इडली, मसाला डोसा आणि उत्तपा या नेहमीच्या दाक्षिणात्य पदार्थांव्यतिरिक्त ते टेबल पारुप्पू चोडी आन्नम् हा भात, सांबार, थाईर सादाम, म्हैसूर पटपू चारू हा रस्समचा प्रकार यांसारख्या पदार्थांनीही सजलं होतं. महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये नुकत्याच आयोजिण्यात आलेल्या 'थीम लंच'च्या वेळी वैविध्यपूर्ण पदार्थांनी सर्व्हिंग टेबल सजलं होतं. अर्थातच, लंचची थीम होती, दाक्षिणात्य पदार्थ!
इन्स्टिट्यूटच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी थीम कुठली, ते ठरवण्यापासून सजावटीपर्यंत सर्व बाबी सांभाळल्या होत्या. त्यांनी तिथल्या विभागातील रेस्तराँला 'दक्षिणायम्' हे नावही अगदी थीमला साजेसं दिलं होतं. यात म्हैसूर पाक, आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध पोडी चापा, अप्पम् यांसारखे तिखट- गोड पदार्थ दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तयार केले होते.
दाक्षिणात्य पद्धतीप्रमाणेच हे सगळं जेवण केळीच्या पानात सर्व्ह करण्यात आलं होतं. रेस्तराँलाही संपूर्णपणे दाक्षिणात्य 'टच' मिळावा, म्हणून तिथल्या भिंतींवर फुलं, पानांची सजावट केली होती आणि दाराबाहेरील रांगोळीही केरळी पद्धतीची होती. विद्यार्थ्यांच्या या थीम लंचच्या प्रयत्नाला दाद द्यायला शेफ शैलेंद्र केकाडे, 'ताज गेटवे' हॉटेलचे भावना प्रसाद आणि वर्षा कपूर उपस्थित होते. डॉ. सुभाष भावे आणि कॉलेजच्या प्राचार्या अनिता मुदलीयारही यावेळी हजर होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट