दोन नारळांच्या दूधात मी चार-सहा नव्हे, तर चक्क किलोभर कोकम टाकून सोलकढी बनवण्याचा प्रयत्न केला होता. आंबटढोण या शब्दाला समानार्थी असलेली सोलकढी आता उचल आणि फेकून दे असा आज्ञावजा सल्ला यजमनांनी दिला. कमलाबाई ओंगलेंचं ‘रूचिरा’ नावाचं पुस्तक माझा मोठा आधार बनलं. लोणकढं तूप बनवण्याच्या अट्टहासाच्या वेळी पाणी राहिल्यामुळे दर मिनिटामिनिटाला लोण्याला येणारे फेसाचे उमाळे मी आजही विसरू शकत नाही. चुकत-चुकत मी घडत गेले पाकशास्त्रात. आज काही उरलं, तर त्यातच एखाददुसरा जिन्नस बेमालूमपणे मिसळून नवा पदार्थ करण्याकडे माझा कल असतो. परदेशातून माझी मुलं आली, की अशा नव्या पदार्थांची ओळख परेडच सुरू असते. उमा आणि रोहन या माझ्या नातवंडांना मी कालवलेला गोड वरणभात तूप भरवताना मला अतीव समाधान मिळतं. आईच्या हातचे घावन घाटले मला नॉस्टेल्जिक करतात.
कोल्हापूरला आले, की खासगावची मिसळ आणि सोळंकी आईस्क्रीम हा बेत न ठरवताही ठरतो. पुण्यातल्या संभाजी पार्कमधली भेळ माझी विशेष लाडकी आहे. सेवासदनचं वेलची केशरवालं पन्ह निव्वळ आठवणीनंही तजेला देतं. जगभर फिरले. सारे पदार्थ चाकले. त्यात थाई आणि मेक्सिकन पदार्थ मला विशेष भावले.
फिश फ्राय
साहित्य : अर्धा किलो सुरमई, १ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून हळद, २ टेबलस्पून लिंबूरस, ३ टेबलस्पून तांदळाचं पीठ, १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट, मीठ चवीप्रमाणे, ४ टेबलस्पून तेल.
कृती : माशाचे तुकडे करा. माशाला आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, लिंबूरस, मीठ लावून एक तास मॅरिनेट करून ठेवा. मॅरिनेट केलेल्या माशाचे तुकडे तांदळाच्या पीठात घोळवा. एका तव्यावर तेल गरम करा आणि तुकडे शॅलो फ्राय करून घ्या. तुकडे पाच मिनिटानंतर उलटे करा आणि दुसरी बाजूही फ्राय करून घ्या. गरज वाटल्यास थोडं तेल घाला. पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
शब्दांकन ः निनाद पाटील
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट