Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

चवीने खाणार, त्याला पाचकळशी वाढणार!

$
0
0



जात नाही, ती 'जात' असं म्हटलं जातं. परंतु, एकवेळ जातीपातीची बंधनं सैल होतील, मात्र खाद्यसंस्कृतीची बंधनं सैल होणार नाहीत. कारण प्रत्येक समाजाला स्वतःची खाद्यसंस्कृती आहे आणि प्रत्येक समाजाला आपल्या खाद्यसंस्कृतीचा प्रचंड अभिमानही. वेगवेगळ्या समाजात रुजलेल्या या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचाच वेध आजपासून दर पंधरवड्याला या सदरात घेणार आहोत, त्यांच्या काही खास पाककृतींसह. आज आस्वाद घेऊ या सोमवंशीय क्षत्रिय पाठारे ऊर्फ पाचकळशी समाजाच्या खाद्यसंस्कृतीचा...

मुकुंद कुळे

'खाणारा दमदार असेल, तर त्याला वाढणाराही दिलदार असतो', असं गमतीने म्हणण्याची पद्धत आहे. कारण चवीचवीनं जेवणारा कुणी असेल, तर वाढणा‍ऱ्यालाही मजा येते. अर्थात चवीने खाणारा असला, म्हणून रोज कुणी बाहेरच्याला कौतुकाने वाढणार नाही! ती गंमत अपवादातच असते. तरीही वरील उक्तीचा अनुभव घ्यायचा असेल, तर खुशाल पाचकळशी समाजातल्या कुणाचीही ओळख काढावी आणि निमित्ताने त्यांच्याकडे जेवायला जावं. शेवळाचं कालवण, जवळ्याची वडी, कोळंबीची अळुवडी, ओल्या बोंबलाचा पोपट, चवळी-वजरी, खिम्याच्या करंज्या, करंदीचे खारवणी, खिम्याचे मुठे... असं दणकेबाज तिथे काहीतरी हमखास खायला मिळणार. विशेष म्हणजे ताटात जे वाढलं जाणार ते निगुतीनिगुतीने नाही, तर सढळ हाताने. जेणेकरून खाणारा तृप्त झाला पाहिजे, त्याची जेवणावर वासना राहता कामा नये. मात्र, एवढं चवीचवीने जेवून बाहेर पडल्यावरही काहीतरी मागे उरतचं, तो असतो पाचकळशी मसाल्याचा वास! जेवण शाकाहारी असो वा मांसाहारी, त्यात शक्यतो घरी केलेला किंवा खास दळून आणलेला पाचकळशी मसाला हवाच!

हा पाचकळशी समाज म्हणजे, मुंबईच्या आद्य समाजांपैकी एक! जसे वारली, कोळी, आगरी, पाठारे प्रभू, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, हे मुंबईतले जुने समाज, तसेच त्यांच्याबरोबरीने मुंबईत वाढलेला समाज म्हणजे सोमवंशी क्षत्रिय पाठारे ऊर्फ पाचकळशी. मुंबईतलं याचं वास्तव्य थेट सातशे-आठशे वर्षांपासूनचं. सोमवंशी, म्हणजेच थेट क्षत्रिय चंद्रवंशाशी नातं सांगणारा हा समाज पैठणच्या बिंब राजाबरोबर तेव्हाच्या अपरान्त म्हणजेच, कोकणात आला आणि इथे स्थायिक झाला. डहाणूपासून ते मुंबई-उरण, चौलपर्यंत या समाजाने वस्ती केली. जे पालघर-डहाणू परिसरात स्थिरावले त्यांनी भाज्यांच्या वाड्या करायला सुरुवात केली, म्हणून ते वाडवळ झाले. त्यांनाच चौकळशी असंही म्हटलं जातं. तर मुंबई परिसरात जे स्थिरावले, ते काहीसे जमीनदार झाले. कारण त्यांच्या ताब्यात मुंबईतल्या वरळी, चेंबूर, दादर, माहीम, गोरेगाव, मालाड ते थेट भाईंदरपर्यंतच्या जमिनी आल्या. त्यामुळे त्यांची आडनावंही तशीच पडली- दादरकर, वरळीकर, चेंबूरकर, भाईंदरकर, माहीमकर... याशिवाय म्हात्रे, पाटील, मंत्री, कोतवाल, पुरव, चोगले अशी काही आडनावंही या समाजात आहेत. यांच्याही मालकीच्या मुंबईत मोठ्या जमिनी आहेतच.

आता कालौघात या समाजाच्या जमिनी टिकल्यात की नाहीत ते माहीत नाही. पण, थेट आठशे वर्षांची परंपरा असलेली या समाजाची पाचकळशी (लग्नात एकावर एक पाच कळशा मांडून ठेवायची पद्धत आहे म्हणून पाचकळशी, तर चार कळशा ठेवणारे चौकळशी) खाद्यसंस्कृती मात्र आजतायगायत टिकून आहे आणि ही खाद्यसंस्कृती पक्की मांसाहारी आहे. हा समाज शाकाहारही हौसेने करतो, पण देवाचे वार, उत्सव पाळूनच. अन्यथा रोजसुद्धा प्रेमाने मांसाहार रांधतील. मांसाहाराची ही आवड समुद्राच्या निकटच्या सान्निध्यामुळेच लागलेली. यांची तेव्हाची घरं म्हणजे समुद्रालाच खेटलेली. साहजिकच रोज कोळ्यांनी आणलेली ताजी ताजी मासळी यांच्या घरात यायची. यातूनच यांची वैशिष्ट्यपूर्ण मत्स्याहारी खाद्यसंस्कृती बहरली. भुजणीचा सरंगा, कोलंबीचं मुंब्र, घोळ-वांगं, कालव्याची भजी, करंदीचे कटलेट, गाठ्या कोलंबी... असे कितीतरी पदार्थ पाचकळशी खाद्यसंस्कृतीचे शान वाढवून आहेत. केवळ मांसाहारी किंवा मत्स्याहारीच नाही, तर शाकाहारी पदार्थ करण्यातही यांचा हातखंडा आहे. यांच्या घरातील कोबीचे भानोले, तांदळाची रवळी, नारळाच्या रसातील शेवया, अननसाची आमटी एकदा चाखली की त्यांची चव विसरणं जवळजवळ अशक्य आहे. पूर्वीचं जीवन आजच्या तुलनेत शांततेचं असल्यामुळे आणि महिलावर्ग घरातच थांबत असल्याने या समाजातल्या महिलांनी रोजचं जेवण जेवढं चवीढवीचं होईल, त्याकडे लक्ष पुरवलं. त्यासाठी नारळाचा चव, नारळाचं दूध, याचा वारेमाप वापर जेवणात केला. तर मत्स्याहारी पदार्थाचा हिंवस वास मोडण्यासाठी चिंचेचा कोळ वापरला. परिणामी पाचकळशी कुटुंबात गेलात, तर त्यांच्या घरात नारळ आणि चिंचेला कधी खळ नसतो.

या समाजात काही पदार्थ विशिष्ट प्रसंगी करण्याचीही पद्धत आहे. उदाहरणार्थ दिवाळीला पहिली अंघोळ झाली की आधी तांदळाची रवळी खायला दिली जाते. त्यानंतर तिर फराळ. तसंच दिवाळीचा फराळ करायला घेताना आधी तिळो‍ऱ्या म्हणजे तीळपापड्या आणि चनपापड्या केल्या जातात. बाकीच फराळ त्यानंतरच करायची पद्धत आहे. तसंच यांच्या लग्नातील जेवणात चवळीची भाजी आणि कांदा-बटाट्याचा रस्सा हवाच. तो नसेल, तर ते पाचकळशी लग्नच नव्हे! विशेष म्हणजे पाचकळशी समाजात गौरीला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची पूर्वापार पद्धत आहे. या ताटात, भरलेलं पापलेट, खिम्याची कंरजी, करंदीचं पॅटीस, कोलंबीची अळुवडी असे अनेक मांसाहारी पदार्थ ठेवले जातात. पूर्वी यांची मोठमोठी घरं असायची, तेव्हा या मांसाहारी ताटामुळे गणपती आणि गौर वेगवेगळ्या खोलीत बसवले जायचे. कारण गणपतीला मांसाहार चालत नाही. परंतु, आता जागेअभावी गौर-गणपती बाजूबाजूला बसले, तरी नैवेद्याचं ताट दाखवताना मध्ये पडदा धरला जातो.

देवांना शाकाहार-मांसाहाराचा वेगवेगळा नैवेद्य दाखवत असले, तरी पाचकळशी समाजाने स्वतःच्या काद्यसंस्कृतीत मात्र या दोन्हीचा सुरेख मेळ साधलेला आहे.

अननसाची आमटी

साहित्य : १ अननसाच्या फोडी, एक मोठी नारळ चव, ७-८ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, कढीपत्ता, १ इंच आले, १ टीस्पून हळद, २ टीस्पून धणा जिरे पावडर, एका लिंबाएवढी चिंच, २-३ टेबलस्पून चण्याच्या डाळीचे पीठ, हिंग, २-३ टेबलस्पून साखर, १०-१२ काजू.

कृती : पातेल्यात फोडणीसाठी तेल टाकावे. तेल तापल्यावर जिरे, हिंग व कढीपत्ता घालावा. नंतर हळद व धणा जिरे पावडर टाकून परतावे व अननसाच्या फोडी व काजू घालून परतावे व दोन वाट्या पाणी घालून अननस शिजू द्यावा. नारळ चव, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, आले सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. त्यातच २-३ टेबलस्पून चण्याच्या डाळीचे पीठ टाकून एकदा मिक्सर फिरवून मिक्स करून घ्यावे म्हणजे वेगळे पीठ कालवून घालावे लागत नाही. अननसाच्या फोडी शिजल्यावर त्यात तयार वाटण घालावे. चिंचेचा कोळ चवीनुसार मीठ व साखर घालून सर्व चांगले उकळवून घ्यावे. अननसाची आमटी तयार.

कोबीचे भानोले

साहित्य : ५०० ग्रॅम कोबी बारीक चिरलेला, ५०० ग्रॅम चण्याच्या डाळीचे पीठ, २-३ टेबलस्पून तांदळाचे पीठ, २ टीस्पून पाचकळशी मसाला, १ टीस्पून मिरची पावडर, १/२ टीस्पून हळद, २ टीस्पून धणा-जिरे पावडर, १ टीस्पून गरम मसाला, दोन लिंबांचा रस, २ टेबलस्पून साखर, अर्धी वाटी नारळ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा, २-३ टेबलस्पून तेलाचे मोहन, दोन कांदे बारीक चिरलेले, २ टीस्पून आले-लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून हिंग, तळण्यासाठी तेल.

कृती : पातेल्यात २-३ चमचे तेल घेऊन त्यात सर्व मसाले मिसळावेत. नंतर त्यात कोबी, कांदा व कोथिंबीर घालून हाताने सर्व एकजीव करून घ्यावे व लिंबाचा रस व साखर मीठ घालावे. नंतर चण्याचे पीठ व तांदळाचे पीठ घालून गरजेप्रमाणे पाणी वापरून पीठ इडलीच्या पिठाप्रमाणे कालवावे व १५ मिनिटे झाकून ठेवावे. ज्या भांड्यात भानोले बनवायचे आहे त्याला आतून तेल किंवा तूप लावून घ्यावे व त्यात तयार पीठ ओतून कुकरमध्ये उकडून घ्यावे. थोडे थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात व तव्यावर तेल सोडून तळून घ्याव्यात. भानोले गरम व थंड दोनही प्रकारे छान लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>