मूदी - एक आंबा, थोड्या स्ट्रॉबेरी, एक कप दूध किंवा पाणी आणि थोडा बर्फ मिक्समधून फिरवून घ्या.

आरोग्यदायी स्मूदी - एक आंबा, अर्धा लीटर स्कीम्ड मिल्क, अर्धा कप योगर्ट (लो-कॅलरी असेल तर जास्त चांगले), एक चमचा बदामाची भिजवून तयार केलेली पेस्ट, एक टेबलस्पून मध थोडं बर्फ घालून बेल्डर किंवा मिक्सरमध्ये घुसळून घ्या. नाश्तात नुसत्या दुधाऐवजी ही स्मूदी घेणं उन्हाळ्यात नक्कीच आरोग्यदायी ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>