फाइव्ह स्टार हॉटेललाही मागे टाकेल अशी ही थाळी. असा स्वयंपाक केल्यावर पितरं का बरं तृप्त होणार नाहीत? त्यांच्यासाठी केलेला हा सुग्रास स्वयंपाक सरतेशेवटी आपल्याच पोटात ढकलला जाणार असतो, हेही तेवढंच खरं.
मानव जातीला सण, उत्सव, महोत्सव, सोहळे अशा विविध निमित्तांनी 'सेलिब्रेशन' हवं असतं. त्या सेलिब्रेशनच्या माध्यमातून मग खाद्यसंस्कृतीची भरभराट होत राहते. निमित्त वेगवेगळी असली, तरी पोटोबाची चविष्ट सोय करूनच त्यांची सांगता होत असते. आपल्या या 'सेलिब्रेटिंग लाइफ'च्या धोरणात पूर्वजांविषयी कृतज्ञता, त्यांचे ऋण किंबहुना उपकार आपल्यावर असल्याचं भान नव्या पिढीला राहावं, म्हणूनच की काय, आपल्या संस्कृतीत त्यांच्यासाठीही एक दिवस राखून ठेवलेला आहे, पितृपक्षाच्या निमित्तानं. हीच आपल्या संस्कृतीची प्रगल्भता म्हणता येईल. अन्यथा घरातील जिवंत आई-वडिलांचे उपकार जिथं विसरले जातात, तिथे इहलोक सोडून गेलेल्या पितरांचं ऋण मानणं मुश्किलच.
आपल्याकडे आज जे काही आहे, बौद्धिक, शारीरिक आणि भौतिक संपत्ती, याचं श्रेय आपल्या एकट्याला जात नसून, आपल्या पूर्वजांच्या पुण्याईचा आणि कर्मांचा तो परिपाक आहे, याची जाणीव थोड्या फार प्रमाणात का होईना, या निमित्तानं झाली तरी पितृपक्षाचं सार्थक होईल. इतर निमित्तांप्रमाणे हा काळ 'साजरा' करण्यासारखा नसला, तरी पोटाचे आणि जिभेचे लाड करण्याचं सूत्र मात्र या दिवसांमध्येही कायम असतं. पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी करण्यात येणारा स्वयंपाक हा इतका भरगच्च असतो, की ताटात वाढण्यासाठी जागाही उरलेली नसते. तशातच दाटीवाटीनं वाढलेलं ताट नुसतं पाहूनच तृप्ती व्हावी. भेंडी, भोपळा, कारलं, गवार, चवळीची शेंग, श्रावणी घेवडा, मेथी यांसारख्या भाज्या, उडीद आणि मुगाच्या डाळीचा वडा, कढी, कांद्याची, घोसाळ्याची भजी, गोड भजी किंवा गुलगुले, थापीवड्या, काकडीची कोशिंबीर, चटणी, वरणभात, पोळ्या, अळूची वडी, आमटी आणि तांदळाची खीर, आहाहा! फाइव्ह स्टार हॉटेललाही मागे टाकेल अशी ही थाळी. असा स्वयंपाक केल्यावर पितरं का बरं तृप्त होणार नाहीत? त्यांच्यासाठी केलेला हा सुग्रास स्वयंपाक सरतेशेवटी आपल्याच पोटात ढकलला जाणार असतो, हेही तेवढंच खरं.
या पदार्थांमध्ये ठिकठिकाणच्या पद्धतीनुसार बदल होतात. काही ठिकाणी रश्शी नावाचा रसा केला जातो. काही जणांकडे कांदा-लसूण चालत नसल्यानं कांद्याऐवजी बटाट्याची भजी केली जातात. काहीजणांच्या घरी उडदाचे वडे केले जातात, तर काही जणांकडे हरभरा डाळ भिजत घालून त्याचे खरपूस वडे केले जातात. या वड्यांना या स्वयंपाकात विशेष महत्त्व आहे. आमसुलाची चटणी करण्याचीही काही ठिकाणी प्रथा आहे. तांदळाची खीर मात्र जवळपास सगळीकडेच असल्याचं दिसतं. ही खीर करण्याचीही विशिष्ट पद्धत आहे. काही ठिकाणी नुसताच भात शिजवून त्यामध्ये दूध, साखर घालून खीर केली जाते. मात्र, नेमक्या पद्धतीनं केल्यास ही खीर अतिशय छान लागते. त्यासाठी अगदी थोडे तांदूळ लागतात. घरात जेवणाऱ्या ५-६ व्यक्ती असतील, तर अर्ध्या वाटीपेक्षा कमी तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून घ्यावेत. ओले तांदूळ सुती कापडावर विरळ पसरून वाळू द्यावेत. कढईत थोडंसं तूप घेऊन त्यावर हे वाळलेले तांदूळ गुलाबी-सोनेरी होईपर्यंत भाजावे. थंड झाल्यावर ते मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावेत. खीर करताना छोट्या पातेल्यात ही भरड आणि थोडंसं दूध घेऊन गुठळ्या होणार नाहीत, याची दक्षता घेऊन मिसळावे. त्यानंतर मोठ्या पातेल्यातील दुधात हे मिश्रण मिसळावं, साखर घालावी. त्यानंतर ही खीर शिजवावी. छोट्या पातेल्यात मिश्रण न करता एकदम मोठ्या दुधात भरड घातल्यास गुठळ्या होतात. अशा पद्धतीनं खीर केल्यास ती उत्तम लागते.
पंचामृत करण्याचीही काही जणांकडे पद्धत आहे. त्याचप्रमाणे काही जण अळूची पातळ भाजी, तसंच दही घालून केलेली शेंगदाण्याची चटणी नैवेद्यासाठी करतात. एवढंच नव्हे, तर काही जणांकडे संत्री, पेरू, डाळींब, काकडी, मुळा यांच्या फोडीही नैवेद्याच्या ताटात वाढल्या जातात. हरभरा डाळीचे वडे करण्याचीही बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे. या सगळ्या पदार्थांव्यतिरिक्त त्या-त्या व्यक्तीच्या आवडीचा एखादा पदार्थ आवर्जून ताटात वाढला जातो. पूर्वीपासून केळीच्या पानात हे पदार्थ वाढण्याची पद्धत होती. कालांतरानं पत्रावळींचा वापर सुरू झाला.
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर केले जाणारे विधी, मंगलकार्यं, सण या सगळ्यांत आपलं वैशिष्ट्य जपणारी खाद्यसंस्कृती पितरांचं ऋणस्मरण करतानाही कुठं कमी पडत नाही. या प्रथा पाळायच्या की नाही, त्यात श्रद्धा आहे की अंधश्रद्धा हा भाग तूर्तास बाजूला ठेवू. या निमित्तानं पूर्वजांचं, त्यांच्या कर्तृत्त्वाचं भान नव्या पिढीला आलं, तर पिंडाला कावळा शिवला म्हणून समजा!
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट