एक वाटी कच्च्या फणसाचे सुकवलेले गरे, अर्धी वाटी राजगिरा पीठ, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, चार हिरवी मिरच्या, दोन चमचे आलं आणि जिरं जाडसर वाटून, कोथिंबीर, लिंबू , चवीपुरतं मीठ, तूप
कृती :
सर्वप्रथम फणसाचे सुकवलेले गरे उकळत्या पाण्यात दोन तास भिजवून घ्यावेत. भिजलेल्या गऱ्यातील पाणी पूर्ण निथळून घ्यावे आणि मग गरे मिक्सरमधे बारीक वाटून घ्यावे. वाटलेल्या गऱ्यात राजगिरा पीठ, शेंगदाण्याचा कूट, चिरलेल्या मिरच्या, आलं-जिरं, कोथिंबीर, लिंबू, मीठ घालून सर्व एकजीव करावं. नंतर त्याचा घट्ट गोळा करावा. या मोठ्या गोळ्याचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्यावे. नंतर एकेक गोळा घेऊन प्लास्टिकच्या पिशवीवर त्या गोळ्यांची थालीपीठं थापावी. थापून झाल्यावर बोटांनी त्यावर ५-६ भोकं पाडावी. मग तव्यावर थोडं तेल किंवा तूप घालून त्यावर थालीपीठ सोनेरी रंगावर खरपूस भाजून घ्यावीत आणि उपवासाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावी. ही थालीपीठं चवीला अतिशय सुंदर लागतात.
टीपः वरील उपवसाचं फणसाचं थालीपीठ तुम्ही फणसचा सीजन असताना, फणसाचे ताजे गरे वापरुनही बनवू शकता.
- मयुरी राणे, दहिसर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट