गाजरं मुबलक मिळण्याचा हा मोसम. गाजराचा हलवा आणि लोणचं यांच्या पलीकडेही गाजरांचे अनेक प्रकार करता येतात, त्याचीच ही झलक.
हिवाळा वगळून वर्षातील अन्य ऋतूंमध्ये भगव्या रंगाच्या गाजरांकडे ढुंकूनही न पाहणारे खवय्ये लालचूटुक, शिडशिडित गाजरं बाजारात आली की, खूश होतात. सढळहस्ते साजूक तूप, काजू, खवा, दुधाची साय घालून खरपूस परतवून केलेल्या गाजर हलव्याची तयारी सुरू करतात. ताटवाटी लख्ख करून खाल्ल्या जाणाऱ्या या गाजर हलव्याच्या व्यतिरिक्तही गाजरापासून असंख्य पाककृती बनवल्या जातात. खरं तर लोणचं आणि हलवा या पलीकडेही गाजरगाथा अगाध आहे. ११ वैविध्यपूर्ण प्रकारचे धपाटे, पराठे, नान यांच्यातही गाजराचा वापर करून चविष्ट खाद्यांती करता येते. गाजराच्या कोशिंबिरीबरोबरच केक, चटणी वड्यांमध्येही गाजराची थोडीशी गोडस चव एकदम बहारदार लागते. गाजराच्या वड्या, सांडगे, चटणीसह चविष्ट सूपही पौष्टिक असते.
मिश्र धान्यांचे करतो त्याप्रकारचे गाजराचेही सांडगे करता येतात. सांडगे करण्यासाठी गाजराच्या किसात मीठ, तिखट घालून पाच मिनिटं हे मिश्रण झाकून ठेवावं. गाजराला सुटलेल्या पाण्यात थोडे जाड पोहे, थोडे धणे, तीळ आणि चार पाच हिरव्या मिरच्या बारीक करून, हिंगपूड घालून हे मिश्रण कालवून घ्यावे. एरवी घालतो, तसे सांडगे ताटाला तेल लावून थापावे. उन्हात एका बाजूने सुकले की दुसऱ्या बाजूने उलटवून घ्यायचे. साध्या वरणभातासोबत किंवा खिचडीसोबत हे सांडगे तळून एकदम फर्मास लागतात. गाजराच्या अनेक प्रकारच्या थालीपीठांमध्ये वा पराठ्यामध्ये हमखास वापर केला जातोच.
गाजरांच्या कोणत्याही खाद्यप्रकाराची चव ही लालचुटूक गाजरांच्या निवडीमध्येही असते. मोठाली भोपळी गाजरं चवीला बिलकुल चांगली लागत नाही. जून गाजरांपेक्षा मध्यम आकारांची रसरशीत गाजरांचं सत्व अधिक असते. कोशिंबिरीपासून वड्यापर्यंत अनंत प्रकारांमध्ये गाजरांचा खुबीने वापर केला; तर गाजरगाथा ही 'माँ का प्यार'वाल्या हलव्यापेक्षाही अगाध आहे, हे हमखास लक्षात येईल.
वडे : गाजरांचे वडेही तितकेच खमंग होतात. दोन गाजरं, एक छोटा तुकडा कोबी, तीन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चण्याची डाळ, मुगाची डाळ, गरजेनुसार कणिक, ताक हिंग आणि चवीला मीठ अशी या वड्यांची सोपी पाककृती आहे. वडे करण्याची पद्धतही अतिशय सोपी आहे. गाजर व कोबी वाफावून घ्यायचा, थंड झाल्यानंतर एकत्र बारीक चिरायचे, एकदम रवाळ होऊ द्यायचे नाही. मुग आणि चण्याची डाळ एक तास भिजवून मिरच्या आलं घेऊन भरड निघेल अशी वाटून घ्यायची. या वाटलेल्या डाळीत हिंग, मीठ, बारीक कांदा आणि कणिक थोडसं ताक घालून एकत्र भिजवून घ्यायचं. प्लास्टिकवर या मिश्रणाच्या छोट्याछोट्या वड्या थापून हिरव्या मिरचीच्या झणझणीत चटणीसोबत मटकावायचे.
स्टिक्स : गाजराच्या या व्हेज रेसिपीसोबत अंड्याची जोड घेऊन केलेल्या गाजराच्या स्टिक्सही अशाच एखाद्या थंडगार संध्याकाळी करून पाहायला हरकत नाही. एकाच आकाराच्या तीन चार गाजरांचे वाफवून उभे काप करायचे. दोन अंड्यामधील पांढरे बलक फेटून त्यात अर्धा कप गव्हाच्या ब्रेडचा चुरा, थोडेसे दही, मीठ आणि मिरपूड एकत्र करून घ्यायची. मीठ घालून हे मिश्रण फेटून घ्यावं, या स्टिक्स अंड्याच्या बलकामध्ये घोळवून ब्रेडच्या चुऱ्यात टाकून नॅानस्टिक पॅनमध्ये थोडसं तेल घालून मंद आचेवर फ्राय कराव्यात. स्टार्टर म्हणून या स्टिक्स लाजवाब लागतात.
कांजी : गाजर हे पौष्टिक आणि आरोग्यवर्धक असल्याने गाजरांपासून काढलेली कांजी मातीच्या मडक्यात केली जाते. हेल्थी डाएट म्हणून गाजरपारखी ही कांजी ओरपून पितात. मात्र, त्यात अलीकडे घातल्या जाणाऱ्या चाट मसाल्यांचा स्वाद कांजीची लज्जत घालवून टाकतात. मातीच्या भांड्यामध्ये बारीक गाजरांचे तुकडे, हिंग, मोहरी आणि काळे सैंधव मीठ घालून झाकण लावून हे मिश्रण अतिशय धीम्या आचेवर रटरटावे लागते. यातील गाजर शिजून बाजूला काढली की खाली राहणारा अर्क म्हणजेच कांजी. ही कांजी त्वचेसाठी अन् डोळ्यांसाठी तजेलदार असते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट