कोणाचे उकडीचे मोदक, तर कुणाचे खरवसाचे, कुणाचे कडधान्याचे, तर कुणाचे चायनीज. मिठाईच्या दुकानातही दिसणार नाहीत, एवढे मोदकाचे प्रकार पाहायला मिळाले, ते 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'मोदक मेकिंग' स्पर्धेत. हॉटेल रामी ग्रँड इथं मंगळवारी पार पडलेल्या या स्पर्धेत माधुरी सोनाळकर यांनी पहिला क्रमांक पटकावला.
स्पर्धेचं परीक्षण प्रसिद्ध शेफ पराग कान्हेरे यांनी केलं. या स्पर्धेत तब्बल १०६ स्पर्धकांना भाग घेतला होता. हॉटेल रामी ग्रँड हे स्पर्धेचे हॉस्पिटॅलिटी पार्टनर होते, तर 'केप्र' सहप्रायोजक होते. माधुरी सोनाळकर यांना पहिला, अर्चना डोंगरे यांनी दुसरा, तर विद्या ताम्हनकर यांनी तिसरा क्रमांक पटकावला. दीप्ती बोत्रे आणि दीपा हर्षे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची उत्तेजनार्थ पारितोषिकं मिळवली.
शेफ कान्हेरे म्हणाले, 'मला प्रत्येकी एक म्हणजेच कमीत कमी १०६ मोदक खायचे होते. मोदकांच्या एकसारख्या नाजूक कळ्या पाडण्याचं स्पर्धकांचं कसब वाखाणण्यासारखं होतं.' कान्हेरे यांनी स्पर्धकांना मोदक आणखी चांगले करण्यासाठी बहुमूल्य टिप्सही दिल्या.
स्पर्धकांनी रेसिपीमध्ये दाखवलेलं वैविध्य कल्पनेपलीकडचं होतं. शेफना जशा वेगवेगळ्या रेसिपी करून पाहायच्या असतात, तेवढ्याच उत्कटतेनं या महिलांनी वेगळ्या पद्धतीच्या डिश करण्याचा प्रयत्न केला होता. यातून मीही बरंच काही शिकलो.
- शेफ पराग कान्हेरे
शंभरहून अधिक स्पर्धकांमधून पहिला क्रमांक मिळवणं, हे खरंच खूप आनंददायी आणि समाधानकारक आहे. मी या स्पर्धेत खरवसाचं सारण असलेले मोदक तयार केले होते. खरवस आणि मोदकाचं एक प्रकारचं पुडिंग होतं. या बक्षीसामुळे प्रोत्साहन मिळालं आहे.
- माधुरी सोनाळकर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट