काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा तुमच्या जिभेचे चोचले पुरवायला आणि नव्या जागेची ओळख करून देण्यासाठी आलो आहे, खास इटालियन आणि चायनीज खाद्यसंस्कृती घेऊन. इटालियन खाद्य, लोक आणि तेथील संस्कृती हे सगळेच मनाला चटकन भावणारे आहेत. म्हणूनच आज भारतीय खाद्यसंस्कृतीप्रमाणेच इटालियन खाद्यसंस्कृतीदेखील जगभरात पसरली आहे. अशाच इटालियन आणि चायनीज खाद्यसंस्कृतींनी सज्ज आहे डोंबिवलीतील कॅफे जंक्शन.
इटालियन खाद्यसंस्कृतीत प्रामुख्याने पास्ता, पिझा, तसेच बटाटा, टोमॅटो यांचा प्रभाव दिसतो. तुम्हाआम्हा सर्वांना आवडणाऱ्या पास्ताचेदेखील दोन प्रकार असतात. ओला म्हणजे फ्रेश, नुकताच केलेला आणि ड्राय पास्ता (आपल्याकडे ड्राय पास्ताच मिळतो.) दुरम व्हिटपासून पास्ता तयार करतात. पास्ताचे बाजारात वेगवेगळे आकार उपलब्ध आहेत. इटलीमध्ये जवळजवळ ३५० ते ४०० वेगवेगळ्या आकाराचे पास्ता बनवले जातात. पुंगीसारखा पेने पास्ता असतो, बॅटमिंटनच्या रॅकेटच्या आकाराचाही पास्ता आहे. फ्युसिली पास्ता स्क्रूच्या आऱ्यासारखा असतो, अगदी केसाइतका पातळ पास्ताही असतो, त्याचं नाव एंजल हेअर. बटरफ्लाय पास्ता वगैरे पास्ताचे असे अनेक मजेशीर प्रकारही आहेत. पण मग त्याला एवढे आकार का देण्यात आले असतील, असा प्रश्न तुमच्यासारख्या खवय्याला पडणे साहजिकच आहे. त्याचे कारण म्हणजे पास्ता शिजवून सॉसमध्ये परतून खातात. त्याला 'अल डान्टे' असे म्हणतात. जेव्हा सॉस घट्ट असतो, तेव्हा जाड पास्ता वापरतात, सॉस पातळ असतो, तेव्हा बारीक पास्ता वापरतात. नूडल्ससारख्या आकाराचे स्पॅगेटी पास्ता क्रीम बेस्ड सॉससाठी वापरतात आणि गोलाकार आकाराचे पास्ता हे टोमॅटोचा बेस असलेल्या सॉससाठी वापरतात. म्हणजे एकूण काय की, डिश टेस्टी बनवण्यासाठी आणि चांगली दिसण्यासाठीही केलेली ही एक उत्तम आयडिया आहे.
तर असेच इटालियन आणि चायनीज खाद्यप्रकार डोंबिवलीत घेऊन आले आहे कॅफे जंक्शन. डोंबिवली पूर्वेला स्टेशनजवळच असलेल्या उर्सेकरवाडी रस्त्यावर कॅफे जंक्शन आहे. हॉटेल मेनेजमेंटचे पदवीधर असलेल्या मेहता, हरिकृष्ण केल्लू, सुदीप मुलिक या तीन मित्रांनी एकत्र येऊन या कॅफेची सुरुवात केली. कॅफेला विंटेज लुक देण्यात आला आहे. त्याचसोबत ब्लॅक आणि व्हाइट पेंटिंग लावून वातावरण नोस्टॅल्जिक करण्यात आले आहे. कॅफेत व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थ आहेत. त्यामुळे दोन्ही खवय्यांना इथे इटालियन आणि चायनीज मेजवानीचा आस्वाद घेता येईल.
इथे तुम्ही आलात तर स्मोकी बार्बेक्यू राइस, चायना बॉक्स हे नक्की खा. तसेच पिझ्झामध्ये फार्महाउसची चव जरूर घ्या. डेझर्टमध्ये ब्लू बेरी चीज केक अप्रतिम आहे. नॉनव्हेज पदार्थांत ग्रील चिकन स्किवर्स तुम्हाला तुमची बोटे चाटण्यास भाग पाडेल. डोंबिवलीत इटालियन खाद्यपदार्थ हवे तसे मिळत नसल्याने येथील खवय्यांना डोंबिवलीबाहेर जावे लागते. त्यामुळे डोंबिवलीकरांना एक ऑथेंटिक इटालियन पदार्थ खायला मिळावेत, याकरता या कॅफेची सुरुवात केल्याचे मनन मेहता यांनी सांगितले.
त्यामुळे हा विकेंड अगदी इटालियन स्टाइलने रोमँटिक पद्धतीने घालवायचा असेल, तर कॅफे जंक्शन एक परफेक्ट डिनर प्लेस ठरू शकेल. तुम्ही इथले डिनर नक्कीच एन्जॉय कराल यात शंका नाही. पुढच्या विकेंडला जीभेसाठी नवीन ठिकाणी.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट