थंडीच्या दिवसांत बाजारात मटार, टोमॅटो आणि गाजरची आवक वाढते. त्यामुळे त्यांचे भावही तुलनेने उतरतात. ठरवलं तर मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या या स्वस्त भाज्यांनी भोजनाची लज्जत वाढवता येते...
न ह्याहारादृते प्राणिनां
प्राणाधिष्ठानं किञ्चिदप्युपलभामहे।
प्राणी जीवनात आहाराला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्याच्याशिवाय प्राणिमात्रांचे प्राण अजिबात स्थिर राहू शकत नाहीत. किंबहुना मानवाच्या ज्या तीन मूलभूत गरजांचा उल्लेख होतो, त्यातली पहिली अन्न ही आहे. अर्थात, सजीवांचे जीवन पूर्णत्वास नेणारा हा आहार जगाच्या पाठीवर भौगोलिक स्थिती, हवामान, ऋतू किंवा मग उपलब्ध जिन्नसांनुसार बदलत जातो. सध्या हिवाळा सुरू आहे. या दिवसांत आपल्याकडे प्रामुख्याने गाजर, मटार आणि टोमॅटोचे उत्पादन अधिक होते. त्यामुळे या भाज्या बाजारात मुबलक आणि तुलनेने स्वस्त भावात उपलब्ध असतात. साहजिकच त्यांपासून बनणाऱ्या पदार्थांचे प्रमाण हिवाळ्यात आपोआप वाढते.
मटार
अतिशय चविष्ट अशा या दाण्यांपासून मटार पनीर, मटार कोफ्ता, मटार कोबी, बटाटा मटार पनीर अशा पदार्थांसह पुलाव, व्हेज कोल्हापुरी व अन्य बऱ्याच डिशेसमध्ये मटार सहज मिसळून जातो व त्या पदार्थांचा स्वाद वाढवतो. मटार पनीर वगैरे नियमित खाल्ले जाणारे किंवा दिसणारे पदार्थ, पण वेगळं काहीतरी ट्राय करायचं असल्यास मटार कोफ्ता केव्हाही उत्तम. गरमागरम कढीसोबत टपोरे कोफ्ते जिभेचे चोचले अगदी सहजगत्या पुरवतात.
मटारचा फायदा
मटार स्वादिष्ट तर आहेच, पण त्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातील अँटीऑक्सिडेंट शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
मटार कोफ्ता
साहित्य : ५०० ग्रॅम मटार दाणे, २ बटाटे, १ मोठा चमचा बेसन, २ हिरव्या मिरच्या, एक इंचाचा आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ.
कृती : मटार धुवून उकडून घ्या. बटाटे उकडून, सोलून स्मॅश करा. मटार वाटून घ्या. दोन्हींमध्ये बेसन, मिरची, आलं आणि मीठ व्यवस्थितपणे मिसळा. उत्तम मिश्रण तयार झाल्यानंतर त्याचे लिंबाएवढे गोळे करून गरम तेलात लालसर होईपर्यंत तळून काढा.
या गरमागरम कोफ्त्याची लज्जत टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत घेता येते, परंतु ते कढीसोबत खाण्याची मजा काही औरच असते. कढी तयार झाली, की गॅस बंद करावी व कोफ्ते कढीमध्ये टाकून दोनेक मिनिटे झाकून ठेवावेत आणि मग खावेत.
टोमॅटो
बहुतांश पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही जिन्नसांपैकी एक म्हणजे टोमॅटो. तो कच्चा खाल्ला जातो, कोशिंबिरीत समरस होऊन भोजनाची लज्जत वाढवतो किंवा त्याची चटकदार भाजीही करता येते. टोमॅटो सार किंवा सूप, टोमॅटो-बीट सूप, टोमॅटो राइस, टोमॅटो आमलेट, टोमॅटो मॅगी, टोमॅटो चटणी, टोमॅटो लोणचे असे नानानिध चविष्ट पदार्थ त्यापासून बनविता येतात. मात्र गोडगुलाबी थंडीत यातलं गरमागरम टोमॅटो सूप अनोखा आनंद देऊन जातं.
टॉमॅटोचा फायदा
बहुगुणी टोमॅटो अनेक पदार्थांद्वारे शरीरात जातो आणि शरीराला अनेक फायदे होतात. मुख्यत्वे यामुळे चरबीची वाढ रोखली जाते.
टोमॅटो राइस
साहित्य : १ वाटी तांदूळ, २ टोमॅटो, २ चमचे तूप, १ बारीक चिरलेला कांदा, आले-लसून, मिरची पेस्ट, ओलं खोबरं, जिरं, दालचिनीचे लहान तुकडे, मीठ, साखर आणि कोथिंबीर.
कृती : तांदूळ धुवून किमान अर्धा तास निथळत ठेवावेत. टोमॅटो शिजवून मिक्सरमध्ये पातळ वाटून घ्यावा. त्यानंतर पातेल्यात तूप तापवून त्यात जिरं-दालचिनी आणि नंतर कांदा परतून घ्या. आले-लसून, मिरची पेस्ट टाका. मग तांदूळ परतून चवीनुसार साखर व मीठ टाका. त्यात टोमॅटोचं वाटण आणि हवं असल्यास अजून पाणी घालून मंद आचेवर शिजवा. तयार झालेला रूचकर राइस वाढताना त्यावर ओले खोबरे आणि कोथिंबीरने गार्निश करा.
गाजर
गोड गारव्यात मुबलक प्रमाणात मिळणारी आणखी एक भाजी म्हणजे अल्पमोली, बहुगुणी गाजर. याचा हलवा जगभर प्रसिद्ध आहेच, पण त्याव्यतिरिक्त मुलांना भावणारा गाजर फ्राय, गाजर-मटार पुलाव, गाजर-मटार भाजी, गाजर ज्यूस, गाजर रायता, चटपटीत गाजर लोणचे आणि गाजर मुरंबाही तितकाच लोकप्रिय झालाय. गाजर म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो मस्त मधाळ हलवा. हा गोड पदार्थ जवळपास प्रत्येक घरात आपापल्या परीनं बनवला जातो. पण गाजर मुरंब्याची चवही तितकीच लाजवाब!
गाजराचा फायदा
थंडीत त्वचा कोरडी पडण्याचे, खडबडीत होण्याचे प्रमाण वाढते. त्यावर गाजराचा रस चोळल्यास ती सतेज बनते.
गाजर मुरंबा
साहित्य : गाजर १ कि. ग्राम, साखर ६०० ग्रॅम ( ३ कप), केसर ३०-४० धागे, २ लिंबू.
कृती : गाजर सोलून धुवून घ्या. सुकल्यानंतर एक किंवा सव्वा इंचाचे तुकडे करा. (गाजर मध्यभागी जास्त पिवळे असल्यास तो भाग काढून टाकावा) एका टोपात कापलेले गाजर पूर्ण बुडेल एवढे पाणी घेऊन त्याल उकळी आल्यानंतर त्यात गाजर टाका. त्यानंतर आणखी एक उकळी येऊद्या. गॅस बंद करा आणि पाच मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर गाजर पाण्याबाहेर काढा. एका चाळणीत कपडा ठेवून त्यावर ती पूर्ण निथळेपर्यंत एक ते दोन तास सुकवा. मग फोर्कने त्यांवर टोचे मारा. ही गाजर एका स्टीलच्या भांड्यात घेऊन त्यात साखर मिसळा. हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवा, जेणेकरून गाजरातील रस बाहेर येईल.
सकाळी हे भांडे पुन्हा गॅसवर ठेवा व पाक घट्ट होईपर्यंत ते शिजूद्या. थंड झाल्यावर त्यात लिंबाचा रस मिसळा आणि आस्वाद घ्या 'चटक-मटक' मुरब्ब्याचा. उरलेला मुरंबा एअर टाइट कंटनेरमध्ये भरून ठेवा. प्रामुख्याने गर्मीमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी तो अतियश उपयुक्त ठरतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट