सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर.
चुलीवरची मटण थाळी चुलीवरची मटण थाळी ही इथली खासियत आहे. यामध्ये घरगुती लाल मसाला, खोबरं, आलं-लसूण पेस्ट वापरून ग्रेव्ही तयार केली जाते व त्यामध्ये मटन शिजवले जाते. मटण पीस, राईस, बाजरीची भाकरी, झिंगा चटणी आणि पाया सूप अशी ही थाळी सर्व्ह होते. चुलीवर तयार केल्यामुळे याला एक स्मोकी चव असते. पाया सूप जरा स्पायसी तर झिंगा चटणी क्रिस्पी असते. सोबत बाजरीची भाकरी या थाळीची रंगत वाढवते.
पापलेट फ्राय पापलेट मासा साफ करून धुवून घेतला जातो व त्याला आडव्या चिरा दिल्या जातात. कोकमाचे आगळ, तिखट, हळद, चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र करून त्या माश्यांंच्या चिरांमध्ये हे मिश्रण काही मिनिटे लावून ठेवले जाते. त्यानंतर बारीक रवा, तांदळाचे पीठ, हळद, तिखट, चवीनुसार मीठ हे सर्वांचे सुके मिश्रण तयार करून त्या माश्यांंना लावले जाते. तो मासा नॉनस्टिक तव्यामध्ये दोन्ही बाजूने १०-१५ मिनिटे शॉलो फ्राय करून घेतला जातो. मालवणी पद्धतीत तयार पापलेट फ्रायला नाशिकरांची मोठी मागणी आहे.
मटण तवा मटणाच्या पीसला लाल मसाल, आलं-लसूण पेस्ट, लिंबू लावून ठेवले जाते. त्यानंतर तव्यावर तेल गरम करुन त्यात पुन्हा थोडा मसाला, मीठ घालून त्यावर मिश्रण लावून ठेवलेले पीस परतून घेतले जातात. परतलेले पीस खमंग भाजून घेत सर्व्ह होतात. खवय्यांची स्टार्टर म्हणून याला सर्वाधिक पसंती असते. तिखट, क्रिस्पी अशी या तवा मटणची चव असते.
लसुणी मेथी मेथीची भाजी तयार करताना त्यात हिरवी मिरची, मीठ यासोबत जास्त प्रमाणात लसूणही घातला जातो. त्यानंतर भाजी कढईमध्ये फ्राय केली जाते. लसूण वापरल्यामुळे मेथीला लसणाची चव मिळते. तिखट असलेल्या या डिशला लसणाची चव अधिक असते.
ठेचा-भाकरी हिरवी मिरची तव्यावर भाजून घेऊन त्यामध्ये लसूण, मीठ व शेंगदाणे घातले जातात. हे मिश्रण कुटून घेतले जाते. हे मिश्रण एकत्रितरित्या कुटून झाल्यावर ते तेलात परतून घेऊन ठेचा तयार केला जातो. या ठेच्यासोबतच गरमागरम बाजरीची भाकरी खाण्यासाठी खवय्यांची पसंती असते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट